पुदिना : (हिं., म. पहाडी पुदिना इं. स्पिअरमिंट, गार्डन मिंट, लँब मिंट, ग्रीन मिंट लॅ. मेंथा स्पायकॅटा, में. व्हिरिडिस, में. स्पायकॅटा प्रकार व्हिरिडिस कुल-लॅबिएटी किंवा लॅमिएसी). एक परिचित सामान्य अोषधीय [→ औषधि] वनस्पती. हिच्या मेंथा ह्या शास्त्रीय नावाच्या वंशातील एकूण सु. २५ जाती सर्वत्र पसरल्या असून त्या सर्वच सुगंधी आणि अमेरिकेशिवाय इतरत्र मुख्यतः समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. अनेक जाती इतर देशांत प्रविष्ट केल्या असून लागवडीत आढळतात. भारतात सु. सहा जाती आढळतात. जातींत एकंदरीत विविधता बरीच असून परस्परांतील संकरामुळे कित्येक संकरज व वाण आहेत. कमीजास्त प्रमाणात त्या उपयुक्त असल्याने बागेत आणि शेतात काहींची लागवड केली जाते या सर्वांना सामान्यपणे मराठीत पुदिना म्हणतात, परंतु त्यांमध्ये फरक आढळतात.

मेंथा स्पायकॅटा : पुदिन्याची ही जाती गुळगुळीत, बहुवर्षांयू (अनेक वर्षे जगणारी), सु. ३०–९० सेंमी. उंच असून उ. इंग्लंड हे तिचे मूलस्थान आहे तथापि ती जगभर लागवडीत आढळते. भारतात बागांतून व बागायती शेतांतून लावतात. तिला जमिनीत आडवे वाढणारे नाडजूड खोड (मूलक्षोड) असते व त्यापासून जमिनीवर अनेक चतुष्कोनी फांद्या (अघश्र्च) वाढून येतात. पाने साधी, समोरासमोर, गुळगुळीत, बिनदेठाची, भाल्यासारखी-अंडाकृती, टोकदार, दातेरी असून त्यांच्या खालच्या बाजूस प्रपिंडीयी (ग्रंथियुक्त) केस असतात. फांद्याच्या टोकांस आणि पानांच्या बगलेत कणिश प्रकारचे फुलोरे असून त्यातील अक्षावर निळसर फुलांचे लहान पुंजके [पुंजवल्लरी → पुष्पबंध] असतात. पुष्पमुकुट ४-५ भागी आणि फळ (मुद्रिका) शुष्क व फार बारीक असून त्याच्या चार कपालीकांपैकी प्रत्येकीत एक बारीक बी असते. ते सतत राहणाऱ्या संवर्ताने वेढलेले असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलाफळांची संरचना ⇨लॅबिएटी कुलात (तुलसी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असते.

ही जाती में. रोटुंडिफोलिया आणि में. लाँगिफोलीया यांच्या संकराने बनलेली असून तिच्यापासून पुढे अनेक वाण बनलेले आहेत, त्यामुळे त्यांमध्ये बरीच विविधता आढळते. भारतात सर्वत्र भाजीप्रमाणे लागवडीत असून दुमट व खतावलेल्या जमिनीत ती चांगली फोफावते. जुन्या (पूर्वी असलेल्या ) पिकातील खोडांच्य फांद्याच्या फांद्यांचे तुकडे सु. ३० सेंमी. अंतरावरच्या सरींमध्ये लावतात एका सरीतील दोन तुकड्यांतील अंतर सु. १५ सेंमी. ठेवतात. रुक्ष हवामानात पाणी द्यावे लागते व कधीमधी तणही काढावे लागते. पानांची खुडणी वर्षातून एक-दोन वेळा करून पुढेही काही वर्षे चालू ठेवता येत असली, तरी दर वर्षी नवीन लागवड करणे चांगले पीक मिळण्याच्या दृष्टीने अवश्यक असते. यावर ⇨तांबेरा रोग पडतो तो टाळण्यास लागवडीपूर्वी ४६ से. तापमानाच्या गरम पाण्यात दहा मिनिटे तुकडे ठेवून नंतर लागवड करतात.

पुदिन्याच्या पानांचा उपयोग स्वयंपाकात स्वादाकरिता करतात. पुदिना उत्तेजक, वायुनाशी व आकडीरोधक आहे. पानांपासून शामक (शांत करणारा) चहा करतात तसेच अल्कोहॉलयुक्त पेयही पानांपासून करतात व विषावर उतारा म्हणून देतात. उन्मादावर व गर्भारपणातील ओकाऱ्यांवर आणि लहान मुलांच्या तक्रारीवर पुदिन्याचा फांट[→ औषधिकल्प] साखर घालून देतात तसेच ताप आणि श्वासनलिकादाह यांवरही पुदिना गुणकारी आहे. पानांना विशिष्ट सुगंधीपणा व काहीशी तिखट चव असते. पानांमध्ये शेकडा पाणी ८३·०१, प्रथिन ४·८, मेद (स्निग्ध पदार्थ) ०·६, कार्बोहायड्रेटे ८·०, तंतू २·०, खनिजे १·६ असतात. शिवाय कॅरोटीन २·७०० आं.ए. (आंतरराष्ट्रीय एकके), निकोटिनिक अम्ल ०·४ मिग्रॅ., रिबोफ्लाविन १० म्यूग्रॅ. (१ म्यूग्रॅ. = १०-६ ग्रॅम ) व थायमिन ५० म्यूग्रॅ. इ.असतात.

ताज्या फुललेल्या वनस्पतीपासून ऊर्ध्वपातना (वाफ करून व मग ती थंड करून घटक अलग करण्याच्या क्रीयेने) ०·२५–०·५० % बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल (स्पिअरमिंट तेल) मिळते. ते काहीसे पिवळट किंवा हिरवट किंवा हिरवट असून त्याला पुदिन्याचा विशिष्ट सुगंध व चव असते जुन्या तेलाला अधिक चांगला वास येतो.l-कॅर्व्हान हा तेलातील विशिष्ट घटक पदार्थ असतो त्याचे प्रमाण भिन्न तेलांत बदलते. अमेरिकेतील स्पिअरमिंट तेल स्कॉच मिंट (मेंथा कार्डियाका) पासून काढतात. रशियन तेल अन्य (मेंथा व्हर्टिसिलॅटा) जातीपासून काढतात. अमेरिकन स्पअरमिंट तेल चघळण्याच्या गोंदात (च्युइंग गममध्ये), दंतधावनात, मिठाईत व औषधांत घालतात. भारतात या तेलाला अद्याप व्यापारी महत्त्व प्राप्त झालेले नाही.

मेंथा अर्व्हेन्सिस : (इं. कॉर्न मिंट, फील्ड मिंट). ही भारतीय पुदिन्याची जाती समशीतोष्ण उ. आशियात हिमालयार्यंत आणि युरोपात आढळते. काश्मीरमध्ये (१,५००–३,००० मी. उंचीर्यंत) ती रानटी अवस्थेत आणि गुलमर्गच्या आसपास सामान्यपणे आढळते. ती इतर काही ठीकाणीही तुरळकपणे दिसते पण मोठ्या प्रमाणावर कोठेही लागवडीत नाही. ती सरळ १०–६० सेंमी. पर्यंत उंच वाढते पाने साधी, २·५–५सेंमी. लांब, बिनदेठाची किंवा फार लहान देठाची, आयात-अंडाकृती, दातेरी व तळाशी पाचरीसारखी आणि काहीशी केसाळ किंवा केशहीन असतात अवयवांत विविधता असते. हिला पानांच्या बगलेत निळसर लहान फुलांचे गुच्छ, खोडाच्या वरच्या भागात येतात. इतर काही लक्षणे लॅबिएटी कुलात दिल्याप्रमाणे असतात. इतर अनेक जातींशी तिचा संकर होतो व विविध संकरज  बनलेले आढळतात. तिचा स्थानिक उपयोग औषधांकरिता होतो. ती उत्तेजक व वायुनाशी असून अपचन व संधिवात यांवर देतात. तिच्या पानांतील तेलातून (थंड केले असता) मेंथॉल अलग होत नाही तसेच ते तेल अधिकृत दर्जात येत नाही.

जपानी पुदिना : (इं. जॅपनीज मिंट लॅ. मेंथा अर्व्हेन्सिस, उपजाती हॅप्लोकेलिक्स  प्रकार, पायपेरेसेन्स ). ही एक बहुगुणित [→ बहुगुणन] संकरज जाती असून जपानात फार मोठ्या प्रमाणात तिची लागवड केलेली आहे. तेथून ती भारतात १९६२ च्या सुमारास आणून जम्मू व काश्मीर येथे सु. २७०–१,५००मी. उंचीच्या प्रदेशात तिची लागवड केली गेली. त्यानंतर उत्तर प्रदेशात इतरत्र मोठ्या प्रमाणावर तिची लागवड सुरू झाली. मेंथॉल आणि जपानी मिंट तेल तिच्यापासून अधिक मिळते. ही काहीशी लवदार, बहुवर्षायू अोषध वर वर्णन केलेल्या मेंथा अर्व्हेन्सिस ह्या पुदिन्यासारखी परंतु तिच्यापेक्षा मोठी (सु.६०–९० सेंमी. उंच) असते. पाने मोठी (३·७–१०सेंमी. लांब) व लवदार असून किनारीवर अधिक टोकदार दाते असतात फुलोरा जांभळट आणि अधिक विरळ व कक्षास्थ (बगलेतील) पुंजवल्लऱ्यांचा बनलेला [→ पुष्पबंध] असतो. इतर लक्षणे लॅबिएटी कुलात दिल्याप्रमाणे असतात. हिची अभिवृद्धी (उत्पत्ती पुढे चालविणे) बियांनी न करता मुळे असलेले अधश्वरांचे तुकडे लावून करतात. रेताड, दुमट व कुजकट पदार्थ असलेली जमीन आवश्यक असते. उन्हाळ्यात स्वच्छ सूर्यप्रकाश, तत्पूर्वी सौम्य पाऊस आणि जमिनीतून होणारा पाण्याचा निचरा ही परिस्थिती उपलब्ध झाल्यास मेंथॉलाचे प्रमाण वाढते मात्र भरपूर पाणीपुरवठा लागतो शेणखत वा मिश्रखत हेक्टरी सु. १,२०० किग्रॅ. देऊन नंतर अमोनियम सल्फेट सु. २५० किग्रॅ., सुपरफॉस्फेट २५० किग्रॅ. व पोटॅशियम सल्फेट २५० किग्रॅ. दिल्यास चांगला परिणाम झालेला आढळतो. मार्चमध्ये केलेल्या लावणीस जुलैमध्ये फुले येतात याचे उतपन्न दर हेक्टरी १८०–२७० क्विंटल येते व त्यामध्ये ४५ % खोड व ५०% पाने असतात ऑक्टोबरात याचा दुसरा बहर सु. ९० क्विंटल मिळतो दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत आंतरमशागत आणि नियमित पाणीपुरवठा यांमुळे चांगले उत्पादन होते. यापुढे मेंथॉल कमी प्रमाणात मिळत असल्याने नवीन लागवड करावी लागते मध्यंतरी घेवडे किंवा सोनामुखी पीक पालट म्हणून लावतात.

पीक ऐन जोमात असताना सकाळी कापून त्याच्या जुड्या करून उघड्यावर (पण प्रत्यक्ष सूर्यप्रकाशात नव्हे) वाळवितात यात पाने व फुलोरे यांचा समावेश असतो. एक तृतीयांशापेक्षा वजन कमी होऊ देत नाहीत. नंतर वाफेच्या साह्याने ऊर्ध्वपातन करून बाष्पनशील तेल जमा करतात, त्यालाच जपानी मिंट तेल किंवा जपानी ‘जपानी पेपरमिंट तेल’ म्हणतात जपानात त्याचे प्रमाण १·२८–१·६ % असते जम्मूमध्ये  सुक्या वजनाच्या २% मिळते परंतु उत्तर प्रदेशात ताज्या पानांपासून ०·४५% मिळते. हे जपानी मिंट तेल मेंथा पायपेरेटा या जातीपासून काढलेल्या पेपरमिंट तेलाऐवजी वापरतात त्याला काहीसा कडवट वास व स्वाद असतो आणि ते गुण व सुगंध यांबाबत कमी प्रतीचे मानले जाते. अती थंड केल्यावर त्यातून स्फटिकी मेंथॉल अलग होते. उर्वरित

जपानी पुदिना : (१) फुलो-यांसह वनस्पती, (२)फूल, (३) संवर्त.

तेलात ५५%  मेंथॉल राहते . अमेरिका व ब्रिटन हे देश जपानी मिंट तेलाच्या आपल्या औषधिकोशांत अंतर्भाव करीत नाहीत. भारतीय औषिधिकोशात ५०% पेक्षा अधिक मेंथॉल असलेल्या अनेक मिंट तेलांना स्थान दिले गेले आहे. जम्मूतील झाडांपासून उर्ध्वपातनाने मिळालेल्या तेलात ७०–८० %  मेंथॉल असते अवशिष्ट तेलात शेकडा ४४·८ मेंथॉल, २४·४ मिथिल ॲसिटेट, २४·६ मेंथोन आणि ६·२ होयड्रोकार्बने असतात. जपानी मिंट तेलापेक्षा स्वादाकरिता पेपरमिंट तेलाचा अधिक उपयोग करतात दोन्हींचे इतर उपयोग सारखेच आहेत. जपानी तेलाचा विशेष उपयोग नैसर्गिक मेंथॉलाचे उत्पादन करण्यासाठी वापरतात अवशिष्ट तेलाचा उपयोग दंतधावने, स्वच्छ करण्याची द्रावणे व औषधे यांत वापरण्यासाठी करतात. जपानी मिंट तेल व नैसर्गिक मेंथॉल यांचा जगाला पुरवठा मुख्यत: जपानकडून व काही अंशी चीन व ब्राझील यांच्याकडून होतो. भारतातील जम्मू व उत्तर प्रदेश येथे काढलेल्या जपानी मिंट तेलाला व त्यातील मेंथॉलाला चांगला भविष्यकाळ येण्याची शक्यता आहे. भारतीय व्यापारात जपानी मिंट तेल व पेपरमिंट तेल यांमध्ये फरक करीत नाहीत.

पेपरमिंट : (मेंथा पायपेरेटा हिं. गमाथी फुदिना). पुदिन्याच्या या जातीचा प्रसार समशीतोष्ण यूरोप, आशिया, उ. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे आहे. भारतात बागांतून ही जाती आढळते, तसेच काश्मीर, कर्नाटक, दिल्ली आणि डेहराडून येथे लागवडीत आहे. हिचे जमिनीवरील खोड चतुष्कोनी, सरळ, ३०–९० सेंमी. उंच, हिरवट किंवा जांभळट (लालसर) असते. पाने साधी, अंडाकृती, सवृंत (देठ असलेली) २·५–१० सेंमी. लांब, तळाशी निमुळती किंवा गोलसर, दातेरी, वरच्या बाजूस गुळगुळीत व गर्द हिरवी आणि खालच्या बाजूस फिकट व तुरळकपणे केसाळ असतात फुले जांभळट असून टोकाकडे जाडसर कणिशावरील पुंजवल्लऱ्यांत असतात. [→ लॅबिएटी]. ही जाती मेंथा ॲकॅटिका (वॉटर मिंट, मार्श मिंट) आणि मेंथा स्पायकॅटा ह्या दोन्हींच्या संकराने बनलेली असल्याने ती त्रिविध संकरज आहे. हिचे अनेक ⇨कृत्तक (शाकीय पद्धतीने प्रजात्पादन करून संवर्धित केलेले) प्रकार लागवडीत आहेत. ब्लॅक मिचॅप मिंट व व्हाईट मिचॅप मिंट हे दोन महत्वाचे प्रकार आहेत. पहिल्याची पाने अधिक गर्द हिरवी असून त्यांपासूनच पेपरमिंट तेल अधिक मिळते, तर दुसऱ्या प्रकारात तेल अधिक चांगले असते पण तो प्रकार कमी जोमदार असून हवामानातील बदल, कीटक आणि रोग यांबाबत अधिक संवेदी असतो पहिल्याची व्यापारी प्रमाणावर लागवड केली जाते.

ओलसर व समशितोष्ण हवामान पेपरमिंटाला मानवते भरपूर सूर्यप्रकाशात हलक्या चुनखडीच्या किंवा सकस खोल जमिनीत वाढ चांगली होते. मूलक्षोडाचे तुकडे ३०–९० सेंमी. अंतरावर लावूल लागवड करतात तत्पूर्वी शेणखताची एक मात्रा जमिनीस देतात नंतर कृत्रिम खताचाही वापर आंतरमशागतीत करतात. फेब्रुवारी ते मार्चमध्ये लावणी केलेल्या तुकड्यांची वाढ होत जाऊन पुढच्या जुलै महिन्यात त्यांना फुले येतात आणि त्या वेळी कापणी करतात पुन्हा सप्टेंबरात मध्यंतरीच्या पावसानंतर दुसरी कापणी करतात. अनुकूल परीस्थितीत सरासरीने दर हेक्टरी ७५०–१,००० किग्रॅ. हिरवी पाने मिळतात तसेच एक क्विंटल सुक्या पाल्यापासून सरासरीने ५–६ किग्रॅ. पेपरमिंट तेल मिळते प्रति हेक्टरी सु. ४०-५० किग्रॅ. पेपरमिंट तेल मिळते. पेपरमिंट या नावाने अमेरिकी औषधिकोशात या जातीच्या पुदिन्यास (सुकी पाने व फुलोरे) अधिकृत स्थान मिळाले आहे. ही जाती सुगंधी, उत्तेजक, दीपक (भूक वाढविणारी) व वायुनाशी असून शिसारी, वांती , उदरवायू इत्यादींवरर गुणकारी आहे. डोकेदुखी व विशिष्ट जागी होणाऱ्या वेदना यांवर पाने चुरून लावतात. पोटदुखी व शुलीय अतिसारावर पानांचा गरम फांंट देतात. पहाडी पुदिन्याची भेसळ औषधात करतात. खरे पेपरमिंट तेल ह्या पुदिन्याच्या जाती पासून काढतात त्याचा उपयोग स्वादाकरिता व औषधांकरिता करतात. व्यापारी प्रकारचे तेल काहीशा सुक्या व संस्कारित वनस्पतीपासून आणि औषधोपयोगी तेल ताज्या मालापासून काढतात, आवश्यक वाटल्यास तेलाचे विशोधन करतात ०·०३–१% तेल मिळते. काश्मिरातील वनस्पतीच्या सुक्या पानांपासून व फुलोऱ्यापासून ०·७–१% तेल मिळते, तर कानपुरातील ताज्या पानांपासून ०·३२% तेल मिळाल्याची नोंद आहे.

पेपरमिंट तेल फिकट पिवळे किंवा हिरवट पिवळे असून त्याला उग्र पण सुखदायक वास येतो व त्याला सुवासिक स्वाद असतो. तेलाची चव घेतल्यानंतर तोंडाने हवा आत घेतल्यास थंडवा वाटतो. कालपरत्वे तेल गडद होऊन चिकटही बनते. तेल अती थंड केल्यास मेंथॉल स्फटिकरूपात अलग होते. मेंथॉलाला पेपरमिंटाचा स्वाद असून ते दंतधावने, सिगारेट, औषधे, तांबूल इत्यादींमध्ये वापरतात छातीस चोळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यात घालतात तसेच अत्तरे, सुगंधी तेले, मिठाई व मद्ये यांत घालतात. पेपरमिंट तेलात जपानी पेपरमिंट तेल, कृत्रिम मेंथॉल, अल्कोहॉल, निलगिरी तेल, टर्पिनिऑल इत्यादींची भेसळ करतात. पेपरमिंट तेलही मेंथॉलाप्रमाणेच उपयुक्त आहे. त्यामध्ये सौम्य पूतिरोधक (सूक्ष्मजंतू नष्ट करण्याचा वा त्यांच्या वाढीस रोध करण्याचा) व स्थानिक बधिरपणा आणण्याचे गुण आहेत. संधिवात, दातदूखी , तंत्रिका शूल (मज्जातंतुजन्य वेदना), डोकेदुखी यांवर बाहेरून लावण्यास उपयुक्त आहे. उदरवायू, शिसारी व पोटशूळ यांवर पोटात देतात. अनेक औषधी द्रव्यांत, साबणांत, चघळण्याच्या गोंदात, मिठाईत, मद्यांत, खोकल्याच्या गोळ्यांत व दंतवैद्यकीय द्रव्यांत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पेपरमिंट तेल भारतात व्यापारी प्रमाणावर तयार होत नाही. कश्मिरातील वनस्पतीपासून (पुदिन्यापासून) मिळालेल्या तेलाची प्रत अधिकृत मानकापर्यंत पोहचलेली आहे. भारतात पेपरमिंट तेल व मेंथॉल मुख्यत्वे फ्रान्स, नेदर्लंड‌्स, ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील  या देशांतून आयात होते.

तेल काढून घेतल्यावर उरलेला चोथा वाळवून तो गुरांना सुका चारा म्हणून घालतात किंवा मुरघास म्हणून चारण्यास राखून ठेवतात. सुक्या चाऱ्यात प्रथिन १२·७ पचनीय प्रथिन ८·५ एकूण पचनीय पोषक पदार्थ ४९·४% आणि पोषक गुणोत्तर ४·८ असते. दुभत्या गायींना लसूणघासाऐवजी हा चारा घालता येतो.

लष्करी अळी, मुळे कुजणे व ⇨ करपा रोग यांमुळे पुदिन्याच्या पिकाचे नुकसान होते. त्यावर योग्य वेळी उपलब्ध उपाय करावे लागतात. लष्करी अळीकरिता ०·२%  एंड्रिन फवारतात. मूळकुजेने पाने पिवळी पडून झाडे सुरटतात. रोगग्रस्त झाडे उपटून टाकतात. कवकनाशक (बुरशिसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारी) द्रव्ये करपाग्रस्त झाडांवर फवारल्याने रोग आटोक्यात येतो.

बगमॉट मिंट : (लॅ.मेंथा सिट्रॅटा ). ही पुदिन्याची एक जाती उत्तर प्रदेशात अलीकडे लागवडीत घेतली असून दर हेक्टरी तिच्या पिकापासून सु. १०० किग्रॅ. तेल मिळते त्यामध्ये लिनॅलूल आणि लिनॅलिल ॲसिटेट ही सुवासिक रसायने विपुल असतात व त्यांचा वापर अत्तरांत, साबणांत व सौंदर्यप्रसाधनांत प्रामुख्याने करतात आणि त्या त्या उद्योगात तो सोयीचा असल्याचे आढळले आहे, त्यामुळे ही वनस्पती महत्त्वाची ठरली आहे. (चित्रपत्र ५८).

पहा : बाष्पनशील तेले.

संदर्भ : 1. Badhwar, R. L. Rao, P. S. Sethi, H. Some  Useful Aromatic Plants, New Delhi, 1964.

2. Barton, J. G. Wild Flowers, London, 1966.

3. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New  Delhi, 1962 .

4. Virmani, O. P., Ed. Central Indian Medicinal Plants Organisation, Lucknow, 1977.

पाटील, शा. दा.; परांडेकर, शं. आ.

पुदिना (पेपरमिंट) : फुलोऱ्यासह फांदी.