माणक : (हिं. मन्कंदा गु. काळी अळवी सं. माणक इ. जायंट तारो, ग्रेट लिव्ह्‌ड कॅलॅडियम लॅ. ॲ‌लोकेशिया इंडिका कुलॲ‌रॉइडी). ⇨ अळूप्रमाणे दिसणारी पण बरीच मोठी अशी ही ⇨ ओषधी आशियातील उष्ण प्रदेशांत आढळते. भारतात आसाम, बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू, मलबार आणि त्रावणकोर येथे हिची लागवड करतात. एकूण उंची १–१·५ मी. असते. जमिनीवरचा उंच व स्थूल खोडाचा भाग मांसल व ८–२० सेंमी. व्यासाचा असून जमिनीतील भाग आडवा वाढणारा असतो. पाने साधी, मोठी, अंडाकृती, तळाशी देठास खोलगट त्रिकोणी खाचेत चिकटलेली (शराकृती), तंरगित कडांची आणि सु. १ मी. लांब व १५ सेंमी. रुंद असतात. देठ लांब व भक्कम पर्णतल आवरक (खोडाशी वेढून राहणारा) स्थूलकणिश प्रकारच्या फुलोऱ्याचा [⟶ पुष्पबंध] महाछद २०–३० सेंमी. लांब, फिकट, हिरवट पिवळा, क्वचित लालसर रेषांकित, दुर्गंधी व लांब देठावर आधारलेला असतो [⟶ फूल]. देठ दोन, क्वचित अधिक इतर लक्षणे सामान्यतः अळूप्रमाणे तसेच ⇨ ॲ‌रॉइडी वा सुरण कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पानांचा रस किंवा काढा पोटदुखीवर आणि बद्धकोष्ठावर (मलावरोधावर) देतात. पानांचे देठ भाजून काढलेला रस स्तंभक (आकुंचन करणारा) व रक्तस्तंभक (रक्तस्त्राव थांबविणारा) असतो. मूलक्षोड (जमिनीतील जाड खोड) सौम्य रेचक व मूत्रल (लघवी साफ करणारे) असल्याने मूळव्याध, जलशोथ (पाणी साचून आलेली सूज) व बद्धकोष्ठतेवर त्यांची कांजी करून देतात. तोंड आल्यावर खोडाची राख मधाबरोबर लावण्यास देतात ती कृमिनाशक आहे. शोभेकरिता याचे प्रकार बागेत लावतात. खोडाची लागवड खाण्याकरिता करतात. ते शिजवून व स्वच्छ धुवून खाणे आवश्यक असते. त्याचा लगदा करून धुवून पांढरा शुभ्र स्टार्च मिळतो. हे पीठ हलके व पोषक अन्न असून अशक्तपणी खाण्यास चांगले असते ते काहीसे बुळबुळीत परंतु पचनास सोपे असते.

वैद्य, प्र. भ.