पिठवण : (1) पाने व फुलोरा यांसह फांदी (2) शिंबापिठवण : (रानगांजा हिं. पिटवन, दाब्‌रा क. पक्केगिड गु. पिलवण सं. पृश्न्न-पृश्न्नि-पर्णी, पृष्टि-चित्र-पर्णी लॅ. उरॅरिया पिक्टा कुललेग्युमिनोजी). सुं १.५ मी. उंच व १.५ सेंमी. व्यासाचे खोड असलेले हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) व शिंबावंत (शेंगा असणारे) झुडूप श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स, पाकिस्तान, नेपाळ, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश येथे व भारतात सर्वत्र (विशेषत: छोटा नागपूर, कोकण) आणि बंगाल ते ब्रम्हदेशापर्यंत रानटी अवस्थेत आढळते. याच्या वंशातील (उरॅरिया) एकूण सु. २५ जातींपैकी भारतात १० आढळतात त्या सर्व ⇨ ओषधी किंवा लहान झुडपे आहेत. खोडाचा तळभाग काष्ठयुक्त व बहुवर्षायू असून त्यावर दरवर्षी नवीन लवदार फांद्या येतात. त्यावर दोन प्रकारची संयुक्त, सोपपर्ण (उपपर्णे असलेली), एकाआड एक, पिसासारखी व विषमदली, २०-३० सेंमी. लांब पाने येतात. खालच्या भागावर १-३ आयत किंवा काहीशी हृदयाकृती दले पण वरच्या भागावर ५-९ जाडसर, लांबट १०-२० x २ सेंमी. दले असून त्यांवर पांढरट ठिपके असतात व त्यामुळे वर दिलेली संस्कृत नावे पडली आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये दांड्यासारख्या मंजरीवर झुबक्याने लहान, जांभळी, पतंगरूप [ ⟶ अगस्ता ] फुले येतात. शिंबा (शेंग) संधियुक्त, काळसर व गुळगुळीत असून तिचे ३-६ एकबीजी व ०.३ x ०.२ सेंमी. भाग परस्परांवर वळलेले असतात. बी गोलसर असते. इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलातील (शिंबावंत कुलातील) पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ही वनस्पती  आरोग्य पुन:स्थापक, पौष्टिक, सर्दीस प्रतिबंध करणारी असून संधिवात, मूळव्याध व ज्वर यांवर दिल्या जाणार्‍या ‘दशमूळ’ काढ्यात हिच्या मुळाचा अंतर्भाव होतो मुलांचे तोंड आले असता फळ कुस्करून लावतात. फुरशाच्या विषावर या झाडाचा रस उतारा आहे, असे म्हणतात परंतु अधिकृत पुरावा नाही. आफ्रिकेतील लागोस येथील लोक पाने कुटून परम्यावर वापरतात. पृश्न्निपर्णी, पिठवण व पृश्न्निपर्णीका ही नावे उरॅरिया लॅगोपॉइडिस (म. दौला, डवला) या समवांशिक जातीस वापरलेली आढळतात. दोन्ही जातींत काही लक्षणे व गुणधर्म सारखे आहेत. वैदिक वाङ्‌मयात पृश्न्निपर्णींचा (पृष्ठिपर्णीचा) उल्लेख अथर्ववेदसंहितेत केलेला आढळतो. गर्भाला पीडा देणार्‍या राक्षसाच्या नाशाकरिता आणि गर्भपात टाळण्याकरिता सातव्या महिन्यात दुधातून गर्भिणीस देण्यास सुश्रुत सूत्रात सांगितले आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात काही अद्‍भुत प्रयोगांकरिता हिचा उल्लेख केला आहे.

परांडेकर, शं.आ.