गारदळ : (१) पान व फुलोऱ्यासह फांदी, (२) पुं-पुष्प, (३) द्विलिंगी पुष्प, (४) शिंबा, (५) बीज.

गारदळ : (गारंबी हिं. गारबी गु. सुवली अमली क. दोड्डकंपी सं. गिल्ला इं. जायंट्स रॅटल, लेडीनट, मॅकरी बीन लॅ. एंटॅडा स्कॅन्डेन्स कुल-लेग्युमिनोजी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) मोठी वेल [→ महालता] सामान्यतः उष्णकटिबंधात, श्रीलंकेत व भारतात जंगलात आणि नदीकाठच्या प्रदेशात आढळते. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ बाभूळ व ⇨ शिरीष  यांच्याप्रमाणे व त्यांच्या कुलात [→ लेग्युमिनोजी, मिमोजॉइडी] वर्णिल्याप्रमाणे आहेत. खोड भक्कम व जाड. पानाच्या मध्यशिरेच्या टोकास प्रतानांची (तनाव्यांची) जोडी असते. पाने मोठी, संयुक्त, पिसासारखी व दोनदा विभागलेली असून दले २–३ जोड्या, दलके ३–५ जोड्या, गर्द हिरवी व जाड असतात. ⇨ पुष्पबंध  (फुलोरा, परिमंजरी किंवा कणिश) पानांच्या बगलेत किंवा पर्णहीन फांद्यांच्या पेऱ्यांपासून येतात. हिला फार लहान आणि पिवळी एकलिंगी व द्विलिंगी फुले मार्च-मेमध्ये येतात. पण शिंबा (शेंगा) फारच मोठी (३०–९० × ७·५–१० सेंमी.), जाडजूड साधारण चपटी पण बियांचे जागी फुगीर आणि मध्ये खोलगट असते. बिया ६–१५, मोठ्या, पिंगट, गुळगुळीत, काहीशा चपट्या पण फुगीर (४·३–५·६ सेंमी.) असून फळाचे एकबीजी भाग सुटे झाल्यावर फक्त सांगाडा उरतो. बियांचे चूर्ण पहाडी लोक तापावर देतात. ते वांतिकारक असून सांधेदुखी व अशक्तपणा यांवर उपयुक्त. प्रसूतीनंतर स्त्रियांना शरीरवेदनांवर व सर्दीवर मसाल्याबरोबर बियांची पूड देतात ती साबणाप्रमाणे केस धुण्यास चांगली असते. ती पहिल्या २-३ आठवड्यांत रेडकांना (पारड्यांना) जंत पडण्यास देतात. बी, खोड व साल विषारी आणि बी मत्स्यविष असते. दाहयुक्त सुजेवर बियांच्या चूर्णाचा लेप लावतात. साल व खोड यांचा रस जखमांवर बाहेरून लावण्यास वापरतात.

परांडेकर, शं. आ.