गेळा : (गेळफळ हिं. मैनफळ क. केरिगिड, मांगरीकाई गु. मिंधोला सं. मदन इं. एमिटिक नट, बुशी गार्डेनिया लॅ. रँडिया ड्युमेटोरम कुल-रूबिएसी). सु. ९ मी. उंच आणि ९० सेंमी. घेर असलेल्या या लहान पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात सर्वत्र व पाकिस्तान, श्रीलंका, ब्रह्मदेश, सुमात्रा, द. चीन, पूर्व आफ्रिकेतील उष्ण भाग इ. प्रदेशांत आहे. महाराष्ट्रात शुष्क पानझडी जंगलांत आढळतो. साल करडी, खवलेदार व काटेरी. पाने साधी, सोपपर्ण (उपपर्णांसह), लहान, समोरासमोर, तळास निमुळती व शेंड्याकडे रूंदट, गुळगुळीत किंवा लवदार असतात. फुले मध्यम आकाराची, सुगंधी, एकाकी, क्वचित २-३, लहान डहाळ्यांच्या टोकास गेळा : फुलांसह फांदी व फळ.

 मार्च-जूनमध्ये येतात प्रथम पांढरी आणि नंतर पिवळी मृदुफळे नोव्हेंबर-मार्चमध्ये येतात, ती साधारणपणे लिंबाएवढी, गोलसर असून पिकल्यावर पिवळी होतात. चकचकीत पाने व वाकडे काटे असलेला या जातीचा एक प्रकार महाबळेश्वर येथे आढळतो. 

फळ जळजळणारे पण चांगले वांतिकारक असते मगज (गर) कृमिनाशक, गर्भपातक असून आमांशावर ⇨ इपेकॅकऐवजी वापरतात ते मत्स्यविष आहे. फळाचे भरड चूर्ण लहान मुलांना ताप व दात येण्याच्या वेळी उद्‌भवणाऱ्या तक्रारींवर देतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व शामक असते. ज्वरामध्ये हाडे दुखत असल्यास साल पोटात देतात आणि बाहेरून लावतात संधिवातावर ती वेदनाशामक असते. मुळांपासून काढलेला पाण्यातील अर्क कीटकनाशक असतो. पक्क फळ भाजून खातात. पाने जनावरांना चारा म्हणून घालतात. फळात सॅपोनीन हे ग्लुकोसाईड असते.

लाकूड पांढरे किंवा भुरकट, घन आणि कठीण असून शेतीची अवजारे, फण्या, हातातल्या काठ्या, छत्र्यांचे दांडे, रिळे इत्यादींस उपयुक्त असते. कुंपण व सरपण यांकरिता वापरतात. 

पहा : रूबिएसी. 

जमदाडे, ज. वि.