रानलिंबू : (जंगली वा काळी मिरची, लिमडी हिं. कांज, देहान क. कडु मेनासू, मासिमुल्लू सं. कंचना, दहान इं. लोपेझ रूट ट्री, फॉरेस्ट पेपर, वाइल्ड ऑरेंज ट्री लॅ. टोडॅलिया ॲक्युलियाटा टो. एशिॲटिका कुल-रूटेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १५ मी. उंचीचे व सु. रानलिंबू : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) फळाचा आडवा छेद, (५) बी.१० सेंमी घेर असलेले हे काटेरी व सदापर्णी आरोही (वर चढणारे) झुडूप भारतात सर्वत्र मोसमी जंगलात आढळते शिवाय श्रीलंका, सुमात्रा, जावा, चीन, फिलिपीन्स व उष्ण कटिबंधीय आफ्रिका येथही आढळते. दक्षिण भारतात निलगिरी व पळणी टेकड्यांत आणि ओरिसातील खुरट्या जंगलात हे सामान्यपणे आढळते. पाने एकाआड एक, संयुक्त व त्रिदली (तीन दले अथवा सुटे भाग असलेली) असतात. दले दातेरी, बिनदेठाची, आयत, चिवट, गर्द हिरवी (५ –१० X १·८ –३·८ सेंमी.) व चकचकीत असून काटे वाकडे व लहान असतात. फुले एकलिंगी, पिवळट पांढरी, पानांच्या बगलेत वल्लरी प्रकारच्या फुलोऱ्यावर [ ⟶ पुष्पबंध] सप्टेंबर ते ऑक्टोबरात येतात. पुं-पुष्पाच्या कळ्या गोलसर असून स्त्री-पुष्पाच्या कळ्या लांबट असतात. काही फुले द्विलिंगी असतात. मृदु फळ गोलसर, मोठ्या वाटाण्याएवढे व नारिंगी रंगाचे असून सालीवर ३ – ५ उभ्या, उथळ व असंख्य बारीक खाचा असतात. फळात गुळगुळीत, मूत्रपिंडासारख्या ३ –७ बिया असतात. फळ काळ्या मिरीइतके तिखट असून त्यांचे लोणचे घालतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रुटेसी अथवा सताप कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वनस्पतीची कुंपणे करतात. मुळांपासून पिवळा रंग काढतात त्यात विषारी राळ असते. पाने व मुळे यांपासून टोडॅलिन नावाचे अल्कलॉइड मिळते ते विषारी असून हृदयक्रिया मंद करते. मुळांची साल कडू, सुगंधी, शक्तिवर्धक, उत्तेजक, आवर्ती ज्वररोधक (पाळीचा ताप थांबविणारी) असून तापांनंतर झीजभरून काढते. झाडाचे सर्व भाग तापनाशक आहेत पानांत पिवळट हिरवे बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असून त्यात व मुळाच्या सालीत बरबेरीन हे अल्कलॉइड असते.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

2. Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Vol I, New Delhi, 1975.

ठोंबरे, म. वा. परांडेकर, शं. आ.