सोनगर्बी (व्हायटेक्स ल्यूकोझायलॉन) : (१) पानांफुलोऱ्यासहित फांदी, (२) फूल.

सोनगर्बी : (शिरस; क. होलेलाखी, सेनगेणी; लॅ. व्हायटेक्स ल्यूकोझायलॉन; कुल – व्हर्बिनेसी). हा लहान ते मोठ्या आकारमानाचा वृक्ष दख्खन द्वीपकल्पात सस.पासून सु. ९०० मी. उंचीपर्यंत बहुतेक सर्वत्र आढळतो. उत्तरेस त्याचा प्रसार झांशीपर्यंत असून बिहारच्या काही भागांतही तो आढळतो. तो मुख्यतः ओढ्या-नाल्यांच्या काठांवर वाढलेला आढळतो. त्याचे खोड आखूड व जाड असून माथा पसरट असतो. साल करडी व गुळगुळीत असते. पाने ३–५ दलांची असून दलांची तळाची जोडी इतर दलांपेक्षा बरीच लहान असते. फुले पांढरी असून त्यांवर किरमिजी केस असतात. ती सुवासिक असून पुष्पबंधाक्षीय विरळ गुलुच्छ-वल्लरीवर कक्षास्थ (बगलेतील) फुलोऱ्यावर येतात [ ⟶ पुष्पबंध]. अश्मगर्भी फळ (आठळीयुक्त) व्यस्त अंडाकृती व दोन सेंमी. लांब असून पिकल्यावर गर्द किरमिजी होते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ व्हर्बिनेसी (साग) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सोनगर्बीचे लाकूड करडसर पांढरे ते करडसर तपकिरी असते. ⇨ बनलगायच्या लाकडाप्रमाणे त्यातही फ्लॅव्होन हे द्रव्य असते. हे फ्लॅव्होन पाण्यात तात्काल विरघळते व त्यामुळे पाण्याला पिवळसर हिरवी छटा येते. मध्यकाष्ठ स्पष्टपणे दिसत नाही. लाकूड चमकदार, गुळगुळीत, एकसारख्या पोताचे, चिवट व मध्यम कठीण परंतु बनलगायच्या लाकडापेक्षा हलके असते. त्याचे विशिष्ट गुरुत्व ०·६१ आणि वजन ६२५ किग्रॅ. प्रति घ.मी. असते. ते कापण्यास व रंधण्यास सोपे असून गुळगुळीत होते. त्याचा वापर मुख्यतः बांधकामासाठी करतात. विशेषतः तमिळनाडूत ते बैलगाडीच्या चाकांसाठी वापरतात. लाकडातील लहान व नियमित छिद्रे आणि आकर्षक रंगामुळे ते विशेषेकरून शोभिवंत सजावटी सामान व इतर कामांसाठी वापरतात.

सोनगर्बीची साल व मुळे स्तंभक (आकुंचन करणारी) असून मुळांचा उपयोग ज्वरनाशक (ताप कमी करणारे) म्हणून करण्यात येतो. जुनाट पडसे व डोकेदुखी घालविण्यासाठी पानांचा धूर ओढतात. मध्य प्रदेश राज्यामध्ये तापात व पांडुरोगात सोनगर्बीची पाने घालून तापविलेल्या पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी करतात. ताजी परिपक्व पाने शोथासाठी (दाहयुक्त सूज), वेदनाशामक आणि ऊतकद्रव्य (सूक्ष्मशारीरद्रव्य हिस्टामिन-एखाद्या गोष्टीला व्यक्तीने हात लावला, ती खाल्ली किंवा तिचा वास घेतला वा जखम झाल्यावर शरीराची प्रतिकूल प्रतिक्रिया होते; त्यावेळी शरीर निर्माण करते ते रासायनिक द्रव्य) निर्माण करणारी असतात.

जमदाडे, ज. वि.