पित्तकारी : (पित्तमारी, अंतमूळ, खडकी रास्‍ना हिं. अंतमूल, जंगली पीकवान क. किरूमंजि लॅ. टायलोफोरा इंडिका किंवा टा. ॲस्थमॅटिका कुल-अस्क्लेपीएडेसी). फुलझाडांपैकी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वलयिनी (वेल) कुंपणावर आणि उघड्या जंगलात तसेच खोल व रेताड जागी वाढते भारतात (१,००० मी. उंचीपर्यंत) बहुतेक सर्वत्र तसेच श्रीलंका, थायलंड, मलेशिया इ.ठिकाणी आढळते. मुळे अनेक, लांब व मांसल पाने साधी, समोरासमोर, ५-१० सेंमी., अंडाकृती किंवा दीर्घवृत्ताकृती, लांबट आणि तळाशी हृदयाकृती फुले मोठी, हिरवट पिवळी, चवरीसारख्या वल्लरीवर ऑगस्ट ते नोव्हेंबरात येतात. फुलांत केसरमंडल आणि किंजमंडल यांच्यापासून बनलेली संरचना (किंजकेसराक्ष) आढळते [⟶ फूल ]. पेटिकाफळांची जोडी असून प्रत्येक फळ ७-१० सेंमी. लांब, रेषांकित व टोकदार असते बियांवर केसांचा झुबका असतो. [⟶ अस्क्लेपीएडेसी ].

पित्तकारी : (1)फुलोरऱ्यासंह फांदी, (2) फूल, (3) पाकळ्यांशिवाय फूल, (4) किंजकेसाराक्ष

या वनस्पतीचा ⇨इपेकॅकऐवजी अतिसाकावर उपयोग करतात. पाने वांतिकारक (ओकारी काढणारी), स्वेदकारक (घाम आणणारी) व कफोत्सारक (कफ काढून टाकणारी) असतात. फार खाल्ल्याने पोट भरल्यास व इतर वेळी वांतीसाठी देतात. नूतन व रक्ती आवेत याची मात्रा देताना अफू व सुंठ देतात, म्हणजे उलटी न होता विकार कमी होतो. ताज्या मुळाची साल पाण्यात उगाळून दिल्यास उलटी व जुलाब होतात. पित्तप्रकोपातही हेच देतात. अंगदुखीत व संधिवातात मुळे स्वेदजनक व मूलत्र (लघवी साफ करणार्‍या द्रव्याबरोबर देतात. मुळाचा फांट [⟶ औषधिकल्प ] दम्यावर देतात. या वनस्पतीत टायलोफोरिन व टायलोफोरिनीन ही अल्कलॉइडे असतात.हवेत वाळविलेल्या मुळापासून ०.१८ % रंगहीन स्फटिकी घन पदार्थ मिळतो बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल ०.२६ % असते. पानांचा काढा आणि मुळांच्या सालीचा फांट अतिसार, दमा आणि श्वासनलिकादाह यांवर गुणकारी असल्याचे आढळले आहे.

जमदाडे, ज.वि.