डिफेनबेकिया : (कुल-ॲरेसी). फुलझाडांपैकी (एकदलिकित) या वंशातील वनस्पती मांसल व काहीशा झुडपासारख्या पण ⇨ ओषधी असून मूळच्या त्या उष्ण कटिबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील आहेत, तथापि सु. तीस जाती व अनेक प्रकार आता सर्वत्र आढळतात. त्या भारतात बागेत शोभेकरिता लहान मोठ्या कुंड्यांत लावतात. खोड आडवे किंवा उभे वाढते व फांद्या थोड्या असतात पाने साधी, मोठी, विविधवर्णी, एकाआड एक व आकर्षक असतात. सावलीत वाढविणे शक्य असल्याने घरात किवा पादपगृहात (विशिष्ट प्रकारे काही वनस्पती वाढविण्याच्या गृहात) काही जाती शोभेकरिता ठेवता येतात, तर इतर काही उघड्यावरही वाढतात. जून झाडे टोकास फुगीर, वाकडी व वजनदार होत असल्याने ती छाटून त्याची कलमे प्रथम वाळूत वाढवतात व नंतर कुंड्यात लावतात फुले एकलिंगी व परिदलहीन असतात ती काढून टाकली नाही तर पाने लहान होतात व झाड कमजोर होते [→ फूल]. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ॲरॉइडी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. डिफेनबेकिया सेग्विने (इं. डंब केन) ह्या वेस्ट इंडीजमधील जातीचा रस अत्यंत कडू असून तिचा कोणताही भाग चावल्यास सूज येते, जीभ लुळी पडते व बोलणे अशक्य होते म्हणून गुलामांचा छळ करण्यास पूर्वी वापरत असत. हिची पाने मलायात संधिवातावर व सुजेवर वापरतात त्यांच्या चूर्णाचे पोटिस लावतात किंवा तेलात उकळून चोळण्यास वापरतात.

 डिफेनबेकिया सेग्विने

जमदाडे, ज. वि.