सुंद्री-चांद : ( सुंद्री इं. लुकिंग ग्लास प्लँट लॅ. हेरिटिएरा लिटोरॅलिस कुल-स्टर्क्युलिएसी ). हा मध्यम आकाराचा लहान वृक्ष उष्णकटिबंधीय देशांच्या (अमेरिकाखेरीज) समुद्रकिनारी आढळतो. हा वृक्ष भारतीय उपखंडात पूर्व आणि पश्चिम द्वीपकल्प, प. बंगाल, अंदमान, उ. कारवार इ. ठिकाणी व म्यानमारमध्ये आढळतो. साल गर्द करडी, उभ्या भेगा असलेली सर्व कोवळ्या भागावर खाली रुपेरी लव पाने १२–२० × ५–१० सेंमी. फुले लहान, नारिंगी व अनेक स्त्री-पुष्पे व पुं-पुष्पे संयुक्त मंजरीत असून त्यांना पाकळ्या नसतात. परागकोश पाच असून फुले पावसाळ्यात येतात. फळे एक-त्रिखंडी, प्रत्येक खंड पिंगट व कठीण, २·५– ७·५ सेंमी. लांब बी २·५ सेंमी. लांब व खाद्य. कोळी लोकांची मासेमारीची जाळी मजबूत करण्यासाठी फळ, बी व काष्ठ यांतील टॅनिन उपयुक्त असते. लाकूड जळणासाठी तसेच बैलगाड्या, नावा वगैरे किरकोळ कामांस वापरतात.

पहा : स्टर्क्युलिएसी.

नवलकर, भो. सुं.