माइनमुळेमाइनमूळ : (माईणमूळ, मायमूळ गु. गरमर सं. मायिणी लॅ. कोलियस बार्बेटस, को. फेर्स्कोलाय कुल-लॅबिएटी). या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), ३०–६० सेंमी. उंच, शाखायुक्त, सुगंधी ⇨ ओषधीचा प्रसार भारत, नेपाळ, श्रीलंका, उष्ण कटिबंधी आफ्रिका येथे आहे. भारतात ही कुमाऊँ हिमालयात २,४४० मी. उंचीवर, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र व बिहार येथे आहे. महाराष्ट्रात करंजा टेकड्या, दापोली, मावळ, पुरंदर, सांगली, कोल्हापूर इ. ठिकाणी ही आढळते. हिची मुळांसाठी लागवडही केली जाते. मुळे जाड व मांसल असतात. खोड दंडगोलाकार, बळकट, उभे काहीसे शाखायुक्त, ते तळाशी काष्ठयुक्त असते. तशाच फांद्याही काष्ठयुक्त असून त्यांवर लवदार लांब केस असतात. पाने दीर्घ वर्तुळाकार आयताकृती, विशालकोनी, स्थूलदंतुर, दोन्ही बाजूंनी लवदार असून त्यांचा तळ सामान्यतः  निमुळता होत गेलेला असतो. फुले मोठी, आकर्षक, ६–१० च्या मंडलांत (वेढ्यांत), सुरुवातीला काहीशी जवळ व नंतर अंतराअंतराने १५–३० सेंमी. किंवा त्यापेक्षा लांब कणसासारख्या मंजरीवर सप्टेंबरमध्ये येतात. फुलोऱ्याच्या दांड्यावर दाट, ग्रंथियुक्त केस असतात. छदे (फुलोरा वा फुले ज्यांच्या बगलेत येतात अशी पाने) मोठी, सुस्पष्ट व फुले येण्यापूर्वी परिहित (आत वळलेली) असतात. फलधारक संवर्तावर बहुधा जांभळी छटा, बाहेरील बाजूवर पांढरे केस व घशात पांढऱ्या केसांचे एक वलय (कडे) असते. वरचा ओठ अंडाकृती, लघुकोनी, प्रकुंचित, अखंड, शिरायुक्त व खालच्या ओठापेक्षा थोडासा लांब असतो. खालचा ओठ काहीशा समान, निरुंद,त्रिकोनी, आराकृती, टोकदार अशा चार दातांचा बनलेला असतो. पुष्पमुकुट फिकट जांभळा किंवा निळा, जवळजवळ २ सेंमी. लांब नलिका जवळजवळ ९० अंशांनी वाकलेली, मुख तिरपे वरचा ओठ आखूड, उभा व चार उथळ गोलसर खंडांचा (भागांचा) खालच्या ओठाची तळाशी वृंतीय अरुंद मान बनते. तो नौकाकृती असतो आणि तो वरच्या बाजूला अशा तऱ्हेने वाकलेला असतो की, त्यामुळे नौकाकृती भाग अरुंद मानेच्या पुढे क्षितिजसमांतर डोकावतो. तंतू एकत्र येऊन तळाशी एक आवरण बनते [⟶ फूल]. कपालिका (लहान आठळी फळे) गोलसर, लहान, गुळगुळीत व काळ्या असतात. याची इतर लक्षणे लॅबिएटी वा तुलसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

को. बार्बेटस ही जाती काफिर पोटॅटो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंदमुळाच्या सर्व प्रकारांची जंगली पूर्वज समजली जाते.

माइनमूळ वनस्पती तिखट, गोड, दीपक (भूक वाढविणारी), रुचिकर, कडू, बलकर असून वायू, कफ, गुल्म (शरीरास निरूपयोगी गाठ), शीतज्वर यांचा नाश करते. हिची मुळे सूज, कृमी (जंत), प्लीहा (पानथरी), गुल्म, संग्रहणी (जलोदर), उदर व मूळव्याध यांच्या विकारांची नाशक आहेत. मुळांचे लोणचे तयार करतात.

पहा : कोलियस.

जमदाडे, ज. वि.