वरी : (वरई हि. चेना, बरी क. बरगू गु. चेनो सं. वरक इं. कॉमन मिलेट, प्रोसो मिलेट, हॉग मिलेट लॅ. पॅनिकम मिलिएशियम कुल-ग्रॅमिनी). उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत हे ⇨ तृणधान्य लागवडीत आहे. हे मूळचे मध्य किंवा पूर्व आशियातील असावे. गव्हाइतकेच पूर्वापार हे पीक लागवडीत आहे. भारताखेरीज हे मंगोलिया, मांचुरिया, जपान, दक्षिण व मध्य रशिया, मध्य यूरोप, अमेरिका, इराण,इराक, सिरिया, अरबस्तान इ. प्रदेशांत याची लागवड केली जाते. ही वनस्पती [⟶ ओषधि] सु. ०.९ ते १ मी. उंच, वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारी) असून हिची पाने लांबट (१५३० सेंमी. लांब व ६२० मिमी. रुंद) असतात. खोडाच्या टोकावर अनेक फांद्यांचा फुलोरा [परिमंजरी ⟶ पुष्पबंध] सप्टेंबरात येतो. परिमंजिरी सु. ४५ सेंमी. लांब, दाट अथवा विरळ असून कणिशके फांद्यांच्या टोकांवर, ४-५ मिमी. लांब, एक एकटी अथवा जोडीने, केशहीन, हिरवी अथवा तपकिरी हिरव्या रंगाची असतात. फळाचे (सस्यफल दाणा) बाह्यावरण(टरफल) तपकिरी, पिवळे अथवा पिवळसर असते. दाणे सडून आतील पांढरे तांदळासारखे दाणे (गाभा) शिजवून खातात. विशेषतः उपवासाच्या दिवशी याचा जास्त वापर करतात. या दाण्यांना ‘वऱ्याचे तांदूळ’ अथवा ‘भगर’ म्हणतात. याचा इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी कुलात अथवा तृण कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.   

ठोंबरे, म. वा.

वरी हे जलद वाढणारे व रुक्षताविरोधी पीक आहे. भारतात हे डोंगराळ भागात घेतात. हे पीक मुख्यत्वे तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांत आणि बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात थोड्या प्रमाणात लागवडीत आहे. महाराष्ट्रात या पिकाखाली सु. ७५,००० हे. क्षेत्र असून ते मुख्यत्वेकरून ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांत आहे.

 

वरी : पानांसह फुलोरा प्रकार : वनस्पतीचा रंग, तिच्यावरील केस आणि दाण्यांचा रंग या बाबतींत या पिकात फार भिन्नता आढळते. त्यामुळे या पिकाचे अनेक प्रकार आहेत. तमिळनाडूत पी. व्ही. १४ व पी. व्ही. ३६ व महाराष्ट्रात वरी-१० ह्या सुधारित जाती लागवडीत आहेत. अलीकडे ‘को -१’  ह्या ९०९५ दिवसांत तयार होणाऱ्या जातीची शिफारस केली आहे. 

हवामान व जमीन : या पिकाला दमट व उबदार हवामान व थोड्या मुदतीचा पावसाळा लागतो. सर्वसाधारणपणे हे पीक हलक्या प्रकारच्या जमिनीत घेतात. सर्व तृणधान्यांत या पिकाची पाण्याची गरज अगदी कमी आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर न पडल्यास व त्यामुळे इतर पिकांच्या पेरणीचा हंगाम चुकल्यास त्या ठिकाणी हमखास येणारे वरीचे पीक घेतात. वाळूचे प्रमाण फार असलेल्या जमिनीखेरीज इतर कोणत्याही जमिनीत हे पीक येते. पठारी आणि उंचावरील प्रदेशांत हे पीक चांगले येते. हिमालयात २,७०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशातही हे पीक वाढते.

तमिळनाडू व गुजरातच्या काही भागांत विहिरीच्या पाण्याखाली हे पीक घेतात. इतरत्र हे पावसाच्या पाण्यावर येणारे कोरडवाहू पीक आहे.  

 

लागवड : जमिनीची पूर्व मशागत ⇨ नाचणीच्या पीकाप्रमाणे करतात. पेरणी जुलै महिन्यात बी फोकून अथवा पाभरीने दोन ओळींत २२२५ सेंमी. अंतर ठेवून करतात. नाचणीप्रमाणे रोपांचे स्थलांतर (लागण) करूनही लागवड करतात. ही पद्धत महाराष्ट्रात विशेष प्रचलित आहे. फोकून अथवा पाभरीने पेरणीसाठी हेक्टरी ८ ते १० किग्रॅ. बी लागते. स्थलांतर पद्धतीत ३ ते ४ किग्रॅ. बियांपासून तयार झालेली रोपे १ हेक्टर क्षेत्रासाठी पुरतात. भाताप्रमाणे राब भाजून तयार केलेल्या वाफ्यात प्रथम बी पेरतात. रोपांचे स्थलांतर जुलै महिन्यात करतात. या पिकाला सहसा खत देत नाहीत. बागायती पिकासाठी हेक्टरी ५-८ टन शेणखत अथवा कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळतात व पेरणीच्या वेळी (मार्च-एप्रिल महिन्यात) २५ किग्रॅ. नायट्रोजनयुक्त आणि २० किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल वरखताच्या रूपाने देतात. बागायती पिकाला दोन वेळा पाणी देतात. 

 

रोग व किडी : या पिकाला रोग व किडींचा विशेष उपद्रव होत नाही. कधीकधी यावर काणी रोग आढळतो. गंधक चोळून बी पेरल्यास या रोगाला आळा बसतो. 

पेरणीपासून ९० ते २०० दिवसांत पीक काढणीसाठी तयार होते. पीक तयार झाल्यावर ताबडतोब न कापल्यास दाणे शेतात गळतात. ते जमिनीलगत कापून पेंढ्या हाताने झोपवून अथवा लागलीच बैलाच्या पायाखाली तुडवून मळणी करतात. मळणीस उशीर झाल्यास दाणे गळतात. 

उत्पन्न : कोरडवाहू पिकाचे हेक्टरी ४०० ते ६०० किग्रॅ. व बागायती पिकाचे १,१२५ ते १,७०० किग्रॅ. (दाणे) उत्पन्न मिळते. पेंढ्यांचे हेक्टरी उत्पादन दाण्याइतके अगर थोडे जास्त (१,००० ते २,५०० किग्रॅ.) असते. ही वैरण जाडीभरडी असते पण दुष्काळात ती उपयोगी पडते. बागायती पिकाची वैरण गुरांसाठी चांगली असते.

रासायनिक संघटन : वरीच्या दाण्यात जलांश ११.९०%, प्रथिने १२.५%, वसा १.१%, कार्बोहायड्रेटे ६८.९%, तंतू २.२% व क्षार ३.४% असतात.

उपयोग : वऱ्याचे तांदूळ पौष्टिक असून त्याचा भात करतात व पिठाच्या भाकरी करतात. वरी भाजून लाह्या करतात. पेंढा जनावरांना खाऊ घालतात. परदेशात डुकरांच्या खाद्यासाठी वरीचा उपयोग करतात. काही ठिकाणी यापासून मद्य बनवितात. ही वनस्पती परम्यावर गुणकारी समजली जाते.

संदर्भ :  1. Aiter, A. K. Y. N. Field Crops of of India, Bangalore, 1958.

             2. C. S. I. R.  The Wealth of India, Raw Materials, Vol. Vll, New Delhi, 1966.

             3. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.

             4. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Fild Experimentation, Poona, 1972. 

तत्त्ववादी, गो. रा. गोखले, वा. पु.