पोथॉस

पोथॉस ऑरिया : ( पोथॉस ऑरियस पो. औरिया ). ⇨ अंजनवेलीच्या वंशातील व ⇨ रॉइडी कुलातील ही शोभेची मोठी वेल [→ महालता] ⇨ अपिवनस्पतीप्रमाणे वाढते. ही इंग्लंडमध्ये १८८० साली सॉलोमन बेटांतून नेली गेली. भारतात व इतरत्र बागेत सावलीत लावली जाते. कमानी, मंडप, इतर मोठी झाडे यांवर चढवून दिल्यास शोभेत भर पडते. ती सदापर्णी, बहुवर्शायू (अनेक वर्षे जगणारी) असून आगंतुक वायवी मुळ्यांनी चिकटून वर चढते. पाने साधी, एकाआड एक, मोठी, गर्द हिरवी, लांब सपक्ष देठाची, जाड टोकदार, हृदयाकृति-अंडाकृती असून विविध आकाराच्या पिवळट-शेंदरट (काही प्रकारात रुपेरी) ठिपक्यांनी चितारलेली असतात. हिची सामान्य शारीरिक लक्षणे अंजनवेलीत वर्णिल्याप्रमाणे असून फार मंद प्रकाशात वाढविल्यास पानांवरील पिवळट ठिपके कमी होतात. बाटलीत किंवा जलजीव पात्रात (जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवलेल्या पात्रात) फक्त पाण्यात ती बरेच दिवस जगते व मंदपणे वाढते. फाटे लावून अभिवृद्धी (लागवड) करता येते. हिला द्विलिंगी फुलांचे फुलोरे [स्थूलकणिशे → पुष्पबंध] पानांच्या बगलेत किंवा देठाच्या जवळपास येतात. मृदुफळे लांबट व लहान असून बिया १–३ असतात ए. एंग्लर या वनस्पतीविज्ञांनी हिचा अंर्तभाव सिंडॅप्सस वंशात केला असल्याने हिला सिडॅप्सस ऑरिया या नावानेही ओळखतात. सामान्य लोकांत ‘मनी प्लँट या नावाने ती परिचित आहे.

गजपिप्पली : (गजपिंपळी, करिपिप्पली, हत्तिपिंपळी लॅ. पो. ऑफिसिनॅलिस, सिंडॅप्सस ऑफिसिनॅलिस). पोथॉस ऑरिया व ही वेल समवंशी असल्याने अनेक लक्षणांत त्यांचे साम्य आहे. ही बंगालमधील मिदनापूर भागात विपुल आढळते, तसेच उपहिमालयात (३३०–१,००० मी. उंचीत) व अंदमान बेटांत आढळते. हिचा प्रसार दक्षिणेस आंध्र प्रदेशांत झाला आहे. फुलोऱ्यावरील महाछद बाहेरून हिरवा व आत पिवळा असतो. हिच्या मृदुफळाच्या सुकविलेल्या चकत्या बाजारात मिळतात. त्यात स्टेरॉल आणि सिंडॅप्सिन ए व बी अशी दोन ग्लुकोसाइडयुक्त रंगद्रव्ये असतात. या चकत्यांचा काढा व चूर्ण औषधात वापरतात. दमा, खोकला आणि जुलाब यांवर चूर्णाच्या काढ्याचा उपयोग करतात अंगदुखीत वा सांधेदुखीत त्याचा लेप करतात. हे चूर्ण तिखट, सुगंधी, उत्तेजक, स्तंभक (आंकुचन करणारे), ज्वरनाशक, कृमिनाशक. पौष्टिक, कामोत्तेजक व वायुनाशी असते इतर् औषधी घटकांत मिसळून देतात. खोडापासुन धागा मिळतो पानांची भाजी करतात. कौटिलीय अर्थशात्रात या वनस्पतीचा उल्लेख मद्यवर्गात केलेला आढळतो हिचे गुणधर्म काही अंशी तरी काळी (इ.स.पू. तिसरे शतक) माहीत होते, हे उघड आहे.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं, आ.