कासूद, ब्रह्मी : (इं.बर्मीज पिंक कॅसिया लॅ. कॅसिया रेनिजेरा कुल-लेग्युमिनोजी, सीसॅल्पिनिऑइडी). सुंदर फुलोऱ्याकरिता बागेत व रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यास उपयोगात असलेला हा लहान, डौलदार, शिंबावंत (शेंगा येणारा) व पानझडी वृक्ष बाहवा, तरवड, कासूद इत्यादींच्या वंशातील असल्याने ह्याचे अनेक शारीरिक लक्षणांत त्यांच्याशी साम्य दिसून येते. १९०२ मध्ये रंगूनहून याचा प्रथम मुंबईत प्रवेश झाला व त्यानंतर तो भारतात इतरत्र व मलेशियात पसरला. तो मूळचा उत्तर ब्रह्मदेशातील रूक्ष जंगलातील आहे. याची उंची ५⋅५० ते ६⋅४० मी. असते. पाने संयुक्त आणि पिसासारखी, १०⋅३० सेंमी. लांब उपपर्णे मूत्रपिंडाकृती (यावरून जातिवाचक लॅटिन नाव पडले) दले ८—२० जोड्या, दल मऊ व लंबगोल असते  [→पान] . पाने डिसेंबर–मार्चमध्ये झडतात. एप्रिलनंतर कळ्यांना सुरुवात होऊन प्रथम लालसर, आकर्षक गुलाबी फुले व नंतर पाने मे ते जुलैपर्यंत येत असतात. फुले मोठी व पडलेल्या पानांच्या व्रणाजवळ झुबक्यांनी येतात. जून फुले पांढरट होतात. दहा केसरदले (पुंकेसर) भिन्न लांबींची असून सर्वांत लांब अशा तिन्हींचे तंतू मध्यभागी फुगीर असतात. शेंग बाहव्याप्रमाणे ३०—६० सेंमी. लांब असते. हा वृक्ष फार शोभिवंत, जलद वाढणारा आणि फुलणारा असल्याने विशेषेकरून शोभेकरिता उपयोगात आहे. नवीन उत्पत्ती बियांनीच होते.

पहा : कासूद तरवड बाहवा लेग्युमिनोजी.

परांडेकर, शं.आ.

ब्रह्मी कासूद :(१) फांदी,(२) फुलोरा,(३) फूल, (४) शिंवा,(५) बी.