हरमला (पेगॅनम हर्मला) : (१) पानांफुलांसहित फांदी, (२) फूल, (३) फळ (बोंड) .

हरमला : [हिं. हरमल, इस्बंद लाहौरी सं. हरमला, सोमा गु. इस्पून क. ईमे गोरंटी इं. फॉरेन हेन्ना, सिरियन वाइल्ड रू, आफ्रिकन रू लॅ. पेगॅनम हर्मला (पे. डौरिकम) कुल-झायगोफायलेसी]. सुमारे ३०–९० सेंमी. उंचीचे व द्विशाखाक्रमी किंवा गुलुच्छासारखे फांद्यांचे हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) क्षुप आहे. ही वनस्पती भारतात तसेच पाकिस्तान, इराण, मध्य व पश्चिम आशिया, यूरोप व उत्तर आफ्रिका आणि भूमध्य सामुद्रिक भाग येथे आढळते. ती हिमालयात लडाख व काश्मीर दऱ्यांत सस.पासून ३००–२,४०० मी. उंचीवर आणि अफगाणिस्तान ते काश्मीरपर्यंत आढळते. हिची पाने बिनदेठाची, एकांतरित, असम व पिच्छाकृती, ५–८ सेंमी. लांब, बहुखंडित खंड अरुंद रेखाकृती असतात. फुले एकाकी, पिवळसर पांढरी, २.५–३.८ सेंमी. व्यासाची, प्रदले व्यस्त अंडाकृती, १.५–२ सेंमी. लांब व ६–९ मिमी. रुंद असून ती एप्रिल – ऑक्टोबरमध्ये येतात. बोंड गोलसर, गुळगुळीत, १–१.५ सेंमी. व्यासाचे व तीन कप्प्याचे त्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त बिया बी सपाट, कोनीय व तपकिरी रंगाची असते.

हरमला वनस्पती वाजीकर, गर्भपातक, आर्तवजनक व दुग्धवर्धकआहे. मुळे उगाळून मोहरीच्या तेलाबरोबर डोक्यातील उवांकरितालावतात. पानांचा काढा संधिवातावर देतात. बी मादक असून ज्वर, पोटशूळ व पट्टकृमीवर गुणकारी असते. बियांपासून ‘टर्की रेड’ नावाचेलाल (तांबडा) रंजक तयार करतात. पश्चिम आशियात त्याचा उपयोग गालिचे आणि लोकर रंगविण्यासाठी करतात. बिया व पाणी यांपासून काढलेल्या अर्कापासून अनुस्फुरक पिवळसर रंजक, तर बिया व अल्कोहॉल यांपासून काढलेल्या अर्कापासून तांबडा रंजक मिळतो. खोड, मूळ व बिया यांचा उपयोग शाई तयार करण्यासाठी तसेच अभिरंजक व गोंदण यांमध्ये होतो.

हरमला वनस्पती वेदनानाशक व दाहरोधक असून विषण्णतेवर उपयुक्त आहे. पे. हर्मला पासून प्रयोगशाळेत तयार केलेल्या हर्मलिनामुळे मध्यवर्तीतंत्रिका तंत्र उत्तेजित (उद्दीपित) होते. बियांमध्ये हर्मीन व हर्मलीन ही अल्कलॉइडे असतात.

पहा : झायगोफायलेसी.

चौगले, द. सी. मगर, सुरेखा अ.