पॅन्सी (व्हायोला ट्रायकलर): (१) फूल व पाने यांसह वनस्पती, (२) फुलाचा उभा छेद, (३) तडकलेले फळ, (४) बीज, (५) बिजाचा उभा छेद.व्हायोला : द्विदलिकित (बियांतील गर्भात दोन दलिका असलेल्या) फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] एका प्रजातीचे हे शास्त्रीय नाव आहे. हिचा समावेश परायटेलीझ गणाच्या व्हायोलेसी कुलात होतो. या प्रजातीत सु. चारशे (जे. सी. विलीस यांच्या मते पाचशे) जाती मोडतात. त्या व्हायोलेट व पॅन्सी या सामान्य इंग्रजी नावांनी ओळखल्या जातात. त्या वर्षायू, द्विवर्षायू किंवा बहुतेक बहुवर्षायू औषधी (लहान व नरम) व काही थोड्या क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार सर्वत्र, तथापि समतिशोष्ण प्रदेशात विशेषकरून आहे. बागांतून शोभेकरिता अनेक जाती व प्रकार यांची लागवड केली जाते. भारतात आठ जाती असून त्यांपैकी सहा हिमालयाच्या परिसरात आढळतात. व्हायोलाच्या जातींतील क्षुप प्रकार अँडीज पर्वत, सँडविच बेटे व युरोप येथे आढळतात. सर्वच औषधीय जातींत खोड कधी लहान भूमिस्थित (मूलक्षोड) असते, तर कधी वायवी (हवाई), सरळ व जास्तीत जास्त सु. अर्धा मीटरपर्यंत उंच वाढते. पाने साधी, मूलज (मुळाच्या टोकापासून आलेली) किंवा स्कंधोद्भव (हवेत वाढणाऱ्या खोडावर आलेली), एकाआड एक, सोपपर्ण, बहुधा हृदयाकृती किंवा इतर विविध आकारांची, दातेरी किंवा खंडित असून त्यांच्या कक्षेतून एक पुष्पी दांडा येतो. उपपर्णावर (पानाच्या तळास असलेल्या उपांगावर) कधी प्रपिंडे (ग्रंथी) असतात. फुले द्विलिंगी, पंचभागी, अनियमित, विविधरंगी व पुढील दोन प्रकारची असतात : (१) मोठी, आकर्षक, वायवी, परपरागित [→ परागकण] व मुक्तपणे उघडणारी पण बहुतेक व्यंध (२) लहान, वायवी किंवा क्वचित पूर्णपणे मिटलेली भूमिस्थित, स्वपरागित फलोत्पादक व मुग्ध. पहिल्यात पुष्पमुकुटाची खालची पाकळी मोठी, आकर्षक व शुंडिकायुक्त (लांबट नळीसारखा अवयव असलेली) असून बाजूच्या चार पाकळ्यांच्या दोन विषम जोड्या असतात. पाच केसरदले आखूड व अंतःस्थित असून किंजपुटाभोवती जुळलेल्या परागकोशाचे वलय असते, त्यातून किंजल व किंजल्क वर डोकावतात. दोन केसरदलांपासून खाली शुंडिकेत मधुरस स्रवणारी दोन उपांगे असतात. किंजदले (स्त्री-केसरे, ३-५) जुळलेली व ऊर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा असून बीजकविन्यस तटलग्न (बीकजकांची मांडणी किंजपुटाच्या भिंतींवर ) असतो. संवर्त दीर्घस्थायी (सतत राहणारा) व बोंडाखाली ठळकपणे दिसतो. बोंडात अनेक कठीण बिया असतात. बोंड बहुधा तडकून त्याची नावेसारखी तीन शकले होतात आणि बिया दोन ते तीन मीटरपर्यंत फेकल्या जातात. काहींत मृदुफळ किंवा कपाली (कठीण आवरणाचे फळ) असते. कित्येक जातींत या बिया वंध्य असतात. मुग्ध पुष्पे न उघडता स्वपरागणानंतर जमिनीत असल्यास वर येतात व बोंड तडकून बिया विखुरतात, या बिया जननक्षम असतात. या वनस्पतींची लागवड बियांनी करतात किंवा मूलक्षोडाचे भाग करून लावतात.

पॅन्सी (व्हायोला ट्रायकलर) व बनफ्‌‍शा (व्हा. ओडोरॅटा, स्वीट व्हायोलेट) सामानपणे बागेत लावतात. बनफ्‌शाच्या फुलांपासून सुगंधी व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल काढतात, त्याचा सौंदर्यप्रसाधने व सुगंधी द्रव्ये यांकरिता उपयोग करतात. फुले मिठाईत घालतात. पानांचा चहा खोकल्यावर घेतात. ही वनस्पती स्वेदकारी (घाम आणणारी), ज्वरनाशी असून तिचे मूळ वांतिकारक असते. व्हा. ट्रायकलरची पाने व फुले यांचाही चहा खोकल्यावर उपयुक्त असतो. स्पेनमध्ये त्याचा उपयोग संधिवात व त्वचारोगांवर करतात, तसेच त्याचा फांट कातडीवर येणार्याप पुरळासारख्या विकारांवर देतात. मुळांचा फांट लहान मुलाच्या आमांशावर गुणकारी ठरला आहे. हिमालयात आढळणाऱ्या सहा जाती औषधीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. बनफशा हे पार्शियन नाव व्हा. सिनेरिया, व्हा. सर्पेन्स या हिमालयीन जातींनाही लावलेले आढळते. व्हा. स्टॉक्साय ही जाती गुजरातेत (काठेवाड) व सिंधमध्ये सापडते. तिला जुलै-ऑगस्टमध्ये पांढरट निळी फुले येतात. काही जातींचा खाण्यासाठी (कच्च्या किंवा शिजवलेल्या स्वरूपात) तसेच दारू निर्मितीसाठीही उपयोग करतात.

कुलकर्णी, सतीश वि. परांडेकर, शं. आ.