मालवण : महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे मुख्य ठिकाण व अरबी समुद्रावरील छोटे बंदर. लोकसंख्या १७,३१९ (१९८१). हे रत्नागिरीच्या दक्षिणेस स्थलमार्गे सु. १६० किमी. अंतरावर असून याच्या ईशान्येस कोल्हापूर हे जवळचे (सु. १५० किमी.) रेल्वे स्थानक आहे.

या भागातील व्यापाराचे व दळणवळणाचे हे शहर पूर्वीपासूनच प्रमुख केंद्र आहे. बंदराच्या पूर्वेस थोड्याफार प्रमाणात मिठागरे असून येथून मिठाची निर्यात केली जाते. मालवणच्या परिसरात कृषीव्यतिरिक्त मासेमारी, चर्मोद्योग, काजूकारखाने इ. प्रमुख व्यवसाय चालतात. मासेमारीसाठी दांडीचा किनारा हा भाग विशेष महत्त्वाचा आहे. मालवण परिसरात अभ्रक व चिनी मातीचे साठे आहेत. मालवणला मुख्यत्त्वे विहिरींद्वारे पाणीपुरवठा होतो. येथे चार माध्यमिक विद्यालये, एक प्रशिक्षण महाविद्यालय, एक कला व वाणिज्य महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन (स्था. १९८५) आहे. येथे १९१८ मध्ये नगरपालिका स्थापन करण्यात आली.

सागर किनाऱ्यालगत खडकाळ भागात, तीन छोटी बेटे तयार झाली आहेत. यांपैकी दोन किनाऱ्यांलगत असून तिसरे छोट्या अरूंद प्रवाहाने किनाऱ्यापासून वेगळे झाले आहे. दोन बेटांपैकी मोठ्या कुरटे बेटावर शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये बांधलेला सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला असून दुसऱ्या बेटावर पद्‌मगड हा भग्न किल्ला आहे. सिंधुदुर्गामुळे मालवणला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवाजी महाराजांनी या बंदरात काही सुधारणा करून ते आपले मुख्य सागरी केंद्र बनविले. त्यामुळे मालवणचे व्यापारी महत्त्व वाढले. पोर्तुगीज अंमलाचा दोन वर्षांचा कालखंड (१७४६–४७) सोडला, तर १७९२ पर्यंत इंग्रजांनी ते घेईपर्यंत मालवण मराठ्यांच्याच ताब्यात होते. ‘मोलंडी ’ नावाने ते त्यावेळी ओळखले जाई. करारानुसार १७६५ मध्ये इंग्रजांनी मालवणला कारखाना काढण्याचे ठरविले होते पण १७६६ मध्ये ते परत कोल्हापूरकरांच्या आधिपत्याखाली गेले. १७९२ मध्ये इंग्रजांनी परत तेथे कारखाना काढण्याचे ठरविले व नंतर ते इंग्रजांच्याच ताब्यात राहिले.

खाड्या, पुळणी आणि नारळाच्या बागा यांनी मालवणचे निसर्गसौंदर्य वाढले आहे. सिंधुदुर्गावर शिवाजी महाराजांचे मंदिर असून तेथे चैत्र नवमीला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मालवण येथे मौनी महाराजांचे मंदिर आहे. प्रसिद्ध मराठी नाटककार मामा वरेरकर यांचे बालपण मालवण येथे गेले. मालवणपासून ११ किमी. वर धामापूर येथे शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव अद्यापही सुस्थितीत आहे त्याच्या परिसरात रबराची लागवड करण्यात आली आहे. मालवणच्या उत्तरेस आचरा येथे बौद्ध व जैन लेणी नुकतीच सापडली आहेत. पर्यटन व्यवसाय हळूहळू वाढत आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमाकांची ‘सागरीय उद्यान योजना’ मालवणच्या परिसरात १९८५ पासून कार्यान्वित होत आहे.

पंडित, भाग्यश्री पटवर्धन, मधुसूदन