सुद्रबिलो : ( क. हूळगेरी लॅ. होलिगॅर्ना आर्नोटियाना कुल-ॲनाकार्डिएसी). हा सदापर्णी वृक्ष १०–१५ मी. उंच असून त्याचा प्रसार भारतात प. घाट, कोकण, उ. कारवार व कूर्गच्या सदापर्णी जंगलांत आहे. साल राखी रंगाची व गुळगुळीत, कोवळे भाग लवदार पाने मोठी, फांद्यांच्या टोकांस चमसाकृती, देठाकडे निमुळती, चिवट व चकाकीत फुले लहान, पांढरी, असंख्य, एकलिंगी, विभक्त झाडावर परिमंजऱ्यांवर जानेवारी-फेब्रुवारीत येतात. त्यांची रचना व शारीरिक लक्षणे ॲनाकार्डिएसी कुलात ( आम्रकुलात ) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ लहान, काळे, अश्मगर्भी लांबट व जून-जुलैमध्ये येते. खोड व फळाच्या सालीतून निघणारा राळयुक्त काळा रंग रोगण म्हणून व कापडावर पक्क्या काळ्या रंगाची नक्षी छापण्यास वापरतात. याचे लाकूड हलके, फिकट करडे, नरम आणि सतेज असून ते पाण्याच्या संपर्कात व वस्तूच्या आतील बाजूस वापरण्यास चांगले असते. ते घरबांधणी, नावा, होड्या, खोकी, गाड्या, आगकाड्या, आगपेट्या व पेन्सिलीकरिता उपयुक्त असते.

पहा : ॲनाकार्डिएसी.

जमदाडे, ज. वि.