भोरसळ : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फळांसह फांदी.

भोरसळ : (डोंड्रू, कोलाकडू हिं. भौलां, भ्रमरछली, भुरकड गु. अमरछला, डोंड्रो क. डोती, बंदरयप्णी सं. भ्रमरछलिका, उग्रगंधा लॅ. हायमेनोडिक्टिऑन एक्सेल्सम कुल-रुबिएसी). हा मध्यम आकाराचा (किंवा मोठा) पानझडी वृक्ष रुक्ष व मिश्र पानझडी जंगलात किंवा नद्यांच्या काठाने भारतात बहुतेक सर्वत्र (सु. १,५००-१,७०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. खोड सरळ, गोल, सु. ३० मी. उंच व पर्णसंभार (माथा) घुमटासारखा साल करडी भुरी, नरम आणि खवल्यांनी सुटून निघून जाते. पाने साधी, समोरासमोर, अंडाकृति-दीर्घवृत्ताकृती व मध्यम आकाराची सर्वंच भाग थोडे फार लवदार फुले लहान, हिरवट पांढरी, सुवासिक असून फांद्याच्या टोकांस उभ्या सरळ शाखायुक्त फुलोऱ्यावर  (परिमंजरीवर) दाटीने येतात. बोंडे लांबट, लहान परंतु बिया बारीक, असंख्य व सपक्ष (पंखधारी), इतर सामान्य लक्षणे ⇨रुबिएसीमध्ये (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. या वृक्षाला खोल व भुसभुशीत जमीन लागते उपहिमालयाच्या पट्ट्यातील बाहेरच्या टेकड्यांच्या पायथ्याशी खडकाळ व शुष्क आणि भुसभुशीत ढिगाऱ्यांत तो सर्वत्र वाढलेला आढळतो. त्याला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. बिया उन्हाळ्यात विखुरल्या जातात व पाऊस सुरु झाल्यावर रुजून उगवतात. कृत्रिम रीत्याही याची अभिवृद्धी (लागवड) करता येते. रोपांच्या लागवडीपेक्षा जाड फाद्यांच्या तुकड्यांनी लागवड चांगली होते. तोडलेल्या झाडांच्या खुंटांपासून फूट होऊन पुढे वाढ चालू राहते वृक्ष जलद वाढतो.

याची साल कातडी कमावण्यास वापरतात. ती स्तंभक (आकुंचन करणारी), कडू, तिखट असून रुची व भूक वाढविते ती ज्वरनाशक आहे. सालीत थोडे विषारी, स्फटिकी, अल्कलॉइड (हायमेनोडिक्टिओनीन) व एस्क्यूलीन आणि स्कोपोलेटीन असते. इंडो-चीनमध्ये लाकडाची पूड कातडीवर पुरळ उठल्यास लावतात. रंगविण्यास व गुरांना चारा म्हणून पाने वापरतात.

लाकूड प्रथम पांढरे व नंतर भुरकट करडे दिसते. ते नरम, हलके, चमकदार व सुतारकामास सोयीचे असते. सावलीत टिकण्यास चांगले. ते शेतीची अवजारे, स्वस्त सजावटी सामान, खेळणी, खोकी, आगकाड्या, फळ्या, चित्रांच्या चौकटी, पेन्सिली, रूळ, पालखी इ. विविध वस्तू बनविण्यास उपयुक्त असते.

जमदाडे, ज. वि.