जुई : (सं. यूथिका, मागधी, मुग्धी, सुचिमल्लिका हिं. जुही, जुई क. कदरमळ्ळिगे ल. जॅस्मिनम ऑरिक्युलेटम कुल- ओलिएसी). ही झुडपासारखी वेल मूळची उष्ण कटिबंधातील असून ती भारताच्या द्वीपकल्पात दक्षिणेकडे केरळापर्यंत आढळते. बागेतूनही तिची लागवड करतात. पाने बहुधा साधी, समोरासमोर, परंतु अनेकदा त्रिदली असून बाजूची दले फार लहान अथवा कर्णिकाकृती (कानाच्या पाळीसारखी). फुलोरा संयुक्त, अनेक फुले असलेली विरळ वल्लरी [→ पुष्पबंध] व तीवर लहान पांढरी सुगंधी फुले असतात. पुष्पमुकुट-नलिका १·२ सेंमी. लांब असून प्रत्येक पाकळीचा सुटा भाग दीर्घवर्तुळाकृती व ०.६ सेंमी. लांब असतो. एकूण संदले पाच व पाकळ्या पाच ते आठ व फूल समईसारखे (अपछत्राकृती) केसरदले दोन, दोन किंजदलांच्या ऊर्ध्वस्थ किंजपुटात दोन कप्पे [→ फूल] मृदूफऴ गोलसर, काळे व द्विखंडी बिया दोन किंवा चार इतर सामान्य लक्षणे पारिजातक कुलात [→ ओलिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

जमदाडे, ज. वि.

जुई : फुलोऱ्यासह फांदी

या वनस्पतीची लागवड सुगंधी फुलांसाठी भारतात सर्वत्र (विशेषत: उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल करतात उ. प्रदेशात गाझीपूर, जौनपूर, फरुखाबाद आणि कनौज येथे व्यापारी दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हिला निचऱ्याची व मध्यम प्रकारची जमीन लागते हिवाळी हंगामात जमीन नांगरून, कुळवून व खत घालून वाफे तयार करतात व त्यांत नोव्हेंबर-जानेवारीच्या दरम्यान वेलाचे तुकडे तीन मी. अंतरावर लावतात. पावसाळ्यात (जुलै-ऑगस्टच्या सुमारास ) फुले येण्यास सुरुवात होते. वेल वाढू लागले म्हणजे मांडवांवर चढवितात. फुले हलकी असल्याने ती एका किग्रॅ.मध्ये २६,००० पर्यंत मावतात. हेक्टरी सु. ९०–१८५ किग्रॅ. फुले मिळतात. ह्या सुगंधी फुलांतून ०·२० ते ०·३०% अत्तर निघते व ते गर्द तांबडे असते. फुलांपासून सुगंधी  तेलही तयार करतात. अत्तराला आणि तेलाला ताज्या फुलांच्या सुगंधासारखाच वास येतो तो जॅस्मिनच्या इतर जातींतील फुलांपेक्षा अधिक आल्हाददायक असतो. वेलावर कधीकधी काळ्या बुरशीचा (मेलिओला जॅस्मिनीकोला ) रोग पडतो. त्यावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण फवारतात.

चौधरी, रा. मो.