गोखरू, मोठे : [माळवी गोखरू, हत्तीचराटे हिं. बडा गोखरू, कडवा गोखरू गु. मोट्टो (उभी) गोखरू क. आनेनेग्गिलू सं. गजदौंष्ट्रक, गोक्षुर लॅ.पेडॅलियम म्यूरेक्स  कुल-पेडॅलिएसी]. सु. १५–३८ सेंमी. उंचीची ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), पसरट, दुर्गंधी, कमीजास्त रसाळ ⇨ओषधी  दख्खन द्वीपकल्पात विशेषतः किनाऱ्याजवळ आढळते. तिचा प्रसार दिल्ली, राजस्थान, पंजाब, श्रीलंका व आफ्रिकेतील प्रदेश उष्ण येथे आहे. तिच्यावर चिकट द्रव स्त्रवणारी प्रपिंडे (ग्रंथी) असून ती तणासारखी वाढते. पाने साधी, समोरासमोर, मांसल, अंडाकृती किंवा आयत, दातेरी किंवा खंडित असतात. ऑक्टोबरात भडक पिवळी फुले एकेकटी पानांच्या बगलेत येतात संवर्त लहान, संदले ५ आणि पाकळ्या जुळलेल्या केसरदले ४ दीर्घद्वयी किंजपुट २ कप्प्यांचा [→ पेडॅलिएसी फूल]. ताजेपणी फळास कस्तुरीसारखा वास येतो ते कठीण, चौकोनी, लहान, पिरॅमिडासारखे असून त्यावर प्रत्येक खोबणीत एक आडवा काटा असतो. बिया २-४ ही ओषधी पाण्यात किंवा दुधात ढवळली असता त्यातला चिकट द्रव मिसळला जातो तथापि रंग, चव, वास बदलत नाही. हा चिकट फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) उपशामक, मूत्रल (लघवी साफ करणारा), पौष्टिक असून मुतखडा, परमा व मूत्रकृच्छ्रासारख्या विकारांवर गुणकारी असतो. पाने जखमांवर लावतात मुळांचा काढा पित्तशामक. फळे बाजारात मिळतात ती आचके बंद करणारी आणि वाजीकर (कामोत्तेजक) असतात. पानांची भाजी आफ्रिकेत खातात. फळात अल्कलॉइड, हिरवट मेदाम्ल (स्निग्धाम्ल), थोडी राळ आणि राख असते. फळांचा काढा लघवी थांबल्यास, स्वप्नावस्था, नपुंसकत्व, बाळंतरोग इत्यादींवर गुणकारी असतो. 

जमदाडे, ज. वि.