हायड्रँजिया :हायड्रँजिएसी कुलातील हायड्रँजिया प्रजातीतील सरळ किंवा आरोही वाढणारे कोणतेही झुडूप. हायड्रँजिया प्रजातीतसु. २३ जाती आहेत. यातील अनेक जाती फुलांकरिता पादपगृहांमध्ये आणि बागेत वाढविल्या जातात.

 

 हायड्रँजिया मॅक्रोफायला : (फ्रेंच हायड्रँजिया किंवा हॉर्टेन्सिया). हेझुडूप ३–५ मी. उंचीचे असून मूळचे जपान व चीन या देशांतीलआहे. भारतात थंड हवेच्या ठिकाणी त्याची लागवड करतात. ही जाती तिच्या मोठ्या गेंदेदार फुलांच्या झुबक्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिची फुलेमार्च – जुलै या कालावधीत येतात. फुले लाल, जांभळी, निळी आणिक्वचित पांढरी असतात. फुलांचा रंग पोषक द्रव्यांच्या अम्लतेवर अवलंबून असतो. पीएच मूल्य ७ किंवा अम्लयुक्त असल्यास फुले लाल-गुलाबी रंगाची, तर तीव्र अम्लता असल्यास निळ्या रंगाची येतात. तसेच लागवड करतेवेळीच अम्लयुक्त रसायने वापरून निळ्या रंगाची फुले निर्माण करता येऊ शकतात. पाने दीर्घवृत्ताकृती ते रुंदट अंडाकृती, ७–१५ सेंमी. लांब, काहीशी दातेरी, बहुतांशी गुळगुळीत व समोरासमोर असतात. गोल बोंडे टोकाजवळ फुटून अनेक बारीक बिया बाहेर पडतात. या झुडपाला वाढीसाठी सकस व हलकी जमीन, भरपूर पाणी, कोवळे ऊन आणि थोडे खत आवश्यक असते. याची नवीन लागवड कलमे व फुटव्यांनी करतात.

 

 खूप पूर्वीपासून चीनमध्ये हायड्रँजियाची पाने व मुळे ‘चांग शान’ या नावाने हिवतापावर देतात. ते क्विनिनापेक्षा अधिक गुणकारी असून त्याला विशिष्ट अल्कलॉइडामुळे हे गुण प्राप्त झाले आहेत.

 

 हायड्रँजियाच्या जंगली हायड्रँजिया किंवा बर्फाचा पहाड (हा. अर्बोरन्सिस उंची सु. १ मी.), पिगी हायड्रँजिया (हा. पॅनिक्युलेटा उंची सु. ९ मी.), ओकलीफ हायड्रँजिया (हा. क्वेर्सिफोलिया उंचीसु. २ मी.) आणि आरोही हायड्रँजिया (हा. पेटिओलॅरिस उंची सु. १५ मी.) या इतर जाती होत. 

जमदाडे, ज. वि. वाघ, नितिन भरत

 

हायड्रँजिया
हायड्रँजिया