रुदंती : (खडींचा वेल, रान हरभरा, लोणा हिं. लाना, रुद्रवंती गु. ऊन, पलियो लाणो क. अडिवे कड्‌ले, नोणसुत्तक सं. अमृतस्रवा, स्त्रवा, रुदंती लॅ. केसा केटिका कुल-कॉन्व्हॉल्व्हूलेसी). रुदंती : (१) पानांफुलांसह फांदी, (२) फूल, (३) पुष्पमुकुट व केसरदले, (४) किंजपुटाचा छेद, (५) फळ.फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवतबीज उपविभाग] सु. १५ ते ३० सेंमी. उंच व सरळ वाढणारे एक लहान झुडूप. याच्या केसा या प्रजातीत एकूण पाच जाती असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधात आहे व त्या सर्व ⇨ओषधी (लहान रोपटी) व ⇨क्षुपे (झुडपे) आहेत. भारतात फक्त एकच जाती (रुंदीत) आहे. रूदंतीचा प्रसार भारतात सर्वत्र असून महाराष्ट्रात थंडीच्या मोसमात पिकाऊ जमिनीत, विशेषतः ओलसर जमिनीत, ती सर्रास आढळते. शिवाय श्रीलंका, पाकिस्तान व इतर सर्व उष्ण प्रदेशांत ही सापडते. या झुडपाच्या बारीक खोडावर अनेक फांद्या असतात शिवाय ते फार केसाळ असते. पाने असंख्य, फार लहान (३−६×१·५−२·५ मिमी.), फार लहान देठाची, केसाळ, अंडाकृती व अकाआड एक असतात. फुले सच्छद (तळाशी लहान उपांगे असलेली), पांढरी किंवा गुलाबी असून त्याचे झुबके शेंड्याजवळच्या पानांच्या बगलेत नोव्हेंबर ते जानेवारीत येतात. फुलांत ५ संदले प्रत्येक ३ मिमी. लांब व केसाळ, ५ प्रदेल (पाकळ्या) ५ मिमी. लांब व अर्धवट विभागलेली, ५ केसरदले आणि २ ऊर्ध्वस्थ किंजदले असतात. फुलांचा आकार नाळक्यासारख्या असून किंजपुटात दोन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके असतात [⟶ फूल]. फळ (बोंड) ४-५ मिमी. लांब, लंबगोल, टोकदार व टोकास लवकर असून त्यात बहुधा एकच बी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसी (हरिणपदी) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

रु दंती आरोग्यपुनःस्थापक, शक्तिवर्धक, दीपक (भूक वाढविणारी), कफोत्सारक (कफ काढून टाकणारी), पित्तप्रकोपरोधक असते. हिची चव आंबट व न आवडणारी असते. प. आफ्रिकत ती औषधात वापरतात. ती उष्ण, रक्तवर्धक, तिखट, कडू व कृमिघ्न असते. वनस्पतीचे चूर्ण करून त्यात तूप व मध घालून महिनाभर घेतल्यास मनुष्य रोगमुक्त व सशक्त होतो, असेही वर्णन आढळते.

संदर्भ : 1. Kirtikar, K. R.: Basu, B. D. Indian Medicinal Plants Vol. III, New Delhi, 1975.

२. देसाई, वा. गो. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.

३. पदे, शं. दा. वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.