राळधूप : (धूप हीं., गु. काला डामर गु. गुगळ क. हेळमड्डू, सं. मंदधूप, रालधूप इ. ब्लॅक डामर ट्री लॅ. कॅनॅरियम स्ट्रिक्टम कुल-बर्सेरेसी). फुलाझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] एका उंच, सरळ, भव्य, शोभिवंत पानझडी वृक्षाचे नाव. हा आसाम,सिक्कीम, कोकण, कारवार, सह्याद्री, मलबार, कूर्ग, म्हैसूर ते त्रावणकोर, कोचीन इ. ठिकाणी सु. १, ५०० मी. उंचीपर्यंत दाट जंगलात आढळतो. कॅनॅरियम या याच्या प्रजातीत एकूण सु. १००–१५० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ८ जाती आढळतात. या वृक्षाची साल खडबडीत व करडी असून कोवळ्या भागांवर लालसर लव असते. याची पाने एकाआड एक, संयुक्त, मोठी (६०−१२० सेंमी. लांब), विषमदली, पिसासारखी व पतिष्णू (गळून पडणारी) असतात. दले जाड, चिवट, वरच्या बाजूस गुळगुळीत आणि चकचकीत असून त्यांच्या ३−७ जोड्या असतात शिवाय एक टोकाचे दल असते. ती समोरासमोर किंवा एकाआड एक असतात. प्रत्येक दल १०−२०X४·५−९ सेंमी., अंडाकृती व कुंतसम (भाल्यासारखे), दातेरी व टोकास लांबट असते. फुले पांढरी, लहान, विपुल, द्विलिंगी किंवा एकलिंगी, अथवा दोन्ही प्रकारची एकत्र असून उन्हाळ्यात पानांच्या बगलेत परिमंजरीत [⟶ पुष्पबंध] येतात. फुलात संवर्त त्रिखंडी व पेल्यासारखा असून पुष्पमुकुटही त्रिखंडी (क्वचित अधिक खंड असलेला) पण संवर्तापेक्षा लांबट असतो केसदले अनेक व तळाशी जुळलेली आणि बिंबापासून अलग असतात. किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात एक बीजक असते [⟶ फूल]. अश्मगर्मी फळ (आठळी फळ) सु. ४−५ सेंमी. लांब, लंबगोल असून आठळी कठीण असते बिया १−३ असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨बर्सेरेंसी अथवा गुग्गुळ कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

राळधूप : (१) संयुक्त पान व फुलोरा यांसह फांदी, (२) उलगडलेले फूल, (३) केसरदले व किंजमंडल, (४) फळ, (५) बी.

राळ : या वृक्षापासून चिकट गर्द तपकिरी स्त्राव होऊन पुढे तो कठीण ‘राळ’ रूपात उपयोगास येतो. ती राळ मिळण्यास प्रथम जमिनीपासून सु. २ मी. उंचीवर खोडावर उभे चरे पाडतात त्यानंतर बुंध्याभोवती जमिनीवर जाळ करतात त्यामुळे तेथील साल व आतील लाकडाचा बाहेरील भाग खराब होतो. पुढे दोन वर्षांनी त्या चऱ्यांतून रस वाहण्यास सुरुवात होते व दरवर्षी सु. सहा महिने याप्रमाणे दहा वर्षे तो चालू राहतो. हा रस (राळ) प्रथम अर्धवट द्रवावस्थेत असून लवकरच त्याचा काहीसा अपारदर्शक, काळा, कठीण व झुंबराकार खडा बनतो. अलीकडे मिळालेल्या माहितीवरून तमिळनाडू व त्रावणकोर येथे दरवर्षी सु. ८५,००० किग्रॅ. राळेचे उत्पादन होते. स्थानिक कंत्राटदारांमार्फत याची फुटकळ विक्री दुकानदारांना केली जाते. त्यालाच ‘काळा डामर’ हे व्यापारी नाव आहे. हा ठिसूळ पदार्थ फोडून त्याची भूकटी करता येते. बेंझीन व टर्पेंटाइनमध्ये ती पूर्णपणे विरघळते ॲसिटोन व अल्कोहॉलमध्ये मात्र ती अंशतःच विरघळते. त्या राळेतून ५−७% बाष्पनशील (उडून जाणारे) तेल मिळते शुष्क ऊर्ध्वपातनाने ८०−८५% गर्द निळे तेल निघते, तसेच ६−७% जळाऊ वायू निघतो, त्या वायूत मिथेन, अमोनिया आणि कार्बन डाय-ऑक्साइड असतात. ‘काळा डामर’ ही राळ तिळेलाबरोबर संधिवातावर, अंगदुखीवर, कंबरदुखीवर व जुन्या त्वचारोगांवर लावतात रोगणाकरिता, बाटल्या हवाबंद करण्यास लावण्याच्या लाखेसारख्या मिश्रणात घालण्यास आणि गलबतांच्या भेगा बुजविण्यासही राळ वापरतात. औषधी प्लॅस्टरमध्ये ही राळ डांबर अथवा ‘बर्गंडी पिच’ ऐवजी वापरतात.

राळधुपाचे लाकूड करडे असून त्यावर लालसर झाक असते. ते मध्यम कठीण व जड असते. सावलीत ते चांगले टिकते. कापणे, रंधणे व घासणे या कामांस ते सोपे जाते. छत, जमीन व आडभिंत यांकरिता त्याच्या फळ्या वापरतात. खोकी, खुर्च्यांच्या पाठी, किरकोळ कामाच्या फळ्या, फ्लायवुडचे तक्ते, चहाच्या पेट्या इत्यादींसाठी ते उपयोगात आहे.

पहा : बर्सेरेसी. 

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

            2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol II, Delhi, 1975.

धन, सुशीला प. परांडेकर, शं. आ.