हरिता : (इं. मॉसेस लॅ. मुस्सी). ब्रायोफायटा [→ शेवाळी] विभागातील वनस्पतींचा एक वर्ग. त्यांचा आढळ जगात सर्वत्र असून त्या खाऱ्या पाण्यात आढळत नाहीत. यामध्ये सदैव पाण्यातच वाढणाऱ्या तसेच दमट हवेत, सावलीत व ओलसर जमिनीवर, खडकांवर किंवा मोठ्या वृक्षांच्या सालीवर मखमलीसारखे आवरण करणाऱ्या नाजूक वनस्पतींचा समावेश केलेला आढळतो. तथापि, येथे पाण्यातील शेवाळांचा अंतर्भाव नसून फक्त इतर शेवाळांपैकी काहींची माहिती अभिप्रेत आहे. शेवाळी विभागात ⇨ यकृतका, हरिता व शृंगका हे एकूण तीन वर्ग हल्ली समाविष्ट आहेत. तुलनात्मक दृष्ट्या हरिता सर्वांत प्रगत शेवाळी असून आकार, संख्या, संरचना व प्रसार या बाबतींत सरस आहेत. हरितामध्ये सु. ६६० प्रजाती आणि १४,५०० जाती आहेत. जी. एम्. स्मिथ यांच्या मताप्रमाणे हरिता वर्गाचे (१) स्फॅग्नोब्रिया, (२) ॲन्ड्रोब्रिया व (३) यूब्रिया असे तीन उपवर्ग केले आहेत. इतर काही शास्त्रज्ञांनी (उदा., एच्. एन्. डिक्सन, १९३२) त्यांचे (१) स्फॅग्नेलीझ, (२) ॲन्ड्रियेलीझ व (३) ब्रायेलीझ हे तीन गण मानले आहेत.

हरिता पर्मियन काळाच्या (२९.९-२५.१ कोटी वर्षांपूर्वी) सुरु-वातीला अस्तित्वात होती. तिच्या १०० पेक्षा जास्त जाती पॅलिओसीन व इओसीन काळातील (६.५–५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) जीवाश्मरूपात आढळल्या आहेत. म्यूसिटीज, प्रोटोस्फॅग्नम, पॅलिओटायफ्नम या हरिताच्या प्रजातींचे जीवाश्म संरचनात्मक दृष्ट्या प्रगत हरिता प्रजाती-सारखेच आहेत.

इतर शेवाळीप्रमाणेच हरिता वनस्पतींची निर्मिती व प्रसार बीजुकांनी (सूक्ष्म अलैंगिक प्रजोत्पादक व एककोशिक घटकांमुळे) घडून येतो त्यांना बीजे नसतात [→ वनस्पति, अबीजी विभाग]. ⇨ कायकवनस्पतींपेक्षा सर्वच शेवाळी प्रगत व कित्येक लक्षणांत भिन्न आहेत. गंतुकधारी (लैंगिक जननेंद्रिये अथवा गंतुकाशये धारण करणारी पिढी) हीच जीवनचक्रांतील प्रमुख अवस्था असून त्यामानाने बीजुकधारी पिढी (अथवा बीजुकधर) र्‍हसित व त्यावर आधारलेली असते. गंतुकाशयाच्या विकासात व पक्वावस्थेतील संरचनेत, तसेच बीजुकधारीच्या विकासात व पूर्णावस्थेतील संरचनेत हरितांमधील वनस्पतींत इतर शेवाळीपासून भिन्नत्व आढळते. जीवनचक्रात यकृतकाप्रमाणे येथेही गंतुकधारी व बीजुकधारी यांची आलटून पालटून निर्मिती म्हणजेच पिढ्यांचे एकांतरण आढळते. [→ एकांतरण, पिढ्यांचे].

हरिताचे जीवनचक्रहरितांमध्ये बीजुक रुजून त्यांपासून प्रथम स्वोपजीवी तंतुमय शैवलांसारखी किंवा सपाट कायकरूप अवस्था येते, तिला ‘शंवालक’ असे म्हणतात तिला मूलकल्पाद्वारे (मुळाच्या केसासारख्या साध्याअवयवांनी) जमिनीतून आधार, पाणी व खनिजे मिळतात. तिच्यापासून पुढेउभ्या बारीक शाखा येतात व त्यांवर गंतुकाशये असतात त्या शाखांना ‘गंतुकदंड’ म्हणतात. बहुधा ह्या शाखांना पुढे मूलकल्पाद्वारे जमिनीशीनिकटचा संपर्क साधून पाणी व खनिजे मिळतात तसेच हवेत वाढणाऱ्या दंडावर साधी, हिरवी, लहान विपुल पाने येतात त्यामुळे स्वतंत्र रीत्या अन्ननिर्मिती केली जाते लवकरच शंवालक अवस्था संपुष्टात येते. पानांचा आकार व संरचना सारखी असते. सर्वच मूलकल्प अनेक-कोशिक (अनेक सूक्ष्मशरीर घटकांचे बनलेले), परंतु तंतूसारखे असून त्यांमधील कोशिकावरणे (कोशिकाभित्ती) तिरपी असतात. गंतुकदंडांच्या टोकावर गंतुकाशयाचा विकास (दोन सपाट पृष्ठे असलेल्या) एका अग्रस्थ कोशिकेपासून होतो. बीजुकधरावरील बीजुकाशयात वंध्य कोशिकांचा भरणा अधिक असून त्यांमध्ये श्रमविभागाच्या तत्त्वावर भिन्न ऊतके (समान कार्ये व स्वरूप असलेल्या कोशिकांचे समूह) आढळतात मात्र, यकृतकात आढळणारी क्षेपके (बीजुकांच्या प्रसारास मदत करणारी साधने) येथे नसतात. वर उल्लेख केलेल्या तीन प्रमुख उपवर्गांची सामान्य लक्षणे खाली दिलेली आहेत.

स्फॅग्नोब्रिया : वसतिस्थानावरून त्यांना ‘रुतण-हरिता’ (इं. बॉग–मॉसेस) म्हणतात. या उपवर्गात एकच गण (स्फॅग्नेलीझ) व एकच कुल (स्फॅग्नेसी) असून त्यात स्फॅग्नम ही एकच प्रजाती आहे. त्याच्यासु. ३२० जाती आहेत व त्यांचा प्रसार थंड प्रदेशातील चुना नसलेली डबकी, दलदली व ओली जमीन यांतच असतो त्या अम्लताप्रिय आहेत. त्यांची वर्षानुवर्षे वाढ तेथेच चालू असून त्यांचा जुना मृत भाग साचून तेथे उगवणाऱ्या इतर काही वनस्पतींबरोबर त्यापासून ⇨ पीट (जीर्णक) हा उपयुक्त पदार्थ बनतो [→ दलदल]. आयर्लंडमध्ये हे पीट सुकवून इंधन (जळण) म्हणून वापरतात. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी माळी त्यात पीटचे मिश्रण करतात. तसेच एका ठिकाणाहून दुसरीकडे जिवंत वनस्पती पाठविताना पीटमध्ये गुंडाळतात. पाणी शोषून घेणे व ते धरून ठेवणे हा गुण स्फॅग्नम मध्ये प्रकर्षाने आढळतो. लोंबत्या कुंड्यांत ऑर्किडसारख्या वनस्पती वाढविण्यास हरिता वापरतात. जखमा बांधतानाही स्फॅग्नम शेवाळे वापरतात. स्फॅग्नम प्रजाती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहे.

स्फॅग्नम चा शंवालक रुंद कायकाभ असून त्यापासून फक्त एकच उभे गंतुकदंड वाढते. ह्या प्रमुख गंतुकदंडावर दोन प्रकारच्या पर्णयुक्त शाखा असून एकावर रेतुकाशये (पुं–गंतुकाशये) व दुसऱ्यावर अंदुककलश (स्त्री-गंतुकाशये) वाढतात. काही जातींत दोन प्रकारची गंतुकाशये दोन भिन्न वनस्पतींवर असतात. बहुधा रेतुकाशयांच्या शाखेवर लालसर लहान पाने आणि अंदुककलशांच्या शाखेवर पिवळट पाने येतात. पानांत मध्यशीर नसून संरचनेत दोन प्रकारच्या (मृत वजिवंत) कोशिका आढळतात. मृत कोशिकां-वर छिद्रे (वायुरंध्रे) असून पाण्याचे शोषण व संचय त्या करतात सजीव कोशिका अन्ननिर्मिती करतात. विशिष्ट शाखांवर पानांच्या बगलेत रेतुकाशये (पुं-कोशिका निर्मिणारी इंद्रिये) असतात. अंदुककलश (स्त्री-कोशिका निर्मिणारी इंद्रिये) शाखेच्या टोकास तीन-तीन येतात. पाण्याच्या साहाय्याने चल रेतुक व अचल अंदुक यांचे मीलन होऊनरंदुक बनते रंदुकाच्या विकासात बाह्यकोशापासून [→ यकृतका रिक्सिया] बाह्यावरण व बीजुकजनक कोशिका बनतात (इतर हरिताप्रमाणे हे नव्हे). अंतःकोशापासून केंद्रवर्ती वंध्य व घुमटासारखा भाग (कील) बनतो. त्याभोवती बीजुकांचा थर बनतो. बीजुकधराचा दांडा हा पुढेअधिक वाढलेला गंतुकदंड असून त्याला ‘आभासी पद’ म्हणतात इतरांप्रमाणे हा बीजुकधराचा भाग (दंड) नसतो. बीजुकधराचा ‘पद’ (तळभाग) त्यातून शोषकाप्रमाणे पाणी व खनिजे घेतो. बीजुकाशयाखाली (व पद यामध्ये) फार आखूड दंड असतो. बीजुकाशयाच्या आवरणात (बाहेरील भागात) प्रथम हरितद्रव्य असते, म्हणजे बीजुकधारी अर्धवट गंतुकधारीवर अवलंबून असतो. बीजुकाशयाच्या पक्वावस्थेत टोकावर एक टोपण (अपिधान) तयार होते व त्यामुळे त्याखाली आडवे वलय दिसते. येथे पिधानीचा (अंदुककलशाच्या आवरणाचा) शेष भाग तळाशी बीजुकाशयाला चिकटून राहतो. आतील दाबाने वलयापासून सुटून, टोपण उडून जाते व बीजुके बाहेर पडतात. बीजुके रुजून प्रथम तंतूसारखा व नंतर सपाट आणि खंडयुक्त शंवालक (प्रारंभिक अवस्था) बनतो. पुढे अनेक मूलकल्प त्यापासून वाढतात आणि त्यानंतर अनेक कायकाभ शंवालक बनून सुटे होतात त्या प्रत्येकावर फक्त एक उभा गंतुकदंड वाढतो अशा रीतीने जीवनचक्र पूर्ण होते.


ॲन्ड्रियोब्रिया : (इं. ग्रॅनाइट मॉसेस). ह्या उपवर्गात ॲन्ड्रियेलीझहा एकच गण, ॲन्ड्रियेसी हे एकच कुल आणि ॲन्ड्रिया व न्यूरोलोमा या दोन प्रजाती आहेत. ॲन्ड्रिया च्या एकूण सु. १२० जाती व न्यूरोलोमा ची फक्त एकच जाती आहे. ॲन्ड्रिया चा प्रसार फक्त सिलिकामय खडकांवर आणि थंड हवामानात (उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशात व उंच पर्वतावर) असतो. ह्या उपवर्गाचे शास्त्रीय स्थान स्फॅग्नेब्रिया व यूब्रिया या उपवर्गांमध्ये असते, कारण ह्याची लक्षणे म्हणजे दोन्हींच्या लक्षणांचे मिश्रण असते. गंतुकदंड यूब्रियाप्रमाणे व तसेच बीजुकाशयातील बीजुकांचा उगम रंदुकाच्या अंतःकोशात होतो परंतु स्फॅग्नोब्रियाप्रमाणे तो स्तर केंद्रवर्ती कीलावर व बाजूस असतो. पक्व बीजुकधर स्फॅग्नोेब्रियाप्रमाणे लांब आभासी पदावर उंच वाढतो पद आखूडच राहतो. बीजुकाशय उभे तडकून त्याची चार शकले होतात, परंतु ती तळाशी व टोकाशी जुळून राहतात. तडकण्यापूर्वी पिधानी लवकर सुटून पडते. शंवालक पट्टीप्रमाणेव शाखायुक्त असतो.

यूब्रिया : (इं. ट्र मॉसेस). ह्या उपवर्गात बहुसंख्य हरितांचा अंतर्भाव होतो. यांची एच्. एन्. डिक्सन यांनी १७ गणांत विभागणी केली आहे. एकूण प्रजाती सु. ६५० असून जाती सु. १४,००० आहेत. डबकी,प्रवाह, रुतण, दलदली, खडक, वृक्षांच्या साली, नरम ओली जमीन इत्यादींवर त्यांची वस्ती ध्रुव प्रदेशापासून ते उष्ण कटिबंधापर्यंत सर्वत्र आहे. ह्या वनस्पतींचे (इतर हरिताशी तुलना केल्यास) पुढील विशेष फरक आढळतात. एकगुणित शंवालक बहुधा तंतुमय असून त्यापासून वाढलेल्या गंतुकदंडावरच्या पानांत कोशिकांचे एक किंवा एकापेक्षा अधिक थर असतात. ह्या वनस्पतींत द्विगुणित बीजुकधराला आभासी पद नसून बीजुकाशयाखाली लहान पद व अनेकदा लांब दंड असतो. द्विगुणित रंदुकाच्या विकासात बाह्यकोश व अंतःकोश हे प्रभेदन होते बीजुकजनक कोशिकांचा केंद्रवर्ती कीलाभोवतीचा (कीलावर नव्हे) विकास व कील ही अंतःकोशापासून निर्माण होऊन बाह्यकोशापासून बीजुकाशयाचे बाह्यावरण बनते त्यामध्ये अनेकदा बरेच प्रभेदन आढळते व भिन्न ऊतके दिसतात. बीजुकाशयावर प्रथम पिधानीचे आवरण असते. ते पक्वावस्थेत पडून जाते. बीजुकाशयाच्या खाली ‘आशयतल’ हा दंडावरचा पसरट भाग असून काही जातींत त्याचा रंग व आकार विशेष प्रकारे बनलेला आढळतो. बीजुकाशयाच्या टोकावर टोपण (अपिधान) व त्याखाली स्फोट करणारे विशेष प्रकारच्या कोशिकांचे वलय असते हे अपिधान सुटून जाण्यास वलयातील बुळबुळीत द्रव्य कारणीभूत होते. बीजुकाशयाच्या अपिधाना-खालच्या भागांवर बहुसंख्य जातींत सूक्ष्म दातांचे (परितुण्ड-दंतांचे) वलय असते ते आर्द्रताशोषक असून बीजुकाशयातील एकगुणित बीजुके ओलसर हवेत त्याखाली बंद व सुरक्षित राहतात कोरड्या हवेत दातांचे वलय उभे राहून बीजुके उघडी पडतात व ती वाऱ्याने उधळली जाऊन त्यांचा प्रसार होतो. परितुण्ड-दंतांचा या उपवर्गातील भिन्न गटांच्या वर्गीकरणात वापर करतात. काही खूप लहान जातीत मात्र ही यंत्रणा आढळत नाही बीजुकाशयाचे आवरण सुकून कुजून जाते आणि बीजुके बाहेर पडतात. ती रुजून एकगुणित शंवालक व त्यावर गंतुकदंड वाढतात. अशा रीतीने दोन्ही (द्विगुणित व एकगुणित) पिढ्यांचे एकांतरण घडून येते. या उपवर्गात बीजुकधारी व गंतुकधारी पिढ्या अंतर्बाह्य प्रभेदनामुळे सर्व शेवाळीत फारच प्रगत असलेल्या आढळतात. फ्युनेरिया, पॉलिट्रिकियम, बार्ब्यूला इ. प्रजातींतील जाती भारतात सामान्यपणे आढळतात. फ्युनेरिया ची अधिक तपशीलवार माहिती मराठी विश्वकोशा तील स्वतंत्र नोंदीत आहे.

पहा : फ्युनेरिया यकृतका वनस्पति, अबीजी विभाग शेवाळी.

संदर्भ : 1. Bell, Peter Coomhe, David, Strasberger’s Text Book of Botany , London, 1965.

           2. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcatta, 1964.

           3. Smith, G. M. Cryptogamic Botony, Vol. II, Tokyo, 1955.

महाजन, मु. का. परांडेकर, शं. आ.