यलो एल्डर    :(  क. कोरैणक्‌लर  इं. ट्रंपेट फ्लॉवर  लॅ. टेकोमा स्टान्स ,  स्टेनोलोबियम स्टान्स  कुल  –  बिग्नोनिएसी). हे मोठ्या आकाराचे झुडूप  ( अथवा लहान वृक्ष) फुलांच्या शोभेसाठी बागेत सर्वत्र विशेषत ः  कुंपणासाठी लावतात. हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील परंतु आता उष्ण कटिबंधीय प्रदेशांत सर्वत्र आढळते. भारतात सु. १ , ५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात त्याचा प्रसार दिसून येतो. फांद्या चौकोनी असून साधारणत:   जमिनीजवळून येतात  साल फिकट तपकिरी व मऊ  पाने समोरासमोर ,  जात्यसम  ( वरची जोडी खालच्या जोडीशी काटकोनात) ,  संयुक्त ,  विषमदली व मोठी असतात. दले ५– १० ,  समोरासमोर ,  लांबट टोकांची ,  दातेरी कडांची आयत-कुंतसम  ( भाल्यासारखी) ,  गुळगुळीत व खालच्या बाजूस फिकट असतात. लहान फांद्यांच्या टोकास लोंबत्या मंजिऱ्यांवर पिवळी धमक ,  थोडी सुगंधी व मध्यम आकाराची  ( सु. ५ सेंमी. लांब व ३· ५ सेंमी. व्यास) फुले सप्टेंबर-डिसेंबरात अधिक पण थोडी इतर महिन्यांतही येतात. संवर्त हिरवा ,  पेल्यासारखा व पुष्पमुकुट काहीसा पिवळा ,  नसराळ्या  ( तुतारी) सारखा असून  ( त्यावरून ‘ट्रंपेट फ्लॉवर ’ हे इंग्रजी नाव पडले आहे) पाच पाकळ्यांपैकी तीन सरळ व दोन वर वळलेल्या असतात  फुलात गर्द शेंदरी रेषा दिसतात. एक वंध्य केसरदल व चार दीर्घद्वयी  ( दोन अधिक लांब) कार्यक्षम असतात  बिंब वलयाकृती व त्यावर किंजपुट असतो. शेंगेसारखी दिसणारी व झुबक्याने येणारी बोंडे  ( १२– २० X ७ सेंमी.) फुटीर ,  लांबट ,  पसरट असून प्रथम हिरवी व नंतर तपकिरी होतात. बीजे अनेक व दोन पंखयुक्त. ही झुडपे वैराण जागेतही आपोआप वाढतात. धुपलेल्या जमिनीत लागवडीस योग्य असून नवीन लागवड बियांपासून करतात. लाकूड फिकट पिंगट ,  कठीण व टिकाऊ असून त्याला रंधून व घासून झिलई करता येते. मूळ तीव्र मूत्रल  ( लघवी साफ करणारे) ,  कृमिनाशक व पौष्टिक असते. त्याचा बीअर  ( मद्य) बनविण्यात उपयोग करतात.  

   

  पहा  :  बिग्नोनिएसी.

  सं दर्भ  : 1. Cowen, D. V. Flowering Trees and Shrubs in India, Bombay, 1965.

    2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

  दे शपांडे ,  सुधाकर

   

  KH - 14 - P - 58 - 1   KH - 14 - P - 58 - 2   58 - 3   58 - 4   58 - 5