घुगरी : (चिराती हिं. अगुमकी, बिलारी लॅ. मेलोथ्रिया मदर-सपाटना कुल-कुकर्बिटेसी). ही जमिनीवर पसरणारी किंवा कुंपणावर चढून वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ⇨ ओषधी  श्रीलंका, मलाया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व भारत इ. देशांत आढळते. भारतात १,८०० मी. उंचीपर्यंतच सर्वत्र आढळते. खोड कोनयुक्त व केसाळ पाने अंडाकृती किंवा अर्धत्रिकोणी, अखंड किंवा ३–५ खंडित व सूक्ष्म दातेरी असतात. प्रताने (तनावे) साधी फुले लहान, एकलिंगी, एकाच झाडावर व पिवळी पुं-पुष्पांचे झुबके व स्त्री-पुष्पे एकएकटी व बिनदेठाची किंवा अर्धवट झुबक्यांत जुलैत येतात [ → कुकर्बिटेसी फूल] फळ गोलसर वाटाण्याएवढे, किंचित काटेरी, प्रथम हिरवे व त्यावर पिवळट ठिपके असून शेवटी लाल दिसते. बिया अंडाकृती-लांबट आणि करड्या असतात.

पोपट व इतर पक्षी फळे खातात. कोवळे कोंब व कडू पाने सौम्य रेचक असून पित्ताधिक्य व भोवळ यांवर देतात. मुळे चघळल्यास दातदुखी थांबते. त्यांचा काढा उदरवायूवर देतात. बियांचा काढा स्वेदेक (घाम आणणारा) असून त्यांचे चूर्ण अंगदुखीवर लावतात.

जमदाडे, ज. वि.