कडू निंब : (१) फांदी, (२) पान, (३) फूल, (४) केसरदलांची उघडलेली नलिका, (५) किंजमंडल, (६) किंजपुटाचा आडवा छेद, (७) फळ.

निंब : येथे मेलिएसी म्हणजे निंबकुलातील दोन वनस्पतींचे वर्णन दिले आहे.

कडू निंब : (बाळंतनिंब, कडू निंब हिं. नीम गु. लिंबडो क. बेवू सं. निंबतरू, परिभद्रक, राजभद्रक इं. मार्गोसा लॅ. ॲझॅडिराक्टा इंडिका, मेलिया ॲझॅडिराक्टा कुल–मेलिएसी). सुमारे १२–१६ मी. उंचीचा हा मोठा पानझडी वृक्ष सर्व भारतात व इतर उष्ण प्रदेशांत लावलेला आढळतो. पक्ष्यांनी टाकलेल्या बियांमुळे अनेक पडसर व रुक्ष जागी उगवून आलेली झाडे खेड्यांच्या आसपास सामान्यपणे दिसतात. बकाणा निंबाशी असलेल्या त्याच्या साम्यामुळे मुसलमानांनी त्याचे नाव ‘आझाद-दाराख्त-इ-हिंदी’ ठेवले आहे व त्यावरून वरील लॅटिन नावे दिली गेली आहेत. दख्खन, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांतील रुक्ष जंगलात हा वृक्ष निसर्गत:च आढळतो, असे नमूद केलेले आढळते. इरावतीच्या खोऱ्यात रुक्ष ठिकाणी हा जंगली अवस्थेत आढळतो पंजाब ते झेलमच्या प्रदेशात लावलेला असून तेथे तो स्थिर झाल्याचे नमूद आहे. याचे खोड सरळ व साल खरबरीत आणि काळसर असते. पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त पिच्छकल्प (पिसासारखी), विषमदली असून फांद्यांच्या टोकांस गर्दीने वाढतात दले ९–१२, साधारण समोरासमोर, तळाशी तिरपी, भाल्यासारखी दातेरी फुले पांढरी, द्विलिंगी, लहान, सुवासिक आणि शाखित परिमंजिरीवर मार्च ते मेमध्ये येतात. संदले पाच आणि प्रदले पाच संदले प्रदलांपेक्षा बरीच लहान असून केसरनलिका पुष्पमुकुटापेक्षा लहान [⟶ फूल] बिंब नसते किंजपुटात प्रथम तीन कप्पे व सहा बीजके अश्मगर्भी फळ (आठळी फळ) लहान, पिवळे, एकबीजी असून बीजात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसते. इतर शारीरिक लक्षणे निंब कुलात [⟶ मेलिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

ह्या झाडाचा प्रत्येक भाग औषधी दृष्ट्या उपयुक्त असतो. त्वचारोग, शोथ (दाहयुक्त सूज), ज्वर यांमध्ये विशेषेकरून वापरतात. जखमा, कृमी, त्वक्‌दोष, यकृतविकार यांमध्ये पानांचा रस उपयुक्त, तो काविळीत सुंठीबरोबर देतात तसेच तो पाचक, दीपक (भूक वाढविणारा) व कृमिनाशक असतो. धान्य, पुस्तके व कपडे यांमध्ये सुकी पाने घालून ठेवल्यास कीड किंवा कसर लागत नाही. फुले उत्तेजक, पौष्टिक व दीपक आणि फळे जखमा, कुष्ठरोग, डोक्यातील उवा यांवर लावण्यास वापरतात. बियांचे चूर्ण तसेच उपयुक्त असते. सालीतून पाझरणारा डिंक उत्तेजक, शामक (शांत करणारा) व पौष्टिक असून घशाच्या विकारांवर गुणकारी असतो. कोवळ्या काड्यांनी दात घासल्यास हिरड्यांना बळकटी येते. झाडातून स्रवणारा रस आंबल्यावर थंड पेयासारखा व पौष्टिक असून क्षयरोग व जुनाट कुष्ठ यांवर देतात. साल कडू व स्तंभक (आकुंचन करणारी) असून पाळीच्या तापावर उपयुक्त बियांचे तेल उत्तेजक व जंतुनाशक असून संधिवात व चर्मरोग यांवर लावण्यास वापरतात. उन्हाने होणाऱ्या डोकेदुखीवर हे तेल मस्तकास चोळतात. हिंदू लोक वर्षप्रतिपदेला कडू निंबाची कोवळी पाने व फुले मिरी, सैंधव, हिंग, जिरे, ओवा, चिंच व गूळ यांच्या मिश्रणाबरोबर खातात त्यामुळे वर्षभर आरोग्य लाभते, असा समज आहे.

कडू निंबाचे लाकूड कठीण, सुवासिक व टिकाऊ असते. ते वाळवीपासून सुरक्षित असून त्याला रंधून गुळगुळीत करता येते. खांब, तुळया, दरवाजे व खिडक्यांच्या चौकटी, सजावटी, सामान, गाड्या, शेतीची अवजारे, घाणे, नावा, होडकी, मूर्ती इ. विविध वस्तूंकरिता लाकूड वापरले जाते. बियांचे तेल साबणाकरिता आणि दिव्याकरिता वापरतात. याचा डिंक इतर डिंकाप्रमाणे वापरतात. या वृक्षाची छाया थंड व आरोग्यकारक असल्याने रस्त्याच्या दुतर्फा आणि सार्वजनिक इमारतींच्या परिसरात ही झाडे लावतात. चरकसंहिता, सुश्रुतसंहीता, कौटिलीय अर्थशास्त्र, बृहस्तंहिता, चाणक्य सूत्र इ. संस्कृत ग्रंथ, तमिळ साहित्य व बौद्ध जातक यांमध्ये निंबाची माहिती दिलेली असून त्याचे धार्मिक व औषधी महत्त्व वर्णिले आहे.

बकाणा निंब : (हिं. बक्याण, द्रेक गु. बकाणा लिंबडो क. चिकबेवू सं. अरण्यक, महानिंब इं. पर्शियन लिलॅक, बीड ट्री, प्राइड ऑफ इंडिया, बॅस्टर्ड सीडर, चायना बेरी लॅ. मेलिया ॲझॅडिराक कुल मेलिएसी). हा एक शोभिवंत, पानझडी, जलद वाढणारा, सु. ९–१२ मी. उंच व १–१·२ मी. घेर असलेला, मध्यम आकारमानाचा वृक्ष मूळचा प. आशियातील असून काश्मीरात झेलम नदीच्या खोऱ्यात, हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशात (१,८०० मी. उंचीपर्यंत) आणि बलुचिस्तान, ब्रह्मदेश, मलेशिया इ. ठिकाणी जंगली अवस्थेत आढळतो. द. अमेरिकेत व उत्तरेस व्हर्जिनियापर्यंत तो सुस्थित झाला आहे. इराण व चीन येथेही हा आढळतो. भारतात बागेत सामान्यपणे लावलेला आढळतो. त्याची साल करडी किंवा उदी आणि भेगाळ असून पाने संयुक्त, विषमदली, द्विगुण क्वचित त्रिगुण पिच्छाकृती (दोनदा किंवा तीनदा पिसासारखी विभागलेली) असतात दलके अंडाकृती वा कुंतसम (भाल्यासारखी) दंतुर, तळाशी कडू निंबाप्रमाणे तिरपी असतात. पानांच्या बगलेत, परिमंजरीवर लहान, फिकट जांभळी, मधासारख्या वासाची फुले फेब्रुवारी-मार्चमध्ये (क्वचित वर्षभर मधून मधून) येतात. केसरनलिका जांभळी किंजपुटात पाच कप्पे असून [⟶ फूल] अश्मगर्भी फळे लंबगोल व पिवळी असतात फळात चार ते पाच कठीण बिया असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे निंब कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.


चहा व कॉफी यांच्या मळ्यांत सावलीकरिता ही झाडे लावतात. शोभेकरिता बागांतून व रस्त्यांच्या दुतर्फाही लावली जातात. याचे लाकूड साधारण कठीण, चिवट, मध्यम हलके, टिकाऊ, सुंदर असून त्याला छान झिलई होते ते वाळवीपासून सुरक्षित असते. खेळणी, सिगार-पेट्या, दारूगोळ्याच्या पेट्या, खोकी, कपाटे, शेतीची अवजारे, सजावटी सामान, वाद्ये इत्यादींकरिता ते वापरतात. पानांत कडू निंबापेक्षा कडूपणा कमी असल्याने चारा व बेवड यांकरिता ती उपयुक्त असतात. पानांचा रस जंतुनाशक, मूत्रल (लघवी साफ करणारा), अश्मरी (खडे) नाशक व आर्तवजनक (मासिक स्राव सुरू करणारा) त्यांचा काढा स्तंभक व दीपक साल आणि बियांचे तेल कडू निंबाप्रणाणे गुणकारी असते. फळे दुर्गंधी, कडू व विषारी असून झाडाची सालही कडू असते. फळाच्या मगजातून (गरातून) बकॅनीन नावाचे कटुद्रव्य व ॲझॅरिडीन हे अल्कलॉइड (म्हणजेच मार्गोसीन) वेगळे काढता येते. शिवाय त्यात स्टेरॉल व टॅनीन असतात. पेंडीचा उपयोग प्रामुख्याने खत म्हणून करतात. फळात ग्लुकोज व स्टार्च असल्याने त्यांचा उपयोग मद्यनिर्मितीसाठी करतात. मेंढ्या, बकऱ्या व पक्षी फळे खातात परंतु मनुष्य, कुत्री व मांजरे यांना फळांमुळे विषबाधा होते. बीमुळे माणसांना अतिसार, पोटदुखी, ओकाऱ्या इ. त्रास होतो. पक्षाघात झाल्याची व ग्लानी आल्याची लक्षणे इतर प्राण्यांत दिसतात, असे प्रयोगान्ती आढळले आहे. आठळ्यांच्या माळा करतात. बियांत ४०% किंचित सुवासिक व सुकणारे तेल असते. या तेलात पामिटिक व स्टिअरिक अम्ले ११·४% आणि ओलेइक व लिनोलीइक अम्ले ८८·६% असतात. हे तेल साबण व केशवर्धक तेले यांत वापरतात. डोक्यातील उवा मारण्यास फुलांचे पोटीस बांधतात. कपडे व कागद यांमध्ये सुकी पाने ठेवल्यास ते कीटकांपासून सुरक्षित राहतात. प्लीहापवृद्धीवर (पाणथरी आकारमानाने लहान होण्यावर) या झाडाचा डिंक निंब व कवठ यांच्या डिंकाप्रमाणे गुणकारी असतो. चीनमध्ये फळे तापावर देतात, तसेच ती निर्जंतुकीकारक म्हणूनही वापरतात. बिया संधिवातावर देतात. मध्य काष्ठाचा (खोड आणि फांद्यांच्या आतील भागातील घन आणि गडद रंगाच्या लाकडाचा) रस दम्यावर देतात सालीचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) जंतावर गुणकारी असतो बाह्य सालीत टॅनीन असून ती स्तंभक असते अंतर्साल कडू आणि कृमिनाशक असते. ॲझॅरिडीन व पॅरेसीन ही अल्कलॉइडे सालीत असतात.

साधारणपणे वीस वर्षांपर्यंत हे झाड जगते. लॅटिन नावातील जातिवाचक शब्द ‘आझाद-दाराख्त’ या इराणी शब्दावरून घेतला आहे तसेच ‘पर्शियन लिलॅक’ या इंग्रजी नावावरून हा वृक्ष मूळचा इराणातील असावा, असे दिसते. बिया व छाट कलमे लावून नवीन लागवड करतात.

पहा : मेलिएसी.

बकाणा निंब : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळे