विल्यमसन, विल्यम क्रॉफर्ड : (२४ नोव्हेंबर १८१६-२३ जून १८९५). इंग्रज निसर्गवैज्ञानिक. आधुनिक पुरावनस्पतिविज्ञानाचे (खडकांत आढळणाऱ्या वनस्पतींच्या जीवाश्मांच्या अध्ययनाने गतकालीन वनस्पतींची माहिती मिळविणाऱ्या विज्ञान शाखेचे) एक संस्थापक. यांचा जन्म स्कारबरो (यॉर्कशर, इंग्लंड) येथे झाला. भूविज्ञानाचे व प्रकृतिविज्ञानाचे त्यांनी प्रारंभीच ज्ञान प्राप्त केले. क्रमशः त्यांनी शिकाऊ औषध विक्रेते, वैद्यकाचे विद्यार्थी, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक व वैद्य म्हणून कार्य केल्यानंतर त्यांची १८५१ मध्ये ओवेन्स महाविद्यालय (मँचेस्टर) येथे प्रकृतिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १८९२ पर्यत त्यांनी तेथे अध्यापनाचे काम केले. त्यांच्या प्रारंभीच्या लेखन कार्यात व्हॉल्व्हॉक्स या शैवलासंबंधी (१८५१-५२) व फोरॅमिनीफेरा (१८५८) या सजीव व विलुप्त सूक्ष्मप्राण्यांसंबंधीच्या संशोधनाचा समावेश होतो. त्यापूर्वी त्यांनी १८४५ मध्ये खोल सागरातील निक्षेपांचे (साचलेल्या थरांचे) अध्ययन सुरू केले होते व भूमध्य सामुद्रिक प्रदेशाच्या पूर्व भागातील चिखलात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांवर लेख लिहिला होता. फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स ऑफ दि रॉयल सोसायटीमध्ये त्यांनी माशांच्या दातांची व हडांची कोशिकीय (पेशीमय) संरचना व विकास यावर दोन लेख (१८४९-५१) लिहिले. या मौलिक संशोधनामुळे त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. पुरावनस्पतिविज्ञानाचे एक संस्थापक या नात्याने त्यांनी असे दाखवून दिले की, द्वितीयक काष्ठयुक्त विशिष्ट जीवाश्म हे खरोखरी अबीजी वनस्पतींचीच (शैवले, नेचे, शेवाळी इत्यादीची) लक्षणे आहेत. त्याकाळी ते बीजी वनस्पतींचे किंवा सपुष्प वनस्पतींचे लक्षण समजले जात असे. त्यांचे पुरावनस्पतीसंबंधीचे बरेचसे संशोधन ऑन दि ऑर्गनायझेशन ऑफ दि फॉसिल प्लँट्स ऑफ दि कोल मेझर्स (१८७२-९४) या शीर्षकाखाली १९ खंडांत प्रसिद्ध झाले. त्यानंतरही ⇨डी. एच्. स्कॉट यांच्या सहकार्याने त्यांनी तीन खंड (१८९५-९६) प्रसिद्ध केले. स्फेनोफायलम, लेपिडोडेंड्रॉन, स्टिग्मॅरिया व काही सुट्या बिया यासंबंधीचे त्यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे आहे. रेमिनिसेन्सिस ऑफ ए यॉर्कशर नॅचरॅलिस्ट (१८९६) या त्यांच्या ग्रंथात त्यांच्या साधारणतः १५० प्रकाशनांची यादी देण्यात आली आहे.

मँचेस्टर सायंटिफिक स्टुडंट्‌स ॲसोसिएशन, मँचेस्टर लिटररी अँड फिलॉसॉफिकल सोसायटी व युनियन ऑफ यॉर्कशर नॅचरॅलिस्ट्‌स या संस्थांचे ते अध्यक्ष होते. १८७४ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीचे सुवर्ण पदक आणि १८९० मध्ये जिऑलॉजिकल सोसायटीचे वोलॅस्टन पदक मिळाले. एडिंबर्ग विद्यापीठाने त्यांना एल्एल्. डी. ही पदवी १८८३ मध्ये बहाल केली. गटिंगेन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली होती. क्लॅपहॅम कॉमन (लंडन) येथे त्यांचे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.