माँटेरी सायप्रस : (१) शंकूसह फांदी, (२) शंकू, (३) बीजधारी खवला.

देवदार : (म., हिं. देवद्वार सं. देवदारू इं. हिमालयन सायप्रस लॅ. क्युप्रेसस टोरुलोजा कुल–क्युप्रेसेसी). महाभारत, बृहत्संहिता व इतर संस्कृत ग्रंथांत (रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव इ.) आणि आयुर्वेदीय चिकित्सेत देवदार वृक्षाचा उल्लेख आढळतो. इतकेच नव्हे, तर त्याच्या हिमालयातील स्थानाबद्दलही नोंद आढळते. प्रकटबीज वनस्पती ह्या उपविभागापैकी [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] शंकुमंत गणातील [→ कॉनिफेरेलीझ] क्युप्रेसेसी ह्या कुलात या उंच व सदापर्णी वृक्षाचा अंतर्भाव असून हल्लीही तो हिमालयाच्या वायव्य भागात, तसेच चंबा ते नेपाळ येथे सु. १,५५०–२,७९० मी. उंचीवर आढळतो तेथून चीनच्या पश्चिम भागापर्यंत त्याचा प्रसार आहे. जौंसर, गढवाल, सिमला, नैनिताल, कुलू इ. भागांत शिवाय मुंबई, पुणे, कलकत्ता येथील उद्यानांतूनही तो लावलेला आढळतो. चुनखडीची जमीन त्यास अधिक मानवते. याची उंची सु. ३०–४५ मी. व घेर सु. ३ मी. वा क्वचित जास्त असतो. साल फिकट तपकिरी असून तिचे उभे तुकडे सुटून पडतात. फांद्यांच्या विशिष्ट वर्तुळाकार मांडणीने वृक्षाला पिरॅमिडसारखा ठराविक आकार येतो. फांद्या गोलसर असून पाने फार लहान, खवल्यासारखी व त्रिकोणी असतात. केसरदले व किंजदले [→ फूल] अलग फांद्यांवर जानेवारी ते फेब्रुवारीत येतात. नर–अथवा पुं. शंकू (नतकणिशे) अनेक, लहान फांद्यांच्या टोकास एकाकी, अंडाकृती व लहान केसरदले छत्राकृती, सवृंत (देठ असलेले) असून त्यांच्या खालच्या बाजूस २–६ गोलसर परागकोश असतात स्त्री–शंकू गोल व त्यातील अक्षावर ५–६ छत्राकृती खवले (शल्क) व छत्राखाली दोन ते अनेक सरळ बीजके तळाशी व टोकास असलेले खवले वंध्य दोन्ही प्रकारच्या शंकूंवरील सर्व खवले समोरासमोर किंवा मंडलित असून शंकू ऑक्टोबर ते नोव्हेंबरात पक्व होतात. पक्व स्त्री–शंकू कठीण, १·३ सेंमी. व्यासाचे, अनेक व शुष्क असून प्रत्येकात अनेक सपक्ष (पंखासारखा विस्तार असलेल्या) चपट्या बिया असतात खवल्यांची छत्रे परस्परांना चिकटून असतात. दलिका २–४ असतात.

देवदाराचे लाकूड पिवळसर करडे व सुवासिक, मध्यम कठीण व फार टिकाऊ असून तासून व रंधून गुळगुळीत होते व रंगविता येते. सजावटी सामान, कपाटे, शिलेपाट (रेल्वेच्या रुळाखाली घालण्यात येणारे ओंडके), पूल इत्यादींकरिता व कोरीव सामानासाठी उपयुक्त असते. हिरवी ताजी पाने वाफेवर उकळून काढलेले तेल करडे व सुवासिक असते. त्यामध्ये प्रोपिऑनिक, कॅप्रॉइक, लॉरिक ही अम्ले आणि गॅमा टर्पिनिऑल असते.

अनेक खासगी व सार्वजनिक उद्यानांतून शोभेकरिता हा वृक्ष लावलेला आढळतो. नवीन लागवड बियांपासून करतात. गढवालमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर लागलीच बी पेरतात, जौंसरमध्ये जून ते नोव्हेंबरात व डेहराडूनमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबरात रोपे तयार होतात. त्यानंतर पन्हेरीतून तीन वर्षांनी ती काढून बाहेर लावतात. निसर्गतः बी उगवून आलेली रोपेही लावण्यास उपयुक्त असतात. रोपावरची आरंभीची पाने सुईसारखी ३–४ च्या पसरट झुबक्यात असतात. स्थानिक व विखुरलेल्या प्रसारामुळे या वृक्षांचे लाकूड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. मुख्यतः उत्तर प्रदेशातूनच त्याचा पुरवठा होतो. देवळात याचे लाकूड धुपाकरिता वापरतात. ⇨ सीडारच्या एका जातीस (सीड्रस डेओडारा) व बॉक्सवुडला [→ चिकरी (म्हणजे बॉक्स)] देवदार म्हटलेले आढळते.

शंकुमंत वनस्पतींच्या क्युप्रेसेसी कुलातील अनेक वृक्षांना इंग्लिशमध्ये ‘सायप्रस’ म्हणतात तथापि क्युप्रेसस वंशातील सु. बारा ते पंधरा जातींनाच सामान्यपणे हे नाव दिलेले आढळते तेच खरे ‘सायप्रस’ होत. इटालियन सायप्रस (क्यु. सेंपरव्हायरेन्स) भूमध्यसामुद्रिक प्रदेशात प्राचीन काळापासून आहे. वायव्य भारतात आढळणारा हा वृक्ष (म. सुरू हिं. सारा, सारस) जंगली जातीचा एक प्रकार मानतात. जंगली जाती आशिया मायनर, सिरिया व उ. इराणात आढळते. तिची उंची सु. २८ मी. असते. तिचे लाकूड व फळ स्तंभक (आकुंचन करणारे) व कृमिनाशक असते फळ सुगंधी, उत्तेजक व मूळव्याधीवर गुणकारी मानले जाते. तसेच लाकूडही बांधकाम व सजावटी सामानास उपयुक्त असते. माँटेरी सायप्रस (क्यु. मॅक्रोकार्पा) हा सु. ४६–५० मी. उंच वृक्ष कॅलिफोर्नियात आढळतो व त्याचा घेर सु. २·५०–३ मी. असतो. भारतात शोभेकरिता हा लावतात. क्यु. फ्युनोब्रिस (वीपिंग सायप्रस) हा उ. चीनमधला भव्य व उपयुक्त वृक्ष चीनमध्ये व हिमालयात मठाजवळ वा मंदिराशेजारी लावतात. गोवा सायप्रस (क्यु. ग्लॉका) भारतात शोभेकरिता लावतात. यांखेरीज सायप्रसच्या यादीतील इतर वृक्ष अन्य वंशांतील आहेत : उदा., लॉसन सायप्रस (कॅमिसायपॅरिस लॉसोनियाना) व अलास्का सीडार (कॅमिसायपॅरिस नूटकाटेन्सिस) हे अमेरिकेतील आहेत हिनोकी वृक्ष किंवा जपानी सायप्रस (कॅ. ऑब्‌च्यूसा) हा जपानातील आहे. सायप्रसची झाडे उत्तर क्रिटेशस काळापासून (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीपासून) पृथ्वीवर असून ती मध्यजीव महाकल्पातील (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वींच्या काळातील) शंकुमंतांपासून (पाइनचा गट) अवतरली असावीत, असे मानतात. बाल्ड सायप्रस (टॅक्सोडियम डिस्टिकम) हा द. अमेरिकेमधील मेक्सिकोतील असून त्याला श्वसनमुळे [→ मूळ] असतात त्याचेही लाकूड उत्तम असते.

पहा : सीडार.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1950.

           2. Kirtikar, K. R. Basu, D. B. Indian Medicinal Plants, Vol. III,  New Delhi, 1975.

क्षीरसागर, ब. ग. परांडेकर, शं. आ.