दारुहळद : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फळे.

दारुहळद: (हिं. दारहल्द, रसौत क. मरअरिशिण दारुहरिद्रा इं. इंडियन बार्बेरी लॅ. बर्बेरिस अरिस्टॅटा कुल–बर्बेरिडेसी). या काटेरी तांबूस भुऱ्या झुडपाचा प्रसार वायव्य हिमालयात १,८६०–३,१०० मी. उंचीपर्यंत आणि निलगिरी पर्वत, कुलू, कुमाऊँ इ. प्रदेशांत आहे. कोवळ्या फांद्या लाल असतात. पाने साधी, एकाआड एक व लांब फांद्यांवर असून काही काट्यांत रुपांतर पावतात. याची पिवळी फुले द्विलिंगी, नियमित, अवकिंज, त्रिभागी असून बाजूच्या आखूड फांद्यांवर मंजरीत येतात बाहेरची तीन परिदले संदलासारखी, आतील तीन प्रदलासारखी त्याच्या आतील सहा पाकळ्यांसारखी, परंतु तळाशी मधुप्रपिंडयुक्त (मधुरस स्रवणाऱ्या ग्रंथींनी युक्त) असतात. केसरदले स्पर्शग्राही असल्याने कीटकांच्या स्पर्शाने परागकोश एकदम तडकून फुटून पराग कीटकावर शिंपडतात व परपरागणास मदत करतात. ⇨ तमालाप्रमाणे परागकोश झडपांनी उघडतात [ → फूल]. मृदुफळ लाल व एका किंजदलापासून बनलेले असते.

मुळांच्या सालीपासून काढलेल्या अर्काला ‘रसौत’ म्हणतात ही साल, लाकूड व रसौत आरोग्य पुनःस्थापक आणि रेचक असून कातडीचे विकार, मासिक अतिस्राव, कावीळ, डोळ्यांचे विकार इत्यादींवर वापरतात. मुळांच्या सालीचा काढा हिवतापावर देतात. ह्या वनस्पतीत बर्बेरीन हे ⇨ अल्कलॉईड असते. मुळे व खोड यांपासून फार उपयुक्त असा पिवळा रंग मिळतो, तो मोरोक्को चामडे बनविण्यास वापरतात. वाळलेली फळे ‘झिरिश्क तुरश’ या व्यापारी नावाने ओळखतात. त्यांपासून तेल काढतात. बर्बेरिस व्हल्गॅरिस (काश्मीर ते नेपाळ) या जातीवर गव्हाच्या ‘तांबेरा’ रोगाची एक अवस्था असते. ही जातीही औषधी आहे. कौशिक सूत्र, कौटिलीय अर्थशास्त्र, शुक्रनीतिकामंदकीय नीतिसार या ग्रंथांत दारुहरिद्रेचा उल्लेख आढळतो हा उल्लेख तिकटा या नावाने असून त्याचा केशवर्धनासाठी उपयोग सांगितला आहे.

जमदाडे, ज. वि.