आर्बर, ॲग्नेस : (१८७९–     ). ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ. फुलझाडांचा व त्यांपैकी एकदलिकित वनस्पतींचा त्यांनी विशेष तपशीलवार अभ्यास केलेला आहे.  त्यांचे शिक्षण केंब्रिजमधल्या न्यूमन कॉलेजमध्ये होऊन १९०७ मध्ये त्यांची तेथील विद्यापीठात अध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०९ मध्ये त्यांचा विवाह न्यूएल आर्बर यांच्याशी झाला.  वनस्पतिविज्ञानाच्या इतिहासातील काहीशा दुर्लक्षित बाजूसंबंधी त्यांनी हर्बल्स  हा सुंदर ग्रंथ लिहिला (१९१२).  याशिवाय वॉटरप्लँट्स (१९२०), मोनोकॉटीलेडॉन्स (१९२५), ग्रॅमिनी  (१९३४) आणि नॅचरल फिलॉसॉफी ऑफ प्लँट-फॉर्म  (१९५०) हे वनस्पतिविज्ञानावरील बहुमोल ग्रंथ त्यांनी लिहिले. १९४६ मध्ये त्यांना रॉयल सोसायटीने फेलो म्हणून निवडले व १९४८ मध्ये लिनीअन सोसायटीचे लिनीअन पदक त्यांना बहाल करण्यात आले.

जमदाडे, ज. वि.