घणसरी : (घणसर, गणासूर, गानसुरी हिं. चुक्का सं. नागदंती, भूतांकुश लॅ. क्रोटॉन ऑब्लाँगिफोलियस कुल-यूफोर्बिएसी) सु. ६–९ मी. क्वचित १२ मी. उंची व ०·६–०·९ मी. घेर असलेला हा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र, ब्रह्मदेशात व श्रीलंकेत आढळतो. साल २·५ सेंमी. जाड, भूरी वा तपकिरी असून कोवळे भाग व फुलोऱ्यावर रुपेरी खवले असतात. पाने सोपपर्ण (उपपर्णयुक्त), साधारण आंब्याच्या पानासारखी, एकाआड एक व दातेरी असून फांद्यांच्या टोकास दाटीने येतात. फुले एकलिंगी, लहान, पिवळसर हिरवी असून पुं-व स्री-पुष्पे  एकत्र, लांब मंजिऱ्यांवर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात व अर्धवट गोलसर, त्रिखंडी बोंडे एप्रिल-मेमध्ये येतात [ ⟶ युफोर्बिएसी ].

घणसरी : (१) पाने, कळ्या, फुले व फळे यांसह फांदी (२) फळांचा घोस.साल, मुळे, फळे व बिया रेचक (सर्पदंशामध्ये देतात). साल व मुळे आरोग्य पुनःस्थापक सालीचा उपयोग लचकणे, मुरगळणे वं संधिवात यांवर बाहेरून लावण्यासाठी करतात. यकृतवृद्धीवर व सतत तापावरही ती देतात. बियांचे तेल रेचक व कीटकनाशक असते. लाकूड पिवळट पांढरे, मध्यम प्रतीचे, कठीण, जड आणि किरकोळ उपयोगाचे असते.

पहा : जमालगोटा.

                                                                                                      जमदाडे, ज. वि.