पिओनी: फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) पिओनिया या लॅटिन नावाने ओळखल्या जाणार्‍या वंशातील वनस्पतींचे हे इंग्रजी नाव आहे. या वंशात एकूण सु. ३० जाती असून त्यांचा प्रसार समशीतोष्ण युरेशिया, पश्चिम व उत्तर अमेरिका येथे आहे. या एकमेव वंशाचा समावेश हल्ली पिओनिएसी या नविन कुलात केला जातो पूर्वी ⇨ रॅनन्क्यलेसी कुलात (मोरवेल कुलात) करीत व अद्यापि कित्येक जण तसा करतात. बहुतेक जाती ओषधीय [⟶ ओषधी] व क्षुपे (झुडपे) असून पिओनिया सफ्रुटिकोसा हा १-२ मी. उंच वृक्ष आहे. ओषधीय जाती बागेत शोभेकरिता लावतात. यांचा नाजूकपणा व सुगंध गुलाबाशी तुलनीय असून एकेरी व दुहेरी पुष्पमुकुटाचे प्रकार अथवा जाती आढळतात. भारतात फक्त उदसालप (पिओनिया इमोदी) ही एक जाती हिमालयात काश्मीर ते कुमाऊँ या भागात सु. २,०००-३,००० मी उंचीवर आढळते. डोंगराळ भागात बागेत लावलेली आढळते. याशिवाय चार-पाच जातीही बागेत लावतात. सूर्यप्रकाश आणि चांगली दुमट व सकस जमीन त्यांना आवश्यक असते.

युरोपिय पिओनी 

उदसालप : (इं. हिमालयन पिओनी). हे हिंदी नाव असून काश्मिरात ‘मिद’ व पंजाबात ‘चंद्रा’ म्हणतात. हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) क्षुप असून त्याच्या भूमिस्थित (जमिनीतील) सरळ मूलक्षोडापासून जाडजूड व मुळे निर्मिणार्‍या खोडापासून मांसल मुळे निघताता. पाने एकांतरित (एकाआड एक), संयुक्त व पिसासारखी दले आयत किंवा कुंतसम (भाल्यासारखी), फुले आकर्षक, ७-१० सेमी. व्यासाची, पांढरी किंवा लाल, बहुदा एकेकटी तर कधी २-३ एकत्र अशी उन्हाळ्यात येतात. पेटिकाफळ अंडाकृती बिया फार थोड्या असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे रॅनन्क्यूलेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. कोवळ्या पील्याची भाजी करतात. मांसल मुळे गर्भाशय विकार, पित्तविकार, जलशोथ, तंत्रिका तंत्र विकार (मज्जा संस्थेचे विकार) इत्यादींवर उपयुक्त मुलांच्या रक्तशुध्दीवर गुणकारी अधिक घेतल्यास डोके दुखी, दृष्टीभ्रम, घेरी आणि वांती ही लक्षणे दिसतात. बिया वांतीकारक  (ओकारी आणणार्‍या) व विरेचक सुकलेल्या फुलांचा युरोपिय पिओनी फांट (पाण्यात भिजवून काढलेला अर्क) अतिसारावर देतात.

पिओनी : तीन प्रकार

पिओनिया ऑफिसिनॅलिस ह्या युरोपिय जातीच्या मुळांत व बियांत विषारी अल्कलॉइड असते त्यामुळे मूत्राशयाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे आकुंचन होऊन रक्त लवकर साकाळते इतर गुणधर्म उदसालप्रमाणे असतात.

अभिवृद‌्धी (लागवड) सप्टेबर-ऑक्टोबरात मूलक्षोडाचे तुकडे लावून करतात. बिया लावल्यास फुले येण्यास ६-८ वर्षे लागतात. दुहेरी पुष्पमुकुट असलेल्या जातींची फुले गुलाबासारखी दिसतात.  

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.