वनस्पति–अभिज्ञान : वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये प्रत्येक वनस्पती ओळखणे, तिला नाव देणे व प्रचलित वर्गीकरणाच्या पद्धतीत तिला योग्य असे तिचे नैसर्गिक स्थान देणे यांचा समावेश होतो. यांपैकी येथे फक्त वनस्पती ओळखण्यासंबंधी विवेचन केलेले आहे. वनस्पतीला नाव देणे व तिचे वर्गीकरण करणे यांसंबंधीची माहिती स्वतंत्र नोंदीत दिली आहे [⟶ वनस्पतिनामपद्धति वनस्पतींचे वर्गीकरण].

आपल्याभोवती विविध प्रकारच्या असंख्य वनस्पतींची गर्दी दिसते त्यांतील कित्येक परिचित असून एखादीबद्दल माहिती नसल्याने तिच्याबद्दल जिज्ञासा उत्पन्न होते. ती कोणती असावी हे ओळखून काढण्यास आपण कळत वा नकळत तिची कोणत्याही परिचित वनस्पतीबरोबर तुलना करतो. यामध्ये साम्य दर्शविणारी लक्षणे आढळल्यास आपण ती परिचित असल्याचे ठरवितो, म्हणजेच ती ओळखतो. परंतु साम्याऐवजी ती विरोधी लक्षणांनी युक्त असल्यास तिची ओळख पटत नाही व ती नवीन ठरते. तुलना करताना ज्ञात असलेल्या जिवंत वनस्पती, परिरक्षित (विशेष प्रकारे टिकवून साठविलेले) नमुने, वर्णने, छायाचित्र इत्यादींचा उपयोग करण्याची पद्धत असून ⇨वनस्पतिसंग्रहात किंवा ⇨शास्त्रीय उद्यानासारख्या संख्येत या कार्याकरिता विशेष प्रकारच्या सोयीही असतात. त्यांचा उपयोग करून वनस्पती ओळखण्याच्या प्रक्रियेस अभिज्ञान म्हणतात. यामध्ये नावाचा संबंध येतोच असे नाही. आधी नाव माहीत असलेल्या दुसऱ्या वनस्पतींशी पूर्ण साम्य आढळल्यास नावाचा प्रश्न उद्‌भवतच नाही परंतु ज्या वेळी अपरिचित वनस्पती अंशतः किंवा पूर्णतः निराळी ठरते म्हणजेच वनस्पतिविज्ञानाला नवीन असते त्या वेळी तिला नाव देणे आवश्यक ठरते. नामाभिधान ही नंतरची प्रक्रिया असून ओळखण्याच्या प्रक्रियेशी तिचा संबंध नसतो. या विवेचनावरून अभिज्ञान म्हणजे एखाद्या वनस्पतीची ज्ञात वनस्पतीशी तुलना करून अंशतः किंवा पूर्णतः तीच आहे असे ठरविणे अथवा ती निश्चितपणे नवीनच आहे असा निर्णय देणे.

वनस्पतींच्या माहितीचा अनेक वर्षे उपयोग करून वनस्पतिशास्त्रज्ञांनी अभिज्ञानाच्या सोयीकरिता संदर्भग्रंथ ( फ्लोरा ) बनविले असून त्यांमध्ये भिन्न प्रदेशांतील ⇨पादपजातीतील (सर्व प्रकारच्या वनस्पतींतील) ज्ञात वनस्पतींची वर्णने दिली आहेत व त्याशिवाय काहीशा यांत्रिक पद्धतीने अपरिचित वनस्पति ओळखणे सोपे व्हावे म्हणून विश्लेषणात्मक ‘किल्ल्या’ (उकल होण्याच्या यंत्रणा) दिलेल्या असतात त्यांमध्ये एखाद्या मोठ्या गटातील (बहुधा कुलातील किंवा उपकुलातील) वनस्पतींची महत्त्वाची विरोधी लक्षणे प्रथम लक्षात घेऊन त्यांच्या दोन किंवा अधिक शाखा करतात व त्यानंतर कमी महत्त्वाची विरोधी लक्षणे क्रमाने विचारात घेऊन लहान लहान गट बनवितात. उदा., साधी पाने व संयुक्त पाने असलेले दोन वेगळे गट करून त्यांपैकी एकात केसाळ व केशहीन असे दोन उपगट व दुसऱ्या शुष्क फळे, मृदुफळे व अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे असलेले असे तीन उपगट करून अपरिचित वनस्पती ओळखण्याकरिता तुलनेचे क्षेत्र लहान करीत आणतात. संदर्भग्रंथात भिन्न प्रकारच्या कृत्रिम किल्ल्या वापरलेल्या आढळतात परंतु दोन प्रकार विशेषेकरून आढळतात आणि त्यातही दातेरी किल्लीचा प्रकार सामान्यपणे आढळतो. यामध्ये प्रत्येक विरोधी लक्षणाचे (किंवा लक्षणांच्या गटाचे) वर्णन ग्रंथाच्या (पृष्ठाच्या) समासापुढे डावीकडून उत्तरोत्तर अधिक अंतरावर लिहिले जाते. किल्लीमध्ये जितक्या अधिक प्रजातींचा किंवा जातींचा अंतर्भाव असेल त्याप्रमाणे ती अधिक दातेरी होते.

खाली दिलेल्या कोष्टकामध्ये ⇨लिलिएसी कुलातील काही प्रजातींच्या अभिज्ञानाकरिता वापरलेली (संदर्भ क्र. २ पहावा) एक लहान कृत्रिम दातेरी किल्ली दिली आहे.

(अ) क्षुपे (झुडपे) भूमीवरील खोड बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), मृदुफळ असलेले–

(१) खोड पर्णहीन पर्णकांडे व सूक्ष्म पर्णकंटक–अँस्परॅगस (१) 

(२) खोड पर्णयुक्त–

(अ) सिराविन्यास (पानातील शिरांची मांडणी) जाळीदार पर्णतलाशी दोन प्रताने (ताणे)–स्मायलॅक्स (२).

(आ) अनेक शिरांची पाने सिराविन्यास समांतर सरळ खोडाच्या टोकास पानांचा झुबका किंजपुटाच्या प्रत्येक कप्प्यात एकच बीजक–ड्रॅसीना (३).

(आ) आरोही ओषधी खोड पर्णयुक्त पर्णाग्र प्रतानयुक्त फुले मोठी व दिखाऊ–ग्लोपरिओसा (४).

(इ) आवृतकंदयुक्त ओषधी पाने मूलज, पोकळ किंवा सपाट पुष्पबंधाक्षाच्या तळास वेढणारी फुलोरा सशीर्ष (डोक्यासारखा) किंवा चामरकल्प (चवरीसारखा) प्रथम छदमंडलाने वेढलेला व पुष्पबंधाक्षाच्या टोकास असलेला–ॲलियम (५).

[पहा : ( १ ) शतावरी ( २ ) चोपचिनी ( ३ ) ड्रॅसीना ( ४ ) कळलावी ( ५ ) कांदा]. 


दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे ‘समांतर किल्ली’ मध्ये दोन किंवा अधिक विरोधी लक्षणांचे गट क्रमवार एकाखाली एक ओळीत लिहिले जातात, त्यामुळे तुलना सोपी जाते. खाली दिलेल्या कोष्ठकावरून हे स्पष्ट होईल. तेथे एकदलिकितांची द्विदलिकितांशी तुलना केल्यास आढळणारी विरोधी लक्षणे प्रथम समांतर लिहून नंतर फक्त एकदलिकितातील सात कुलांचे अभिज्ञान कोणत्या विरोधी लक्षणांनी दर्शविले जाते त्यांची वर्णने समांतर दिली आहेत.

(१) एकदलिकित : बहुतेक सर्व ओषधीय वनस्पती असून त्यांच्या भेंडामध्ये वाहक वृंद इतस्ततः विखुरलेले असतात. पानांतील सिराविन्यास समांतर, क्वचित जाळीदार फुले ३ किंवा ६ भागी, परंतु ५ भागी नसतात. स्मायलॅक्स प्रजातीखेरीज इतरांतील जाती ओषधीय (अ).

(२) द्विदलिकित : ओषधीय व काष्ठयुक्त वनस्पती असून त्यांमध्ये भेंडाभोवती वाहक वृंदाचे वलय असते पानांतील सिराविन्यास जाळीदार व फुले ४ किंवा ५ भागी (ए).

(अ) एकदलिकित वनस्पति

(अ) जाड व मांसल स्थूल कणिशावर [⟶ पुष्पबंध] परिदलहीन किंवा परिदलयुक्त फुले पाने सवृंत व जाळीदार शिरांची–ॲरेसी

(अ) फुले परिदलयुक्त पण स्थूल कणिश नसते (आ)

आ. परिदले शुष्क व खवल्यासारखी–जुंकेसी

आ. परिदले हिरवी किंवा रंगीन (इ)  

(इ) परिदलापासून किंजपुट अलग–लिलिएसी 

(इ) परिदले थोडीफार किंजपुटास चिकटलेली (ई)

ई. फुले अनियमित १–२ केसरदले किंजकेसरित–ऑर्किडेसी

ई. फुले नियमित (अपवाद आयरिस) केसरदले ३–६ (उ)

(उ) फुले अपूर्ण वनस्पती विभक्तालिंगी, आरोहिणी पाने अंडाकृती सिराविन्यास जाळीदार–डायॉस्कोरिएसी

(उ) फुले पूर्ण (ऊ)

ऊ. केसरदले ६ परिदले परिहित –ॲमारिलिडेसी

ऊ. केसरदले ३ परिदले संवलित–इरिडेसी

पहा : फूल. 

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. An Introduction to Plant Taxonomy, New York, 1958.

           2. Mukherji. H. Ganguly. A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

परांडेकर, शं. आ.