पित्तमारी : (पित्तवेल, पित्तपापडा, पापडावेल, तीन पानी क. नेलनारिंग सं. भूमिनागरंग, अम्‍लवल्ली, कंदबहुला, त्रिपर्णी इं. गोअनीज इपेकॅक्युन्हा लॅ. नॅरेगॅमिया अलाटा कुल-मेलिएसी). हे सु. ३० सेंमी उंचीचे एक शाखायुक्त लहान झुडूप प. घाटात कोकणापासून खाली दक्षिणेकडे ९०० मी. उंचापर्यंतच्या प्रदेशात आढळते. ह्याच्या नॅरेगॅमिया या वंशात फक्त दोन जाती असून ही वनस्पती त्यांपैकी एक जाती आहे. पाने एकाआड एक, संयुक्त व त्रिदली (त्यावरूनच ‘तीन पानी’ हे नाव पडले आहे) असून देठ सपक्ष असतो. फुले नोव्हेंबर ते डिसेंबरात एकेकटी किंवा जोडीने व पानांच्या बगलेत येतात. पाकळ्या पांढर्‍या, पाच, सुट्या व लांबट चमच्यासारख्या असून फुलात वलयाकार बिंब असते. फळ (बोंड) नारिंगी व अंड्यासारखे असून तीन शकलांनी उघडते. प्रत्येकात दोन, लोंबती, गर्द तपकिरी, वाकडी व मांसल बीजे असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मेलिएसी कुलात (निंब कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पित्तमारी : (1) पानांफुलांसह संपूर्ण वनसपती (2) फूल (3) फळ (4) फळाचा आडवा छेद (5) बी (उभा छेद)मुळांमध्ये इपेकॅक्युन्हासारखे [  ⟶ इपेकॅक ] गुणधर्म आहेत. त्यांना तिखट सुगंध असून ती वांतिकारक (ओकारी आणणारी), कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), पित्तनाशक व आमांशावरगुणकारी असतात.दक्षिण भारतात ही वनस्पती संधिवातावर आणि कंडूवर वापरतात. कोकणात पित्तविकातरात पाने आणि खोडाचा काढा देतात. हिवताप व इतर जुनाट ताप, रक्तहीनता (पांडुरोग), प्लीहावृद्धी (पानथरी वाढणे) इत्यादींवरच्या औषधी चूर्णांत ही वनस्पती वापरतात. हिचा रस खोबरेलाबरोबर खाज व कंडूवर लावतात. पाने वाळवून त्यांची राख तुपात खलून लावल्यास जुनाट जखमा बर्‍या होतात. मुळाच्या सालीत नॅरेगॅमीन हे अल्कलॉइड, मेदी (स्निग्ध) तेल, मेण, साखर व रेझीन असते. चरकसंहितेत त्रिपर्णी या नावाने पित्तमारीचा उल्लेख केलेला आढळतो.

परांडेकर, शं.आ.