रतनगुंज : (रत्नगुंज, थोरली गुंज, मोठी गुंज, वाल हिं. गु. बडी गुंची, हत्ती गुंची क. मंजुती सं. कुचंदन, रंजक इं. रेडवुड, कोरल वुड, कोलर पी लॅ. ॲडिनॅन्थेरापूव्होनिना कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-मिमोजॉइडी). सु. १८–२४ मी. उंच व २–२·५ मी. घेर असलेला हा पानझडी वृक्ष फुलझाडांपैकी [⇨वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन

रतनगुंज : (१) पानाफुलांसह फांदी, फुल, (३) तडकलेले फळ

दलिका-दले-असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील आहे. त्याचा प्रसार द. भारत, सह्याद्री, पूर्व उपहिमालय, अंदमान बेटे इ. प्रदेशांत आहे. यांशिवाय ब्रह्मदेश, मलाया, फिलिपीन्स, चीन, पाकिस्तान व श्रीलंका या देशांतही हा वृक्ष आढळतो. ⇨ बाभूळव ⇨ शिरीष यांच्याशी काही लक्षणांत याचे साम्य आहे. या वृक्षाच्या प्रजातीतील एकूण आठ जातींपैकी भारतात फक्त एकच आहे. ही कोकण व कारवारच्या जंगलांत सामान्यपणे आढळते तथापि उद्यानांतून व रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरिता लावतात. याला द्विगुण पिच्छाकृती (पिसासारखी दोनदा विभागलेली) संयुक्त पाने (२०–४५ सेंमी. लांब) असून त्यांवर ७–१७ सेंमी. लांबीच्या दलांच्या ३–६ जोड्या असतात प्रत्येक दल ८–१६ दलकांचे असून प्रत्येक दलक २·५–३·७X२–०·८ सेंमी. असते ते पातळ व लंबगोल असून टोकास गोलसर असते. दले समोरासमोर; परंतु दलके एकाआड एक असतात. पानांच्या बगलेत किंवा काही फांद्यांच्या टोकांस ५–२० सेंमी. लांबीचे फुलोरे [मंजरी किंवा परिमंजरी ⇨ पुष्पबंध]  मार्च ते मेमध्ये येतात. फुले फार लहान, पिवळट व सुगंधी असून त्यांत दहा केसरदले (पुं-केसर) असतात. फळ (शिंबा-शेंग) १५–२३X१·३ सेंमी., काहीसे वाकडे, टोकदार व सपाट असून सुकल्यावर त्याचे दोन भाग स्वतःभोवती पिळवटून स्वतंत्र होतात त्या वेळी अनेक (१०–१२) बिया सुटून फेकल्या जातात. प्रत्येक बी मसुराच्या आकाराची, गुळगुळीत, चकचकीत, सु. ०·८ सेंमी. व्यासाची व शेंदरी असते. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजीअथवा शिंबावंत कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

सर्वसाधारणपणे ओलसर हवेत हा वृक्ष चांगला वाढतो. लागवडीकरिता छाटकलमे पावसाळ्यात लावतात. बिया प्रथम चांगल्या भिजत ठेवून नंतर पेरल्यास लवकर रुजतात. या वृक्षाचे मध्यकाष्ठ लाल रंगाचे, जड, कठीण व टिकाऊ असून ते रक्त्तचंदनाऐवजी [⇨ चंदन]  वापरतात. दक्षिण भारतात ते घरबांधणीत व कपाटाकरिता उपयोगात आहे. लाकडाचे चूर्ण लाल रंगाकरिता वापरतात आणि त्याचे गंध कपाळास लावतात. बियांच्या माळा दागिन्याप्रमाणे घालतात आणि सोनार व जव्हेरी लोक सोने-मोती व खडे तोलण्यास वापरतात. बियांत १४% स्थिर तेल असून तेलात  २५% लिग्नोसेरिक अम्ल असते. बिया व लाकूड यांचा काढा फुप्फुसाच्या विकारांत देतात तसेच तो जुनाट नेत्रशोथावर (डोळ्याच्या दाहयुक्त सुजेवर) बाहेरून लावतात. बियांचे चूर्ण टाकणखाराबरोबर मिसळून एक उपयुक्त लुकण बनवितात. दक्षिण भारतात पानांचा काढा जुनाट संधिवातावर देतात दीर्घकालपर्यंत घेतल्यास तो वाजीकर (कामोत्तेजक) असतो रक्त्तमेहावरही तो उपयुक्त असतो.

संदर्भ :

  • Kirtikar, K. R.; Basu, B. D., The Indian Medicinal Plants, Vol. II. New Delhi, 1975.
  • McCann, C., 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.

 लेखक : परांडेकर, शं. आ.