भेंड : (निकाष्ठ, मज्जा लॅ. मेड्यूला, पिथ). उच्च दर्जाच्या वनस्पतींच्या अक्षात (खोड, मूळ इ.) सामान्यतः आढळणारा व वाहक

भेंडाचे प्रकार : (१) सलग, (२) पटलयुत्क, (३) कोटकयुत्क

P - 749 - 1

  

ऊतकांनी (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या समूहांनी) नळीप्रमाणे वेढलेले नरम मध्यभाग. सायलोटेलीझ, लायकोपोडिएलीझ व स्फेनोफायलेलीझ या गणांतील वनस्पतींत व काही ⇨ नेच्यांमध्ये भेंड नसते. बहुतेक फुलझाडांच्या व काही प्रकटबीजवनस्पतींच्या (उदा., सायकस, पाइन इ.) खोडांत आणि काहींच्या मुळांत (उदा., काही नेचे, अनेक एकदलिकीत व काही द्विदलिकित) भेंड आढळते परंतु बहुतेक मुळांत ते नसते. भेंड ⇨ मृदूतकयुक्त असून त्यातील कोशीका बहुधा पातळ आवरणाच्या, समव्यासीय (समान व्यास असलेल्या) किंवा लांबट असून त्यांच्या उभ्या रांगा असतात कारण अग्रस्थ विभज्येपासून (टोकाजवळच्या सतत निर्मिती करणाऱ्या कोशिकांपासून) त्यांची निर्मिती आडव्या पडद्यांनी होते [⟶ विभज्या]. कधी काहींचे कोशिकावरण पुढे जाड व लिग्निनयुक्त होते. काही कोशिका लवकर मृत होतात आणि त्यामुळे सजीव व मृत कोशिकांचे भिन्न मिश्रण भेंडात आढळते . कोशिकांत स्टार्च किंवा मेदी (स्निग्ध) पदार्थ आढळतात. तसेच स्त्रावक कोशिका अथवा नलिका व चिकाळ (चीक असलेल्या) नलिकाही काही वनस्पतींत आढळतात [⟶ चीक]. कठक प्रकारच्या (मृत व कठीण) कोशिकाही विखुरलेल्या असतात. काही नेचांच्या खोडातील आतला भाग ⇨ दृढोतकयुत्क व बाहेरचा मृदूतकयुत्क असतो. बहुधा भेंड सलग (अखंडीत) असे असते तथापि काही द्विदलिकित वनस्पतींच्या खोडांत दृढोकाचे आडवे पडदे बनल्याने अशा भेंडाला पटलयुत्क मज्जा म्हणतात. (उदा., ट्युलिप वृक्ष), तर काहींत (उदा., अक्रोड) मृदूतकाचा नाश होऊन फक्त हे पडदे शिल्लक राहिल्याने त्याला कोटरयुत्क मज्जा म्हणतात. काहींत तर (उदा., बांबू, कळक) मज्जनाश होऊन खोडामध्ये पोकळ्या बनतात, फक्त पेऱ्याजवळ पडदे राहतात व त्यात ⇨ वाहकवृंद (पाणी व अन्न नेणाऱ्या घटकांचे समूह) असतात.

मज्जेपासून ⇨ मध्यत्वचेपर्यंत, वाहकवृंदामधून जाणाऱ्या ऊतकांच्या उभ्या पडद्यांना मज्जाकिरण म्हणतात. मज्जेच्या मध्यवर्ती स्तंभाचा बाहेरचा वाहकवृंदाजवळचा भाग अनेकदा कोनयुक्त असतो, तसेच त्या भागातील कोशिका लहान व जाड आवरणाच्या असून त्या अधिक काळ जिवंत राहतात, या भागाला मज्जवरण म्हणतात. वाहकवृदांच्या अधिक जटिल (गुंतागुंतीच्या) मांडणीत काही वृंद मज्जावरणात तर काही (प्रमुख) त्याबाहेर असतात. ज्या वनस्पतींच्या खोडात द्वितीयक वृद्धीमुळे काष्ठाची वाढ होते, त्यातील भेंड नाहीसे होत जाते.

पहा : रंभ शारीर, वनस्पतींचे.

परांडेकर, शं. आ.