गोरखमुंडी : (हिं. मुंडी सं. हपुषा, मुंदिरिका, अरुणा, चित्रग्रंथिका लॅ. स्फेरँथस इंडिकस कुल – कंपॉझिटी). श्रीलंका, आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत इ. प्रदेशांत सर्वत्र (बहुधा भाताच्या मोकळ्या

गोरखमुंडी : (१) स्तबकासह फांदी, (२) फुलोरा (स्तबक), (३) स्त्री-पुष्प, (४) द्विलिंगी फूल, (५) कृत्स्नफल.

शेतांत) ही पुष्कळ फांद्यांची ०·३० मी. उंच ⇨ओषधी  आढळते. खोड व फांद्यांवर दातेरी पंख आणि प्रपिंडीय (ग्रंथीयुक्त) केस असतात. पाने बिनदेठाची, तळाशी खोडाला जास्त चिकटलेली (अधोगामी), आयत-व्यस्त अंडाकृती, प्रपिंडीय केसाळ व दातेरी असतात. जांभळ्या सूक्ष्म पुष्पकांची ९·३–१५·६ मिमी. वाटोळी संयुक्त स्तबके [ → पुष्पबंध] केसाळ अक्षावर एकेकटी नोव्हेंबर-जानेवारीत येतात. बाहेरील पुष्पके स्त्रीलिंगी व फलनक्षम, आतील द्विलिंगी, वंध्य किंवा फलनक्षम पिच्छ-संदले नसतात [→ फूल]. कृत्स्नफल (शुष्क, आपोआप न फुटणारे व एकच बी असलेले फळ) बारीक आणि गुळगुळीत, इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ कंपॉझिटी  कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत.

मूळ व बी कृमिनाशक फुले शीतक, पौष्टिक, आरोग्यकारक वनस्पतीचा काढा मूत्रल (लघवी साफ करणारा) फळाची साल मत्स्यविष. या झाडात स्फेरेंथाइन हे अल्कलॉइड असते. सर्वच वनस्पती कटू, तिखट, पाचक व कृमिनाशक असते अपचन, मूळव्याध, शूल, अर्बुद (पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण झालेली व शरीरक्रियेस निरुपयोगी असलेली गाठ) इत्यादींवर उपयुक्त असते. 

पराडकर, सिंधु अ.