काजळा : (फांगळी; हिं. हलसी; लॅ. एजिसिरॅस मॅजूस; कुल – मिर्सिनेसी). समुद्रकिनारी चिखलात वाढणारे हे झुडूप सु. दोन ते सहा मी. उंच वाढते. मुंबई, कारवार, सुंदरबन, अंदमान बेटे व कराची ह्या ठिकाणी ते आढळते.

काजळा

त्यात पांढरा चीक असतो. पाने मोठी, साधी एकांतरित (एकाआड एक), वरून फिकट हिरवी व खालून निळसर, तळाकडे निमुळती, आखूड देठाची, टोकास खाचदार; फुलोरा चवरीसारखा असून त्यावर अनेक, लहान, पांढरी व सुवासिक फुले फेब्रुवारीत येतात. फळ २.५-७ सेंमी. लांब, लांबट, वाकडे, टोकदार, तळाशी पेल्यासारख्या संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरील मंडलाने, पुष्पकोशाने) वेढलेले व पिंगट असते; बी एकच असून ते फळात रुजते व आदिमूळ (वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाचा खालचा भाग) बाहेर येते (अपत्यजनन). लाकूड लालसर, कठीण आणि किरकोळ उपयोगाचे असते. साल कातडी कमाविण्यास उपयुक्त; सालीची पूड मत्स्यांना विषारी असते.

 

पहा : वनश्री (कच्छ वनश्री).

 

नवलकर, भो. सुं.