एडगर शॅनॉन अँडरसन.

अँडरसन, एडगर शॅनॉन : (९ नोव्हेंबर १८९७– ). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील·फॉरेस्टव्हिल (न्यूयॉर्क) येथे जन्म. त्यांचे शिक्षण मिशिगन स्टेट विद्यापीठात, वनस्पतिविज्ञान व उद्यानविज्ञान या विषयांतील बी. एस्‌सी. पदवीपर्यंत (१९१८) झाले.·त्यानंतरचे शिक्षण ई. एम्. ईस्ट यांच्या मार्गदर्शानाखाली हार्वर्ड विद्यापीठाच्या बसे संस्थेत होऊन ते एम्. एस्. (१९२०) व एस्‌सी. डी. (१९२२) झाले. त्यापुढे वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वनस्पतिविज्ञानाच्या हेन्‍री शॉ स्कूलमध्ये व मिसूरी शास्त्रीय उद्यानात, एकाच वेळी (१९२२—३१) ते प्राध्यापक व संशोधक म्हणून काम करीत असत. १९३१—३५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक व आर्नल्ड वृक्षोद्यानात वृक्षतज्ज्ञ‍ आणि १९३५ नंतर पुन्हा वॉशिंग्टन विद्यापीठात व मिसूरीत प्राध्यापक याप्रमाणे त्यांनी काम केले. इंट्रोग्रेसिव्ह हायब्रिडायझेशन (१९४९) व प्‍लँट्स,मॅन अँड लाइफ (१९५२) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १९५४ मध्ये ते नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य झाले. वनस्पतींच्या वर्गीकरणातील व जातींच्या क्रमविकासातील समस्या सोडविण्यास कोशिकाविज्ञान (शरीरातील कोशिकांचा म्हणजे सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र) व ⇨आनुवंशिकी यांतील तंत्र व कल्पना यांची मदत घेणाऱ्यापैंकी अँडरसन हे एक असून तंबाखू,आयरिस,ॲपोसायनम, मका इत्यादींसंबंधीचे संकरण, रंगसूत्रे (आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेणारे सुतासारखे घटक) वगैरेंचा त्यांनी सखोल अभ्यास व महत्त्वाचे संशोधन केले आहे. क्रमविकासात संकराचे महत्त्व व इंट्रोग्रेशनची (जनुकाचा एका जनुकसमुच्चयातून दुसऱ्यात प्रवेश, → जीन) प्रक्रिया यांमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.ट्रॅडेस्कँशिया पॅल्युडोसा ही नवीन शोभिवंत जाती त्यांनी शोधून काढली आहे. [→ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना].

परांडेकर, शं. आ.