व्हॅनिला : (इं. व्हॅनिला बीन लॅ. व्हॅनिला प्लॅनिफोलिया, व्हॅ. ताहितेन्सिस कुल-ऑर्किडेसी). युरोपादी देशांतील एक लोकप्रिय वनस्पती. उष्ण कटिबंध आरोही (आधारावर चढणाऱ्या) आमरांची (ऑर्किडांची) व्हॅनिला ही प्रजाती आहे. या वनस्पतीच्या बोंडांपासून (फळांपासून) भरपूर वापरात असलेला व्हॅनिला हा स्वादकारक द्रव काढतात. व्हॅनिलाचा उपयोग ॲझटेक लोक चॉकलेट पेयाला स्वाद येण्यासाठी करीत. हा वापर माँतेझूमांच्या दरबारात ते पेय एर्नान कॉर्तेझ (१४८५-१५७४) यांनी प्राशन करण्यापूर्वी अनेक शतके होत होता.

व्हॅनिलाच्या झाडाचे खोड लांब व मांसल असते. ते हवाई मुळांच्या साहाय्याने इतर झाडांना चिकटून राहते, तसेच त्याची मुळे जमिनीतही जातात [→ ऑर्किडेसी]. त्याला उबदार, दमट, उष्ण कटिबंध हवामान व भरपूर पण प्रमाणशीर असा पाऊस चांगला मानवतो. उत्तम निचऱ्याची हलकी, सरंध्र व भरपूर ह्यूमस असलेली उताराची जमीन, तसेच सावलीची व आधाराचीही त्यास गरज असते. लागवड सु. एक मी. लांबीच्या छाट कलमांपासून करतात. फुले येण्यासाठी वेलांची छाटणी करतात. लागवडीनंतर दोन वर्षांनी फळे येऊ लागतात व पुढे अनेक वर्षे ती येत राहतात. सातव्या-आठव्या वर्षी उत्पादन सर्वाधिक असते.

व्हॅनिला प्लॅनिफोलिया : (१) खोड, (२) मूळ, (३) पाने, (४) फुलोरा.फुलांचा बहर दोन महिन्यांचा असतो. भरपूर फुले येतात, पण त्यांतील थोडीच एका वेळी उमलतात व उमलल्यावर एकच दिवस राहतात. फुले नाजूक असल्यामुळे मेक्सिकोतील एक लहान माशीच त्याचे नैसर्गिकरीत्या परागण करू शकते. इतर देशांत फुले उमलली की, लगेच त्याचे परागण कृत्रिमरीत्या, लाकडी सुईने करतात. याचे शेंगेसारखे बोंड लांबट असून, पूर्ण वाढलेले फळ ४-६ आठवड्यांत सु. २० सेंमी. लांब होते, परंतु पक्के होण्यास त्याला नऊ महिन्यांपर्यंत काळ लागतो.

ताज्या फळांना स्वाद नसतो. ती मुरविताना एंझाइममुळे होणाऱ्या क्रियेमुळे व्हॅनिलाला विशिष्ट स्वाद येतो. पारंपरिक पद्धतीमध्ये काढलेली फळे ओल येण्यासाठी रात्रभर ढीग लावून ठेवतात व दिवसा उन्हात वाळवितात. ही प्रक्रिया दहा दिवस करतात, तेव्हा फळे गर्द चॉकलेटी तपकिरी रंगाची होतात. त्यानंतर फळे तबकांत पसरून हवेशीर जागी सावलीत ठेवतात. त्यामुळे ती प्रतवारी करण्याएवढी व भरण्याएवढी सुकी होतात. मुरविण्यासाठी व सुकविण्यासाठी ४-५ महिन्यांचा काळ लागतो. मुरवलेल्या उत्तम प्रतीच्या फळांवर व्हॅनिलाच्या स्फटिकांचे पातळ आवरण येते. त्यामुळे त्यांना गोड, रुचकर व वैशिष्ट्यपूर्ण असा भरपूर स्वाद येतो. हे आवरण गिव्हर म्हणून ओळखले जाते व ते फळाच्या उत्तमतेची कसोटी समजण्यात येते. निसर्गतः व्हॅनिला फळाच्या मांसल बाह्यावरणात नसतो, परंतु तो अस्तरामध्ये असलेल्या केशरयुक्त उंचवट्यांतून स्रवला जातो व अंतिमत: तो बियांना वेढणाऱ्या दाट, तेलकट द्रवातून पाझरतो. मुरविलेल्या फळांत सु. दोन टक्के व्हॅनिला असतो. ताहिती फळे तांबूस तपकिरी रंगाची असून त्यांना मेक्सिकन किंवा बर्बन फळांपेक्षा कमी सुवास येतो. ताहिती फळांत अल्प प्रमाणात हेलिओट्रोपीन किंवा पाइपरोनाल असल्यामुळे त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्वाद येतो. व्हॅनिला अर्क काढण्यासाठी मुरविलेली व वाळविलेली फळे चिरडून अल्कोहॉलाने त्यांचे निष्कर्षण करतात. कृत्रिमरीत्या तयार केलेल्या व्हॅनिलापासून व्यापारी प्रमाणावर नकली व्हॅनिला बनवितात. व्यापारी व्हॅनिला बीन्स म्हणजे व्हॅ. प्लिनिफोलिया वा व्हॅ. ताहितेन्सिस या जातीची पूर्ण वाढलेली व मुरविलेली अपक्व फळे असतात. त्यांचे उत्पादन मेक्सिको, मादागास्कर, मॉरिशस आदी देशांत होते. भारतात प. बंगाल, बिहार, आसाम, निलगिरी, कुर्ग येथे त्याची लागवड बरीचशी यशस्वी झाली आहे. व्यापारी प्रमाणावर मात्र भारतात उत्पादन होत नाही.

व्हॅनिलाचा उपयोग विविध पेये, मेवामिठाई, आइस्क्रीम, बेकरी पदार्थ यांच्यामध्ये करण्याचा उद्योजकांचा कल दिसून येतो.

जमदाडे, ज. वि.