परागण : (परागसिंचन). फुलातील केसरदलातून (पुं-केसरातून) निघालेल्या परागकणांचा [सूक्ष्म कणांसारख्या प्रजोत्पादक घटकांचा → पराग] त्याच फुलातील किंवा तशाच दुसऱ्या फुलातील किंजदलाच्या टोकावर म्हणजे किंजल्कावर (स्त्री-केसराच्या टोकावर) पडण्याच्या घटनेस (प्रक्रियेस) परागण (अथवा परागसिंचन) म्हणतात. सायकस, पाइन (चीड), स्प्रूस, यू (बिर्मी), जूनिपर (आभाळ) इ. उघडी बीजे असणाऱ्या [→ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] वनस्पतींत त्यांच्या शंकूसारख्या प्रजोत्पादक इंद्रियांमध्येही परागांसारखे सूक्ष्म घटक (लघुबीजुके) बीजकांवर (बीजपूर्व अवयवांवर) पडण्याची प्रक्रिया घडून येते तिलाही परागण हीच संज्ञा वापरतात.

वनस्पतींच्या प्रजोत्पादनाच्या तीन मुख्य प्रकारांपैकी लैंगिक पद्धतीत पुं-गंतुकाचा (प्रजोत्पादक नर-कोशिकेचा) स्त्री-गंतुकाशी (अंदुकाशी अथवा स्त्री-कोशिकेशी) संयोग होऊन रंदुक (संयुक्त प्रजोत्पादक कोशिका) बनते व त्याची पुढे वाढ होऊन नवीन वनस्पती बनते याला अंदुकयुती म्हणतात. बीजे धारण करणाऱ्या सर्व वनस्पतींमध्ये बीजोत्पादनापूर्वी ही लैंगिक प्रक्रिया अनिवार्य असते आणि तत्पूर्वी परागण व्हावे लागते. परागणानंतर पराग किंजल्कांवर किंवा बीजकांवर रुजतात, त्यातून परागनलिका निघून बीजकात शिरते व नलिकेतून पुं-गंतुक बीजकातील अंदुकाशी एकरूप होते या क्रियेस फलन म्हणतात व यामुळेच बीजकाचे रूपांतर होते. फलनाशिवाय बीजोत्पत्ती अपवादात्मक असते [→ प्रजोत्पादन] यावरून पराग व बीजक यांचा निकट संबंध अपरिहार्य असतो, हे लक्षात येईल.

केसरदलाच्या परागकोशातील [→ फूल] परागकण सहजपणे त्याच फुलातील (अथवा तत्सम इंद्रियातील) बीजकावर अथवा किंजल्कावर पडावेत अशी स्वावलंबी योजना अनेक द्विलिंगी (केसरदले व किंजदले एकत्र असलेल्या) फुलांत असते तथापि ते परागकण दुसऱ्या फुलातील किंजल्कावर पडावेत अशा अनेक योजना फार करून आढळतात. पहिल्या प्रकारास स्वपरागण व दुसऱ्यास परपरागण म्हणतात.

परपरागण : यामध्ये दोन प्रकार आहेत एका फुलातील परागकण त्याच झाडावरच्या दुसऱ्या फुलातील किंजल्कावर (किंवा बीजकावर) येणे, याला आसन्नयुती म्हणतात व ते पराग त्याच जातीतील दुसऱ्या झाडावरच्या फुलातील किंजल्कावर (किंवा बीजकावर) पडणे, याला दूरस्थयुती म्हणतात. या दोन्हीपैकी दुसरी पद्धत अधिक हितकारक असल्याचे आढळले आहे. परपरागणाचे (परफलनाचे) अधिक फायदे अनुभवसिद्ध आहेत : (१) त्यापासून बनलेली बीजे संख्येने, आकारमानाने व गुणाने सरस असतात (२) ह्या बीजांपासून झालेली संतती अधिक भेद (विविधता) दर्शविते व त्यामुळे जीवनार्थ कलहात (स्पर्धेत) ती अधिक यशस्वी होते (३) एकंदरीने अशा पद्धतीने उत्पन्न झालेल्या वनस्पती अधिक जोमदार व भरपूर पानाफुलांनी बहरलेल्या असतात. अशा निश्चित फायद्यांमुळे शक्यतो परपरागण घडवून आणण्याकरिता फुलांमध्ये अनेक योजना आढळतात व त्या असणे हे त्या वनस्पतींच्या जातींच्या वंशांचे किंवा कुलांचे प्रगत लक्षण समजले जाते (उदा., ऑर्किडेसी, ग्रॅमिनी, कंपॉझिटी, लेग्युमिनोजी इ. कुले). परपरागण हे तत्त्वतः एकाच प्रकारातील वा जातीतील भिन्न वनस्पतींत घडून येत असले, तरी कधी दोन भिन्न जातींतील किंवा वंशांतील वनस्पतींतही घडून येऊन ‘संकरज’ (मिश्र प्रजा) निर्माण होतात व त्यामुळे नवीन लक्षणे असणाऱ्या वनस्पतींची भर पडते. सृष्टीमध्ये आजपर्यंत अशा प्रक्रियेने कित्येक नवीन प्रकार व जाती उत्पन्न झाल्या असाव्यात अशी साधार समजूत आहे. स्वपरागण सहजसाध्य असते कारण एका फुलातील परागकोश तेथील बीजकाजवळ (किंवा किंजपुटाजवळ) असतात परंतु परपरागणामध्ये मात्र पराग एका फुलातून दुसऱ्यात नेण्यास एखाद्या ‘मध्यस्था’ची जरूरी लागते. वारा, प्राणी व पाणी हे मध्यस्थ सामान्यपणे येथे उपयोगात आणले जातात आणि परपरागणाचे महत्त्वाचे व नाजूक कार्य त्यांच्याकडून कुशलतेने करविले जाते. ह्या मध्यस्थांच्या सोयीप्रमाणे जरूर ते फरक फुलांत आढळतात आणि त्याप्रमाणे ‘वायुपरागित’, ‘प्राणिपरागित’, ‘जलपरागित’ असे फुलांचे वर्गीकरण केले जाते.

आ. १. परागण : (अ) स्वपरागण (आ) परपरागण.वायुपरागित फुले : या फुलांतील परागकणांची भुकटी वाऱ्याने इतस्ततः व संभवानेच (योगायोगानेच) किंजल्कावर उधळली जाते. परागणाचा हा एक फार साधा व सोपा प्रकार असून तो बहुधा प्रारंभिक वा ऱ्हसित (ऱ्हास पावलेल्या) व अप्रगत वनस्पतींत आढळतो. केव्हा जोराच्या किंवा सोसाट्याच्या वाऱ्याने परागकण कित्येक किमी. दूर नेले जातात. या प्रक्रियेत फारच थोडे कण इष्ट स्थळी म्हणजे योग्य त्या फुलाच्या किंजल्कावर पडतात, त्यांची फारच मोठी संख्या इमारती, टेकड्या, तळी, नद्या अथवा समुद्र व वाळवंटे अशा ठिकाणी पडून फुकट जाते. साहजिकच अशा फुलात (उदा., लव्हाळे, गवते, केतकी, ओक, पाइन, सायकस इ.) परागकण असंख्य बनतात. ते लहान, हलके व कोरडे असून त्यांचे बाह्यावरण गुळगुळीत [→ पराग] असते. पाइनच्या प्रत्येक परागकणास हवेने भरलेले दोन फुगे असतात, त्यामुळे ते हवेत तरंगत राहणे व दूरवर नेले जाणे सहजसाध्य होते. परागकण खाली पडताना त्यांना धरून ठेवणे सोयीचे व्हावे म्हणून फुलातील किंजले व किंजल्के लांब, केसाळ व झुबकेदार असतात (उदा.,मका). ⇨ सायकसच्या बीजकातून येणारा चिकट द्राव परागकण धरून ठेवण्यास उपयोगी पडतो. कित्येक वनस्पतींचे फुलोरे पानांच्या वरच्या पातळीवर असतात. त्यामुळे पराग नेणे किंवा किंजल्कावर येणे सोपे जाते. अनेकदा पाने नसण्याच्या ऋतूत फुलांना बहर येतो त्यामुळे परागांना पानांचा अडथळा होत नाही (उदा., एल्म, हॅझेल इ.) अनेक प्रकटबीज वनस्पतींचे शंकू उघड्या भागावर विखुरलेले असतात. वायुपरागित फुले आकारमानाने लहान पण संख्येने अधिक असून रंग, रूप, वास आणि मधुरस यांचा तेथे पूर्ण अभाव असतो. फुलांतील परिदले असल्यास फक्त संरक्षणाचे कार्य करतात व नसल्यास फक्त लहान किंवा मोठी छदे अथवा तुसे (उदा.,गवते) ते काम करतात. कित्येकदा यांचे फुलोरे लोंबत्या कणसाप्रमाणे असतात (उदा., ओक, बर्च, पॉप्लर).


प्राणिपरागित फुले  : वायुपरागित फुलांच्या बरोबर उलट प्रकार येथे असतो. प्राण्यांनी विशेषतः कीटक किंवा पक्षी यांनी फुलावर येऊन पराग घेऊन जावे व ते दुसऱ्या तशाच फुलावर पोहोचवावे याकरिता नाना तऱ्हेचे भडक अथवा सौम्य रंगाचे आकर्षण फुलांमधील एका अथवा अनेक भागांत (संदले, प्रदले, केसरदले, तोरण इ.) असते. रात्रीच्या वेळी सहज दिसावे याकरिता पांढऱ्या (उदा., जाई, जुई, मोगरा, पारिजातक, कुडा, तगर, देवनळ इ.) किंवा फिकट पिवळ्या (उदा. पिवळा धोतरा) अशा रंगाच्या पाकळ्या किंवा एखादेच मोठे संदल (उदा. भुतकेस) असते. फुले लहान असल्यास त्यांचा मोठा रंगीत फुलोरा (उदा., शिरीष, वर्षावृक्ष, सूर्यफूल, कदंब, व्हर्बिना इ.) फारच आकर्षक होतो. केव्हा तर या रंगाभिकल्पात (रंगाच्या मांडणीत) छदे (उदा., पानचेटी, बुगनविलिया इ.) किंवा महाछदे (उदा., केळ, सुरण, माणक, अळू इ.) ही भर टाकतात. कर्दळ, संकेश्वर व सोनटक्का यांच्या फुलांत सर्वच भाग आकर्षक असतात. रंगाखेरीज किंवा रंगाऐवजी अनेक वेळा सुवासही आकर्षक ठरतो व बऱ्याच अंतरावरून कीटकांना मोहित करून फुलाकडे खेचतो आणि फुलांवर आल्यानंतर त्यांना गुंगवतो. क्वचित माणसाला न आवडणारा वास काही कीटकांना प्रिय होतो (उदा., पोपटवेल, सुरण, अळू इ.). रात्री तर वासामुळेच प्राणी फुलांकडे आकर्षिले जातात (उदा., जाई, रातराणी, तगर, पारिजातक, मोगरा इ.) आणि अशा कित्येक फुलांना दिवसा फार कमी वास असतो किंवा मुळीच नसतो यांचे परागण निशाचर कीटकांकडून होते. रंग व वास यांमुळे निमंत्रिलेले प्राणी फुलांवर आल्यानंतर त्यांना तेथे बहुधा मधुरस मिळतो. कित्येक फुलांत रेषा, ठिपके इ. मधुदर्शिकांनी मधुरसाची नेमकी जागा दाखविली जाते (उदा., गुलखेरा, निळवेल, समुद्रशोक इ.). काही फुलांत मधुरसाऐवजी किंवा मधुरसाखेरीज पराग हेच अन्न म्हणून त्या प्राण्यांस दिले जाते. केव्हा फुलात किंवा फुलोऱ्यात मिळणाऱ्या उबदार आसऱ्यामुळे (उदा., माणक, हस्तिकर्णी, अळू, पोपटवेल इ.) व मधुरसामुळे ते काही वेळ रमतात. अशा रीतीने अन्न मिळालेला तो प्राणी त्या फुलावरून दुसऱ्या तशाच रंगाच्या अथवा वासाच्या फुलावर जातो. पहिल्या फुलावर असताना त्यातील परागकण त्याच्या शरीराच्या विशिष्ट भागास (विशेषत: पाय, मिशा, तोंड, चोच इ.) नकळत चिकटतात व तो दुसऱ्या तशाच फुलावर जाऊन तेथे मधुरसाचा शोध घेतो व मधुरसपान करतो. त्या वेळी तेथील किंजल्काशी संपर्क झाल्याने सहजच परपरागण घडून येते. प्राण्याला त्याने केलेल्या कामगिरीची यत्किंचित कल्पना नसते. तथापि प्राणी आणि वनस्पती यांच्या परस्परावलंबनाचे (सहजीवनाचे) हे एक चांगले उदाहरण म्हणता येईल. या पद्धतीत विशेषतकीटक (विविध माश्या, भुंगे, फुलपाखरे इ.), पक्षी, वटवाघळे, गोगलगाई इत्यादींचा फार मोठा वाटा असतो. कीटकपरागित, पक्षिपरागित, जतुकापरागित (वटवाघळांनी केलेले परागण), शंबूकपरागित (गोगलगाईंनी केलेले परागण) इ. प्राणिपरागणाचे प्रकार यामुळे ओळखले जातात. सी. के. श्प्रेंगेल (१७५०–१८१६) व रिक्को या जर्मन शास्त्रज्ञांनी परागणावर केलेल्या संशोधनात सॅल्व्हियातील परागणाचा समावेश आढळतो. मैना, कावळे वगैरे पाखरे लाल सावर, पांगारा, पळस, कारंजवृक्ष इत्यादींच्या फुलांतून भरपूर मधुरस घेताना आढळतात तसेच शिंपी पक्षी व इतर लांब टोकदार चोचीचे पक्षी (सूर्यपक्षी, गुणगुणणारे पक्षी) अनेक लहानमोठ्या फुलांतून मध पीत असून त्याच वेळी परागण करीत असतात कदंब व धामण यांचे परागण वटवाघळांमार्फत होते अळू, गोंडाळ, माणक, हस्तिकर्णी इत्यादींच्या उबदार फुलोऱ्यात (महाछदात) लहान माश्या (मक्षिकापरागण) व गोगलगाई अनेकदा आढळतात आणि उबेच्या मोबदल्यात परागणाचा लाभ देतात. उंबरातील केंबरे [→ अंजीर] व कमळातील भुंगे अशाच सहजीवनातील भागीदार आहेत.

आ. २. परपरागणाचे प्रकार: (अ) कीटकपरागण: फूल व मधमाशी : (१) किंजल्क, (२) परागकोश (आ) पक्षिपरागण (इ) जतुकापरागण (ई) मक्षिकापरागण.प्राणीपरागित फुलांतील परागकण संख्येने कमी पण आकारमानाने मोठे व खरबरीत असून ते परस्परांस चिकटून त्यांचे लहान पुंजके (उदा., बाभूळ, लाजाळू) बनतात व त्या स्थितीत विखुरले जातात तसेच अशा फुलातील किंजल्क (ग्राहकभाग) चिकट व खरबरीत असल्याने पराग धरून ठेवण्यास सोयीचे असतात. ⇨ रुई आणि ⇨ ऑर्किडेसी (आमरे) यांच्या फुलांतील प्रत्येक परागकोशातील सर्वच पराग विशिष्ट रीतीने एकत्रित केलेले ‘परागपुंज’ असून ते संपूर्णतया एका फुलातून कीटकाकरवी दुसऱ्यातील किंजल्कावर नेले जातात. प्राणिपरागित फुलांतील परागांची वायुपरागित फुलांतल्याप्रमाणे नासधूस न होता प्राण्यांसारख्या सुबुद्ध मध्यस्थामुळे परागण अधिक खात्रीने होते. यामुळे ह्या काटकसर साधणाऱ्या पद्धतीचा अवलंब करण्याकडे अधिक प्रवृत्ती असल्यास नवल नाही.

आ. ३. हस्तपरागणः खजुराच्या स्त्री-फुलांचे हाताने केलेल कृत्रिम परागण : (१) नर-फुलोरा, (२) स्त्री-फुलोरा, (३) परागण झालेला स्त्री-फुलोरा, (४) कोवळा व परागण न झालेला स्त्री-फुलोराप्राणीपरागणात माणसाचा वाटाही फार महत्त्वाचा आहे. इतर प्राणी परागण नकळत करतात, तर माणसे कळून सवरून करतात. ईजिप्त आणि मेसोपोटेमिया येथे खजुरांच्या मादी-वृक्षांवर कृत्रिम हस्तपरागण इ.स. पू. अनेक शतके करीत असत [→ पराग]. कित्येक वर्षांपासून परागांचे बीजोत्पादनातील महत्त्व मनुष्याला कळले आहे [→ कॅमरेअरियस, रूडोल्फ याकोप] त्यामुळे पुष्पपराग स्वहस्ते इष्ट त्या वनस्पतीवर टाकून कृत्रिम हस्तपरागण यशस्वी रीतीने तो करीत आला आहे. अशा प्रक्रियेने त्याने कृत्रिम संकर घडवून आणून अनेक नवीन प्रकार व जाती उपलब्ध केल्या आहेत [→ आनुवंशिकी वनस्पति प्रजनन].


आ. ४. सवालाचे परागण : (१) नर-वनस्पती, (२) नर-पुष्पे, (३) स्त्री-वनस्पती, (४) स्त्री-पुष्पे जलपरागित फुले : पाणी हे माध्यम परागणास सोयीचे नसल्याने, नेहमी खडकावर वाढणाऱ्या व बऱ्याच काळपर्यंत बुडून वाढणाऱ्या ⇨ पोडॉस्टेमोनेसी  कुलातील वनस्पती परागणार्थ कोरडा ऋतू पसंत करतात. कमळ, कुमुद, गोंडाळ, पाण्यातील हायासिंथ व पोटॅमोगेटॉन यांसारख्या जलवनस्पतींतही पाण्याची मध्यस्थी स्वीकारली जात नाही पहिल्या चार कीटकपरागित असून शेवटची वायुपरागित आहे परंतु ⇨ सवाला (टेप ग्रास), नायास, सेरॅटोफायलम इ. जलवनस्पती मात्र आपले परागकण पाण्याच्या मदतीने दुसऱ्या फुलाच्या किंजल्काकडे पाठवतात. यांची फुले लहान असून आकर्षक नसतात पराग व परागधारी (नर) फुले पाण्यावर काही वेळ तरंगतात. सवालाच्या बाबतीत स्त्री-पुष्पे उघडून पाण्यावर तरंगतात तसेच अनेक नर-पुष्पे सुटी सुटी तरंगतात. नर-पुष्पाचा स्त्री-पुष्पास धक्का लागल्यास नर-पुष्पातील परागकोश तडकून पराग स्त्री-पुष्पावर उधळले जाऊन परागण होते.

परपरगणार्थ विशेष योजना : परपरागणाच्या मध्यस्थासंबंधी आणि फुलातील तदनुषंगिक काही लक्षणांसंबंधी वर विवेचन केले परंतु याखेरीज फुलातील काही संरचनात्मक वैचित्र्यामुळे स्वपरागण टाळून परपरागण साधले जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत : (१) एखाद्या फुलातील पराग त्यातल्याच किंजल्कावर पडले असता ते वांझ ठरणे (स्वयंवंध्यत्व) (२) पराग व किंजल्क एकाच वेळी पक्व न होणे (भिन्नकाल पक्वता उदा., कापूस, कोथिंबीर, वड, गुलबुश, सूर्यफूल इ.) (३) परागकोश व किंजल्क यांची फुलातील सापेक्ष मांडणी संपर्क होण्यास गैरसोयीची असणे (विष्कंभयुती उदा., कळलावी, युका, रुई, फान्सी, सॅल्व्हिया इ.) (४) किंजल्क आणि केसरदलांच्या उंचीत फरक असणारी दोन (उदा., प्रिम्यूला व अळशी) वा तीन (उदा., अळशीच्या लायनम ह्या वंशातील काही जाती) प्रकारची फुले प्रसवणे (भिन्नकिंजलत्व) (५) फुले एकलिंगी असणे (एकलिंगत्व उदा.,एरंड) व (६) ही फुले स्वतंत्र वनस्पतीवर असणे (द्विभक्त लिंगत्व उदा., खजूर, पपई).

आ. ५. भिन्नकिंजलत्व : (अ) लांब किंजलाचे फूल : (आ) आखूड किंजलाचे फूल.परपरागणाच्या दृष्टीने कित्येक फुलांत वर सांगितलेल्यापैकी काही व विशेष अशा अनेक क्लृप्त्यांचा एकाच वेळी उपयोग केलेला आढळतो तसेच कित्येक फुले जणू काही विशिष्ट प्राण्याकरिताच आहेत. म्हणून त्यांची संरचना परस्परांस सोयीची असते (उदा., सॅल्व्हिया, वनजाई, ऑर्किडेसी, स्नॅपड्रॅगॉन इ.). परपरागणाच्या सोयीकरिता फुलात अथवा फुलोऱ्यात आलेल्या कीटकास काही वेळ बंदिवान करून ठेवण्यास विशिष्ट प्रकारची पिंजऱ्यासारखी ‘कारा-यंत्रणा’ उपयोगात आणलेली आढळते (उदा., अळू, पोपटवेल, अंजीर, माणक इत्यादी).

स्वपरागण : परपरागणाचे फायदे व तदनुसार आढळणारे फुलातील संरचनात्मक वैचित्र्य यावरून तो प्रकार श्रेष्ठ ठरला, तरी स्वपरागणाचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही, कारण त्याचेही काही खास वैशिष्ट्य आहेच. यामध्ये फुले द्विलिंगी असल्याने व म्हणून मध्यस्थाची जरूरी नसल्याने ते अधिक खात्रीचे असते शिवाय रंग, सुवास, विपुल पराग, मधुरस इत्यादींची गरज न लागल्याने ते बरेच काटकसरीचे ठरते त्यामुळे कित्येक फुलांनी स्वपरागण चालू ठेवले आहे. काहींमध्ये (उदा., गुलबुश, सूर्यफूल, जास्वंद इ.) परपरागण टळले, तर स्वपरागणाची योजना असते, कारण परागण टळण्यापेक्षा स्वपरागण श्रेयस्कर असते. इतर काही वनस्पतींत सामान्य फुलांशिवाय स्वपरागणार्थ खास ‘मुग्धपुष्पे’ (नेहमीच बंद राहणारी फुले) असतात (उदा., पॅन्सी, ऑर्किड, तेरडा इ.) व त्यांमध्ये स्वपरागण सहजतेने होत असते.

वरील तपशीलवार विवेचनावरून खालील गोष्टी लक्षात येतील.

(१) फुलांच्या प्रजोत्पादनाच्या कार्यात परागणाला बरेच महत्त्व असल्याने त्याला अनुसरून फुलांच्या संरचनेत वैचित्र्य आले आहे.

(२) बीजी वनस्पतींपैकी फुलझाडे (आवृतबीज वनस्पती) क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) तत्त्वानुसार अधिक यशस्वी (संख्या व प्रसार या दृष्टीने) ठरण्याला फुले व त्यातील स्वसंरक्षणाच्या आणि परागणाच्या प्रागतिक योजना मुख्यतः कारणीभूत झाल्या आहेत पण सामान्य फुले वैशिष्ट्य‌पूर्ण फुलापेक्षा कमी यशस्वी आहेत असेही नाही. ⇨ ऑर्किडेसीसारख्या अतिवैशिष्ट्यपूर्ण वनस्पती हळूहळू नाहीशा होण्याच्या पंथाला लागल्या आहेत, असे काही शास्त्रज्ञ मानतात परंतु गवतांचा प्रसार खूपच आहे.

(३) फुलांचे आकार, प्रकार व संरचनात्मक वैचित्र्य आणि त्यांचे परागण यशस्वी रीतीने करणाऱ्या प्राण्यांची शरीर वैशिष्ट्ये यांचा परस्परांना अनुकूल असा संबंध यदृच्छया आला नसून त्या दोन्हींचा परस्परांना अनुकूल असा क्रमविकास सारख्याच वेळी होत आला असावा असे मानतात. सजीवांच्या परिस्थितिसापेक्ष अनुयोजनाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे परंतु काहींच्या मते फुलांतील फरक व कीटकांची संरचना व सवयी यांतील फरक हे स्वतंत्रपणे आरंभी आणि आतून निश्चित केलेल्या योजनेप्रमाणे (निर्धारित विकास) घडून येत असून फुले व कीटक आपापल्या सोयीप्रमाणे त्याचा फायदा घेत आले आहेत.

पहा : क्रमविकास गर्भविज्ञान पराग परिस्थितिविज्ञान पुष्पबंध प्रजोत्पादन फूल.

संदर्भ :1. Meeuse, B. J. D. The Story of Pollination, New York, 1961.

2. Percival, M. S. Floral Biology, Oxford, 1965.

3. Strasburger, E. Textbook of Botany, London, 1965.

4. Wilson, C. L. Loomis, W. E. Botany, New York, 1957.

परांडेकर, शं. आ.