अपिवनस्पति: (लॅ. एपिफाइट्स ). स्वसामर्थ्यावर पूर्णपणे न वाढता दुसऱ्‍या आधारभूत वनस्पतीवर (क्वचित निर्जीव वस्तूंवर) वाढणाऱ्‍या पण आपले अन्न-पाणी आश्रय-वनस्पतीच्या शरीरातून न घेता किंवा मुळांच्या द्वारे जमिनीतून न शोषता स्वतंत्रपणे ते मिळवून जीवनक्रम चालविणाऱ्‍या वनस्पतीस हे नाव दिले जाते. आपले अन्न व पाणी अंशत: किंवा पूर्णत: दुसऱ्‍या सजीवांपासून घेऊन त्याला थोडाफार अपाय करणाऱ्‍या काही जीवोपजीवी वनस्पती आहेत, तसेच काही वेली [→ महालता] अंशत: इतर वनस्पतींवर आपले ओझे टाकून पण मुळांच्या द्वारे जमिनीतून अंशत: पोषण घेतात, त्याहून अपिवनस्पती भिन्न आहेत. परिस्थितीविज्ञानाच्या (सजीव व त्यांच्या भोवतालची परिस्थिती यांच्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्‍या विज्ञानाच्या) द‍ृष्टीने वा वनस्पती व आश्रय यांचे हे ⇨सहजीवन  असावे याबद्दल एकमत नाही. अपिवनस्पती व त्यांची  आश्रय-वनस्पती यांचे संबंध ध्यानी घेऊन पुढील चार मुख्य प्रकार ओळखले जातात : 

(१) खऱ्‍या अपिवनस्पती : विषुववृत्तीय दमट जंगलात यांचे भिन्न प्रकार व जाती आढळतात. कडक हिवाळा किंवा उन्हाळा असलेल्या प्रदेशात यांचे प्रमाण फार कमी आश्रय-वनस्पतीच्या टोकाशी, मध्यभागी किंवा खालच्या भागावर आढळणाऱ्‍या अपिवनस्पतींची संख्या व जाती भिन्न असतात, आडव्या फांद्यांवर त्या अधिक आढळतात, तसेच दमट हवेत निर्जीव वस्तूंचा आधारही काहींना पुरतो. आमरे [→ ऑर्किडेसी] व अननसाच्या कुलातील [→ ब्रोमेलिएसी] बहुतेक जाती, ⇨शैवले, ⇨शेवाळी, दगडफुले [→ शैवाक ], ⇨नेचे, ⇨गवते  इत्यादींपैकी काही जाती या गटात येतात. यांच्या बीजांचे व बीजुकांचे (वनस्पतींच्या एका लाक्षणिक प्रजोत्पादक भागांचे) विकिरण (प्रसार होणे) वारा व पक्ष्यांच्या द्वारे होऊन आश्रय-वनस्पतींच्या पृष्ठावरील खाचांत साचलेल्या धुळीच्या कणांत व कुजकट पदार्थांत त्यांचे अंकुरण (रुजणे) होते. अपि- वनस्पतींची काही लहान मुळे किंवा मुलकल्प व मुलब्रुव हे मुळासारखे अवयव त्यांना आश्रयीस चिकटवून ठेवण्याचे काम करतात. तसेच त्यांच्या खाचांतून साचलेल्या मातीतून  लवणे व पाणी शोषून घेतात. याशिवाय काही अपिवनस्पतींची लोंबती मुळे त्यांच्या पृष्ठभागावरच्या जलशोषी त्वचेच्या साहाय्याने वातावरणातून पाणी शोषून घेतात व त्यात असलेल्या हरितद्रव्याच्या साहाय्याने ⇨प्रकाश संश्लेषण  होऊन अन्ननिर्मिती करतात. काही अपिवनस्पतींना वातावरणातून पाणी शोषणारे फक्त केस असतात.

अपिवनस्पतीं. (१) शैवाक, (२) टिलँड्सिया,(३) अननस-कुलातील जाती, (४) शेवाळे, (५) नेचा, (६) ऑर्किड

अननसाच्या कुलातील ‘स्पॅनिश मॉस’ ही  अपिवनस्पतीं बहुधा ओक वृक्षावरून लोंबकळताना आढळते हिला मुळे नसतात पण लांब कांड्यांचा व भरपूर फांद्यांचा बारीक अक्ष (खोड) असून त्यावर खवल्यांसारखे लहान केस असतात व तेच वातावरणातून पाणी शोषून घेतात अक्षाच्या अनेक फांद्यां खाली लोंबतात ही कधी तारायंत्राच्या तारेवरही गुंडाळून वाढते. याच कुला- तील इतर काही अपिवनस्पतींना पाणी जमा करणे व नंतर ते शोषणे यांकरिता खास जलकलश असतात. सारांश, या अपिवनस्पतींचा पाणीपुरवठा परस्पर हवेतून होतो मात्र तो बेताचाच असल्याने काहींमध्ये (उदा., ऑर्किडे व काही नेचे) त्याचा कायम संचय मांसल पाले अथवा ग्रंथिल खोडांत केला जातो शिवाय त्यात श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्य व बाहेरच्या  बाजूस ⇨उपत्वचा  अथवा मेणासारख्या पदार्थाचा लेप असल्याने पाणी बाष्पीभवनापासून सुरक्षित राहते. यासारख्या अनुयोजनेमुळे (व्यवस्थेमुळे) या वनस्पती ⇨मरुवनस्पती  ठरतात. काही अपिवनस्पती विशिष्ट आश्रयावरच वाढतात उदा., पॉलिपोडियम पॉलिपोडिऑईडस  ही फक्त एल्मवर किंवा क्वर्कस स्टेल्‍लाटावर वाढते.

(२) अर्ध-अपिवनस्पती : यांचे बीज आश्रयावर प्रथम रुजून काही काळ ती  वनस्पती तेथे वाढते परंतु पुढे तिची मुळे खाली वाढून जमिनीत शिरतात व ती वनस्पती स्वतंत्र होते उदा., वड, अंजीर.

(३) अपिवनस्पतीब्रुव : गवते, नेचे, शेवाळी व कॅन्स्कोराच्या काही जाती यांना अपिवनस्पतींची खास लक्षणे नसताना अनेकदा दुसऱ्‍या मोठ्या वृक्षाच्या फांद्यांवर वाढलेली आढळतात, परंतु त्या जमिनीवर इतरत्रही  आढळत असल्याने खऱ्‍या अपिवनस्पती नव्हेत.

(४) अंतर्वनस्पती : या दुसऱ्‍या वनस्पतीच्या शरीरातील कोशिकांमधून असणाऱ्‍या (अंतरकोशिकी) पोकळ्यांमध्ये वाढतात. परंतु या जीवोपजीवी  नव्हेत. उदा., नाबीना  हे शैवल झोला  या जल-नेचाच्या शरीरात, नॉस्टॉक  व नाबीना  ही शैवले ⇨सायकसच्या  मुळांमध्ये व नॉस्टॉक हे शैवल ⇨ अँथोसिरॉस  या शेवाळीत, इत्यादी.

इतर विशेष उल्लेखनीय अपिवनस्पतीं :फ्युनेरिया [ → शेवाळी], ट्रेंटेपोलिया  व प्ल्यूरोकॉकस  ही शैवले ओल्या जागेत सापडतात पाण्यातील खेकड्यांवर वाढणारे शैवल, पाण्यातील  स्पायरोगायरावरचे  युलोथ्रिक्स  शैवल, नेचांपैकी  प्लीओपेल्टिसच्या दोन जाती, चेलँथस, डिअँटम  ह्या नेचांच्या काही जाती, बाशिंग नेचा, खडकावरची दगडफुले (शैवाक) इ. वर सांगितल्याप्रमाणे  अपिवनस्पतींना पाणी  मिळवणे, संचय करणे वगैरेंबाबत अनुयोजना असाव्या लागतात. दुसऱ्‍या वनस्पतींवर वाढल्याने त्यांना निसर्गात काही फायदे निश्चित मिळत असावेत. जमिनीवर वाढण्यात जागेसाठी करावी लागणारी स्पर्धा अन्य वनस्पतींवर (किंवा वनस्पतींत) राहण्यात नसते तसेच जमिनीवरच्या प्राण्यांपासून संरक्षण मिळते उंचीने कमी असूनही तेथे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध होतो. 

पहा : जीवोपजीवन परिस्थितिविज्ञान सहजीवन.

संदर्भ : 1. McDougal, W. B. Plant Ecology, Philadelphia, 1949.

          2. Mitra, G. N. Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

मुजुमदार, शां. ब.

अपिवनस्पती (दगडफूल, नेचे, शेवाळी इ.).