इपेकॅक

इपेकॅक : (इं. ब्राझील इपेकॅक; लॅ.सेफीलिस (सायकोट्रिया) इपेकॅक्युन्हा; कुल रुबिएसी). हे एका उपयुक्त औषधाचे व्यापारी नाव असून ते मूळच्या ब्राझीलमधील लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), ओषधीय वनस्पतीपासून [→ ओषधि] काढतात. ही  वनस्पती सु. १०–२० सेंमी. क्वचित थोडी अधिक उंच व काहीशी पसरट असते. हिला दमट व उबदार हवामान, सावली, वाऱ्यापासून संरक्षण व कुजट पदार्थ असलेली निचऱ्याची जमीन ही लागतात. तिची लागवड मलायात रबराच्या मळ्यांत करतात. भारतात दार्जिलिंगजवळ मुंगपू व निलगिरी तसेच सिक्कीम इ. ठिकाणी तिची लागवड करण्यात येते. पाने साधी, समोरा समोर, आयत अंडाकृती, अखंड, टोकदार आणि खालच्या बाजूस लवदार असतात हिला पांढऱ्या बारीक फुलांचे स्तबकासारखे गेंद येतात अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे सुकी असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ रुबिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. हिची बारीक, वलयांकित व काहीशी गाठाळ मुळे [पहा : आकृती; मूळ] त्यातील एमेटीन व सेफेलीन ह्या अल्कलॉइडांमुळे महत्त्वाची असतात. ती अमीबाजन्य आमांश, अग्‍निमांद्य, दंतरोग (पायोरिया), कफ इत्यादींवर गुणकारी असून वांतिकारी, स्वेदक (घाम आणणारे), दीपक (भूक वाढविणारे) व पौष्टिक असतात; अधिक प्रमाणात विषारी. त्यांची ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. भारतात होणारे उत्पादन मागणीपेक्षा फार कमी आहे. मूलक्षोडाचाही [→ खोड] मुळासारखा उपयोग करतात.

परांडेकर, शं. आ.