जखमी : (बांदुर्गी हिं. अलियार इं. स्विच सॉरेल, कँडलवुड लॅ. डोडोनिया व्हिस्कोजा कुल-सॅपिंडेसी). ह्या बळकट पण बारीक खोड व फांद्या असलेल्या आणि सु. पुरुषभर उंचीच्या सदापर्णी क्षुपाचा (झुडपाचा) प्रसार भारतात सर्वत्र असून श्रीलंका, पाकिस्तान व इतर ऊष्ण देशांत ते सामान्यपणे आढळते. ते बहुधा रुक्ष व उघड्या जागी वाढते. बागेभोवती गर्द हिरव्या कुंपणाकरिता ते लावतात. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), गुळगुळीत, चकचकीत असून त्यांतून पिवळट राळयुक्त स्राव येतो झाडावर ती साधारण तिरपी व उभट वाढतात. फुले लहान आणि हिरवट पिवळी असून कक्षास्थ (बगलेत) आखूड वल्लरीवर नोव्हेंबरात येतात. फुलांची संरचना व इतर शारीरिक लक्षणे सामान्यतः ⇨सॅपिंडेसी  वा अरिष्ट कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ (बोंड) चपटे, पातळ, लहान, सपक्ष (पंखासारखा विस्तारलेला भाग असलेले), पापुद्र्यासारखे, टोकास खाचदार व पिंगट असून बी काळे आणि लागवडीस उपयुक्त असते. याची पाने ज्वरनाशक, स्वेदजनक (घाम आणणारी) आणि संधिवात, वातरक्त, जखमा, सूज व भाजणे इत्यादींवर गुणकारी असते. साल स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) असते. ही वनस्पती मत्स्यविष आहे. डोडोनीन, सॅपोनीन इ. द्रव्ये तिच्यात आढळली आहेत. हिचे लाकूड कठीण व पिंगट असून भारतात हत्यारांचे दांडे, कातीव व कोरीव काम, हातातील काठ्या इत्यादींसाठी ते वापरतात.

जखमी : फुलाफळांसह फांदी 

पहा : वनस्पती, विषारी.

जमदाडे, ज. वि.