सिलाजिनेलेलीझ : (इं. स्मॉल क्लब-मॉसेस). वाहिनीवंत अबीजी वनस्पतीतील (टेरिडोफायटा) पाच गणांपैकी एका गणाला सिलाजिनेलेलीझ हे नाव असून सिलाजिनेला  ही त्या गणातील एक प्रजाती आहे. सिलाजिनेलेलीझ गणात फक्त सिलाजिनेलेसी हे एकच विद्यमान कुल आहे. परंतु मियाडेस्मिएसी ह्या कार्‌बॉनिफेरस कल्पात (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) आढळणाऱ्या जीवाश्म कुलाचा अंतर्भाव काहींनी (जी. एम्. स्मिथ) येथे केला आहे, तर इतर काहींनी लेपिडोडेंड्रेलीझ गणात केला आहे. कार्‌बॉनिफेरस कल्पात आढळणाऱ्या व सिलाजिनेलाशी काही बाबतींत साम्य दर्शविणाऱ्या जीवाश्मरुप अशा सु. सहा जातींचा समावेश सिलाजिनेलाइट्स  ह्या एकाच प्रजातीत केला जातो.

आ. १. पुनर्जीवी वनस्पती (सिलाजिनेला लेपिडोफायला) : (अ) रुक्ष हवेत फांद्या आतील बाजूस वळून चेंडूसारखा बनलेला आकार, (आ) आर्द्र हवेत फांद्या पूर्ववत पसरुन गुच्छासारखा बनलेला आकार.

सिलाजिनेलेलीझ ह्या गणातील जातींत खोडांची रचना ओषधीय असून द्वितीयक वाढीचा बहुधा अभाव असतो [⟶ शारीर, वनस्पतींचे]. पाने फार लहान, कधी द्विरुप परंतु प्रत्येकाच्या तळाशी, वरच्या बाजूस एक लहान जिभेसारखे सपाट व पातळ उपांग [जिव्हिका ⟶ ग्रॅमिनी] असते. खोडापासून निघणाऱ्या जाड तंतूसारख्या अवयवावर (मूलदंड) टोकाशी आगंतुक मुळांचा झुबका येतो. बीजुके गुरु व लघू या दोन प्रकारची असल्याने येथे असमबीजुकत्व आढळते बीजुकपर्णे मात्र दोन्ही बाबतींत सारखीच असतात. त्यांची मांडणी शंकूसारख्या इंद्रियात व फांद्यांच्या टोकास असते. गंतुकधारी दोन प्रकारचे (पुं. व स्त्री.) व रेतुके द्विकेसली असतात. सिलाजिनेलेसी कुलातील एकमेव प्रजातीत (सिलाजिनेला) सु. ७०० जाती समाविष्ट आहेत व त्या जगभर पसरलेल्या असून काही अत्यंत कोरड्या ठिकाणी वाढतात, तर कित्येक ओलसर जागी, सावलीत व जंगलांत आढळतात. काही जाती ⇨ अपिवनस्पती  आहेत. सर्वच बहुधा बहुवर्षायू असतात. शोभेकरिता उष्ण व उपोष्ण कटिबंधांत त्यांची लागवड बागेतील पादपगृहात किंवा कायमस्वरुपी बाहेर सावलीत करतात. सिलाजिनेला लेपिडोफायला  ह्या मरुवासी जातीत रुक्ष हवेत फांद्या आतील बाजूस वळून वनस्पतीचा सर्व आकार चेंडूसारखा बनतो परंतु पाण्याचा पुरवठा झाल्यावर थोड्याच वेळात फांद्या पूर्ववत पसरुन भुईसपाट होतात व वनस्पतीला गुच्छासारखा आकार येतो. अशा वनस्पतींना ‘पुनर्जीवी वनस्पती’ म्हणतात. ही वनस्पती मूत्रल आहे.


 सिलाजिनेला  प्रजातीतील सु. ६० जातींत (होमिओफायलम) खोड बहुधा सरळ व उंच वेलीप्रमाणे वाढणारे (उंची सु. २० मी.) असून त्यावरची सर्व लहान पाने सारख्या आकाराची, एकाआड एक व दाटीने वाढतात. याउलट, उरलेल्या बहुसंख्य जातींत (हेटेरोफायलम ) खोड भुईसरपट वाढते व काही लहान फांद्या मात्र सरळ व उभ्या वाढतात. त्यांच्या फांद्यांवर विशेषतः खोडांवर खवल्यासारख्या, परंतु नाजूक लहान बिनदेठाच्या पानांच्या जोड्या असतात. जोडीतील एक पान मोठे व दुसरे लहान असते. लहान पान खोडाच्या वरच्या बाजूस व मोठे खालच्या बाजूस आणि एकंदर मांडणी अशी की, मोठी पाने परस्परांशी एकाआड एक व लहानही तशीच, यामुळे एकूण चार रांगा होतात (दोन लहान पानांच्या व दोन मोठ्या पानांच्या) आडव्या फांद्यांपासून मूलदंड खाली जमिनीकडे वाढतात. काही जातींत मुळे प्रत्यक्ष खोडापासून व मूलदंडापासून (मूलदंड हा खोड नाही व मूळही नाही असा अवयव आहे) वाढलेली आढळतात.

आ. २. (अ) सिलाजिनेला डेन्सा: (१) मुळे आणि आडवे खोड व शंकू असलेली वनस्पती, (२) शंकू, (३) शंकूचे टोक मोठे करुन दाखविलेले, (४) शाकीय पान, (५) बीजुकपर्णाचा पृष्ठीय भाग, (६) अक्षसंमुख पृष्ठभागावर लघुबीजुककोश असलेले लघुबीजुकपर्ण (आ) सिलाजिनेला अंडरवुडी : (१) प्रणत खोडाच्या मुख्य अक्षापासून निघालेल्या एकेरी मुळ्या, (२) शंकू असलेल्या शाखांची टोके, (३) शाकीय पान, (४) बीजुकपर्णाचा पृष्ठीय भाग, (५) अक्षसंमुख पृष्ठभागावर गुरुबीजुककोश असलेले गुरुबीजुकपर्ण.

खोडाच्या टोकास एक किंवा अनेक विभाजी कोशिका असतात [⟶ विभज्या]. त्याखालच्या भागात एक मध्यवर्ती आद्यरंभ व त्याभोवती मध्यत्वचा असते. अधिक जून भागात द्विपरिकाष्ठी नलिकारंभ [⟶ रंभ] किंवा अधिक ⇨ वाहक वृंद विखुरलेले असल्यास बहुलाद्यरंभ असते. प्रत्येक वाहक वृंदाबाहेर परित्वचा असून त्याबाहेर पोकळी असते. ह्या पोकळीत अंतस्त्वचेच्या त्रिज्येच्या रेषेत लांबट कोशिका असून त्या परित्वचा व मध्यत्वचा यांना जोडून असतात [ ⟶ शारीर, वनस्पतीचे]. त्यांच्या आकारामुळे त्यांना ‘प्रपट्टिका’ म्हणतात. अपित्वचेखाली दृढोतकी अभित्वचा असते. मुळात फक्त एक बहिर्वर्धी आद्यरंभ असते. खोडातील वाहिका तंत्रातून एका पर्णलेशाद्वारे पानाच्या मध्यशिरेशी संबंध राखला जातो. पानांवर त्वग्रंध्रे असून मध्योतकात पोकळ्या आणि त्यांच्या कोशिकांत हरितकणू व प्रकणू असतात.

सिलाजिनेला च्या जातीत गुरुबीजुकपर्णे शंकूत खालच्या बाजूस, तर लघुबीजुकपर्णे वरच्या टोकाच्या बाजूस असतात. गुरुबीजुके लघुबीजुकांच्या १०–२० पट मोठी असतात. भिन्न बीजुके स्वतंत्र बीजुककोशात व ते बीजुककोश स्वतंत्र बीजुकपर्णांच्या तळाशी, परंतु वरच्या (अक्षसंमुख) बाजूस असतात. बीजुककोशाचा उगम व विकास युस्पोरँजिएट   पद्घतीने होतो. प्रत्येक गुरुबीजुककोशात चार गुरुबीजुके (अर्धसूत्रणाने) तयार होतात परंतु लघुबीजुककोशात शेकडो लघुबीजुके तयार होतात. बीजुके रुजून गंतुकधारीही त्यामध्येच तयार होतात तेव्हा बहुधा बीजुके स्वतंत्रपणे बाहेर पडलेली असतात. लघुबीजुकात फक्त एककोशिक गंतुकधारी असून, मर्यादित कोशिकांचे एक रेतुकाशय असते व त्यातून चलनशील, द्विकेसली व १२८–२५६ रेतुके बाहेर पडतात व पाण्यात तरंगतात. गुरुबीजुकात अनेककोशिक स्त्री-गंतुकधारी तयार होते व ती बीजुकावरणातून बाहेर डोकावते उघड्या भागांवर काही अंदुककलश तसेच काही मूलकल्प वाढलेले आढळतात. त्या भोवतालच्या कोशिका अन्नाने भरलेल्या असून त्यांचा उपयोग फलनानंतर गर्भविकासाकरिता होतो. अंदुककलश, रेतुकाशय व गंतुकधारी एकंदरीत फार ऱ्हास पावलेल्या आढळतात. गंतुकधारी परावलंबी राहून जीवनचक्रात त्यांचे स्थान क्षुद्रच राहते.

बाहेरील पाण्याच्या साहाय्याने फलन प्रकिया घडून येते. त्यानंतर रंदुकाचा विकास होतो व गर्भ तयार होतो. दोन दलिका, आलंबक, पद व प्राथमिक मूलदंड हे गर्भाचे भाग होत. गर्भाच्या अक्षावर प्राथमिक मूलदंड, त्यापासून मुळे व खोडावर पाने येऊ लागतात. बीजुकधारी वनस्पती स्वतंत्रपणे जीवन सुरु करते. येथे पिढ्यांचे एकांतरण आढळते. क्वचित काही जातींत फलनाची प्रकिया बीजुकधारी वनस्पतीवरच होते. गर्भावस्थेतील बीजुकधारी, बीजुकावरण व स्त्री-गंतुकधारीचे पोषक ऊतक उच्च वनस्पतींच्या बीजाशी विलक्षण साम्य दर्शवितात. सिलाजिनेला  ही क्रमविकासात बीजी वनस्पतींच्या बरीच जवळ असावी हे उघड आहे, कारण असमबीजुकत्व, गंतुकधारींचा ऱ्हास, स्त्री-गंतुकधारींचे बीजुकात (क्वचित बीजुककोशात) राहून फलनानंतरही गर्भविकास तेथेच घडवून आणणे इ. बाबतींत बीजी वनस्पतींशी साम्य दिसते. बीजी वनस्पती ह्या सिलाजिनेला सारख्या पूर्वजापासून उत्क्रांत झालेल्या असाव्यात अशी एक विचारसरणी मांडली गेली असली तरी इतर साधारण विचारसरणीमुळे ती स्वीकारलेली नाही [ ⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग].

पहा : अपिवनस्पति एकांतरण, पिढ्यांचे लायकोपोडिएलीझ लेपिडोडेंड्रेलीझ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग.

संदर्भ : 1. Dittmer, H. J. Phylogeny and Form in the Plant Kingdom, 1964.

    2. Eames, A. J. Morphology of Vascular Plants, Lower Groups, New York, 1964.

    3. Mukherji, H. Ganguli, A. K. Plant Groups, Calcutta, 1964.

    4. Smith, G. M. Cryptogamic Botany, Vol. II, Tokyo, 1955.

परांडेकर, शं. आ.