ऑलिव्ह : (इं. इंडियन ऑलिव्ह, लॅ. ओलिया फेरुजिनिया कुल-ओलिएसी). सु. १५ मी. उंचीचा हा मध्यम आकाराचा सदापर्णी वृक्षभारतात काश्मीर ते कुमाऊँ प्रदेशात २,४०० मी. उंचीपर्यंत आढळतो. उत्तर भारतात त्याची लागवडही केली जाते व त्याला ‘कहू’ किंवा ‘बैरबंज’ नावाने या प्रदेशात ओळखतात. खोडाचा घेर ३·६ मी. साल करडी, गुळगुळीत व पातळ; पाने साधी, लांबट भाल्यासारखी, चिवट, टोकदार व समोरासमोर; फुले पांढरट, लहान, द्विलिंगी व नियमित असून पानांच्या बगलेत तीनशाखी परिमंजरीत येतात [→ फूल ओलिएसी].

ऑलिव्ह : (१) इंडियन ऑलिव्ह : (अ) फळांसह फांदी, (आ) फुलांसह फांदी. (२) यूरोपीय ऑलिव्ह : फळांसह फांदी.

अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ अंडाकृती (५–८ मिमी.), हिरवे, पिकल्यावर काळे व खाद्य. मध्यकाष्ठ फिकट ते गर्द तपकिरी किंवा गर्द जांभळे, मजबूत, लवचिक, कठीण, जड आणि टिकाऊ असून हत्यारांचे दांडे, छड्या, फण्या, खेळणी आणि अनेक कातीव व कोरीव वस्तूंसाठी चांगले. मगज (गर) बियांचे तेल (ऑलिव्ह तेल) हिरवे, तिळेलासारखे चवदार व खाद्य असून साबण, वंगणे इत्यादींकरिता वापरतात. ते शामक, सारक व वेदनाहारक आहे. नवीन लागवड बिया अथवा कलमे लावून करतात.

यूरोपीय ऑलिव्ह (ओलिया यूरोपिया) ही वरच्यासारखीच जाती मुळची पश्चिम आशियातील असून मोठ्या प्रमाणात स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगाल इ. भूमध्यसामुद्रिक देशांत तसेच अमेरिकेत पिकविली जाते. तिचे उपयोग भारतीय जातीप्रमाणे असून तिची लागवड (भारतीय जातीवर कलम करुन) करण्याचे प्रयत्न भारतात चालू आहेत. सध्या तिच्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते. सु. ख्रि. पू. ३००० सालापासून पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशात ही लागवडीत आहे.

पहा : करंबा.

परांडेकर, शं. आ.