मुरघास : (सायलेज). पावसाळ्यात गवत, कडबा, मका यांसारख्या पिकांच्या ओल्या वैरणींपैकी काही भाग पीक अथवा गवत फुलोऱ्यात असताना अगर दाणे भरण्याच्या स्थितीत कापून विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकवितात त्याला मुरघास अथवा मुरलेली वैरण असे नाव आहे. जमिनीतील खड्ड्यात अगर जमिनीवरील उभ्या दंडगोलाकार कोठीत हवाबंद स्थितीत ओली वैरण ठेवल्यास त्यात अवायू किण्वनापासून (वातरहित आंबण्याच्या क्रियेपासून) उत्पन्न होणाऱ्या अम्लांमुळे हिरव्या वैरणीतील पोषक द्रव्यांचे परिरक्षण होते. हिरवे गवत कापून वाळविल्यास त्यातील २० ते ३०%पोषक द्रव्ये नष्ट होतात परंतु त्याचा मुरघास केल्यास हे प्रमाण १०-१५% एवढेच असते. काही भागात सतत पावसामुळे अथवा सूर्यप्रकाशाच्या अभावी हिरवे गवत वाळविता येत नाही. त्यावेळी मुरघास करण्याची पद्धत विशेष महत्त्वाची असते. अवायू किण्वनाची क्रिया सुरुवातीचे २-३ महिने होते आणि त्यानंतर १२-१८ महिने पर्यंत मुरघास कोणताही विशेष बदल न होता टिकून राहतो. अमेरिकेत विस्तृत क्षेत्रावर गवताची कुरणे आहेत तेथे या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. ज्यावेळी ओली वैरण उपलब्ध नसते अशा वेळी मुरघासाचा उपयोग ओल्या वैरणीप्रमाणे करता येतो.
योग्य पिके : मका हे पीक मुरघास करण्यासाठी सर्वांत चांगले समजले जाते. अमेरिकेत या पिकाचा मुरघास फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. याचे कारण या पिकाचा मुरघास करणे सोपे असते, जनावरे तो आवडीने खातात आणि तो कित्येक वर्षे चांगल्या स्थितीत राहू शकतो. इतर कोणत्याही पिकापेक्षा मक्याच्या मुरघासातून जास्त पोषक द्रव्ये मिळतात. जोंधळा, उसाचे वाढे (शेंडा), बाजरी व निरनिराळ्या प्रकारच्या गवतांपासून मुरघास बनविता येतो. केवळ गवताचा मुरघास करण्याऐवजी लसूणघास, बरसीम, चवळी, ताग अशा शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) पिकांचे त्यात मिश्रण केल्यास मुरघासाचे पोषणमूल्य वाढते. गवतामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते व शिंबावंत पिकांत ते जास्त असते.
तयार करण्याची पद्धत : मुरघास बनविण्यासाठी जमिनीतील वर्तुळाकार अगर चौकोनी खड्डे अथवा जमिनीवर बांधलेली उभी दंडगोलाकार कोठी यांचा धारक म्हणून उपयोग करतात. मुरघासासाठी वापरण्यात येणाऱ्या धारकाला इंग्रजीत ‘सायलो’ अशी संज्ञा असून त्यावरून मुरघासासाठी ‘सायलेज’ही संज्ञा रूढ झाली आहे. खड्ड्याचा वापर वार्षिक १२० सेंमी. पर्यंत पर्जन्यमानात करता येतो. वार्षिक पर्जन्यमान ७५ सेंमी. पर्यंत असल्यास खड्डा जमिनीत असतो आणि ७५ ते १२० सेंमी पर्जन्यमानात खड्ड्याचा निम्मा भाग जमिनीत व निम्मा भाग जमिनीच्यावर असतो. कोठीचा वापर कोणत्याही प्रदेशात करता येतो. १५० सेंमी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात तो आवश्यक असतो. कायम स्वरूपाचा खड्डा अगर कोठी सिमेंटचा वापर करून बांधतात. कोठीचा वापर अमेरिका, यूरोप व ऑस्ट्रेलियामध्ये विशेष प्रमाणात आढळून येतो. तिची उंची ९·१ मी. अथवा जास्त आणि रूंदी ३ ते ४·५ मी. असते. कच्च्या खड्ड्यात एक घ.मी. जागेत सु. ४८५ ते ६३५ किग्रॅ. आणि सिमेंट काँक्रीटच्या कोठीत तेवढ्याच जागेत सु. ७००ते ७७५ किग्रॅ. मुरघास तयार होतो.
जमिनीतील कच्च्या खड्ड्यात मुरघास बनविता येतो परंतु सिमेंट काँक्रीटमध्ये बांधलेल्या खड्ड्यापेक्षा अगर कोठीपेक्षा कच्च्या खड्ड्यात वाया जाणाऱ्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असते. ४००किग्रॅ. वैरणीसाठी एक घ. मी. या हिशेबाने खड्ड्याची लांबी, रुंदी व खोली ठेवतात. जमिनीतील पाण्याची पातळी पृष्ठभागापासून किती खोल आहे ते पाहून खड्ड्याची खोली ठरवितात कारण कोणत्याही परिस्थितीत खड्ड्याच्या तळाशी अथवा बाजूने पाणी झिरपून येणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असते. चौकोनी खड्ड्याचा वरचा भाग तळाकडील भागापेक्षा रुंद ठेवतात त्यामुळे बाजूची माती ढासळून खाली पडत नाही व वैरण उत्तम प्रकारे दाबून भरता येते. खड्ड्याच्या बाजूचा उतार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून कमी जास्त ठेवतात. खड्ड्यातून खणून काढलेली माती खड्ड्याच्या बाजूला रचून खड्ड्याची उंची वाढवितात. यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात शिरत नाही. लहान शेतकऱ्याच्या सोईच्या दृष्टीने चौकोनी खड्ड्यापेक्षा वर्तुळाकार खड्डा चांगला असतो कारण त्यात ओली वैरण चांगल्या प्रकारे दाबून भरता येते. २ मी. व्यासाच्या व ४ मी. खोल खड्ड्यात ५·५ टन ओली वैरण मावते.
पिकाची कापणी : मुरघासासाठी पिकाची कापणी योग्य वेळी करणे आवश्यक आहे. मका, जोंधळा, बाजरी ही पिके दाण्यामध्ये दूध तयार होण्याच्या सुमारास कापतात. गवतांना फूल दिसू लागताच ती कापण्यास सुरुवात करतात. कापलेल्या पिकात ओलाव्याचे प्रमाण ६५ ते ७५% पेक्षा जास्त नसावे. जास्त असल्यास असे पीक थोड्या प्रमाणात वाळविणे इष्ट असते.
धारकात वैरण भरणे : कोठीत ओली वैरण भरतेवेळी तिचे सु. २ ते २·५ सेंमी. आकारमानाचे तुकडे करून ती कोठीत यंत्राच्या साहाय्याने भरतात व दाबून घेतात. कोठी पूर्ण भरल्यावर रोज एक तास याप्रमाणे ४-५ दिवस पायाने तुडवून दाबतात व वैरण चांगल्या प्रकारे दाबली गेल्यावर कोठीवर झाकण घालतात. दुसऱ्या पद्धतीत संपूर्ण भरलेल्या कोठीवर निरुपयोगी गवताचा अथवा लाकडाच्या भुश्शाचा १५ ते २२ सेंमी. जाडीचा थर घालून तो पाण्याने पूर्णपणे भिजवितात. जमिनीतील कच्च्या खड्ड्यात वैरण भरताना प्रथम तळाकडील भाग व बाजू चांगल्या प्रकारे गुळगुळीत करतात. नंतर तळाला वाळलेले अथवा हलक्या प्रतीचे हिरवे गवत घालून त्यावर तुकडे केलेली वैरण थरा-थराने भरून धुमसून अथवा पायाने दाबून घेतात. कडेला हलक्या प्रतीचे गवत घालतात. प्रत्येक थर हे सु. ३० सेंमी. जाडीचा असतो. खड्ड्याच्या चारही बाजूंकडील वैरण योग्य प्रकारे दाबण्याची खबरदारी घेणे आवश्यक असते. थरात हवा राहिल्यास त्यातील ऑक्सिजनामुळे बुरशीची वाढ होऊन मुरघासाची प्रत बिघडते अथवा सर्व वैरणीचे खत होते. संपूर्ण खड्डा भरेपर्यंत ही खबरदारी घेणे आवश्यक असते. खड्ड्याचे तोंड बंद करताना वरचा ६० ते ९० सेंमी. जाडीचा थर निरुपयोगी गवताने भरून त्यावर ६० ते ९० सेंमी. माती घालतात. १०-१५ दिवसांत खड्ड्यातील वैरण दाबली जाऊन खाली बसते. पावसाचे पाणी खड्ड्यात जाऊ नये म्हणून त्यावर गवताचे अगर पत्र्याचे छप्पर बनवितात आणि चारही बाजूंना चर खणतात.
मुरघास चांगला बनण्यासाठी आवश्यक बाबी : (१) वैरणीचे पीक योग्य वेळी कापले गेले पाहिजे. (२) कापलेल्या पिकात आर्द्रतेचे प्रमाण ६५ ते ७५% पर्यंतच असावे व त्यात कार्बोहायड्रेटांचे प्रमाण पुष्कळ असावे. (३) वैरणीचे लहान तुकडे कोठीत अगर खड्ड्यात भरून ते शक्य तेवढे दाबून घेणे ही फार महत्त्वाची बाब आहे. वरील सर्व बाबी योग्य प्रमाणात असल्यास अवायू किण्वनांमुळे लॅक्टिक अम्ल तयार होऊन उत्तम प्रतीचा मुरघास तयार होतो परंतु या बाबींच्या असंतुलनामुळे ब्युटिरिक अम्लाची उत्पती होते आणि त्याच्या अप्रिय वासामुळे जनावरे मुरघास खात नाहीत.
परिरक्षक : कापलेली व तुकडे केलेली वैरण खड्ड्यात अगर कोठीत भरतेवेळी त्यात काही पदार्थ मिसळल्यास त्यांचा परिरक्षक म्हणून उपयोग होतो व मुरघासाचे पोषणमूल्यही वाढते. उसाची मळी व तृणधान्यांचा भरडा हे पदार्थ त्यांच्या उपलब्धतेमुळे भारतात वापरण्यासारखे आहेत. परदेशात या पदार्थाखेरीज संत्री, बीट व बटाटे यांचा लगदा वापरतात. उत्तम प्रकारचा मुरघास बनविण्यासाठी निरनिराळया वैरंणीसाठी शिफारस केलेले परिरक्षकांचे प्रमाण (१०० किग्रॅ.मागे) पुढीलप्रमाणे आहे. (१) फक्त गवत: २·७ ते ३·६ किग्रॅ. उसाची मळी अथवा ४·५ ते ६·८ किग्रॅ. तृणधान्याचा भरडा. (२) गवत व शिंबावंत पिकांचे मिश्रण: ३·६ किग्रॅ. उसाची मळी अथवा ६·८ ते ९·० किग्रॅ. तृणधान्याचा भरडा. (३) फक्त शिंबावंत पिके ३·६ ते ४·५ किग्रॅ. उसाची मळी अथवा ६·८ ते ११·३ किग्रॅ. तृणधान्याचा भरडा.
सोडियम मेटाबायसल्फाइट हे रासायनिक परिरक्षकही १०० किग्रॅ.ला ४०० ग्रॅम या प्रमाणात वापरतात. उसाची मळी अथवा तृणधान्याचा भरडा जास्त कमी वापरल्यास त्यापासून अपाय होत नाही परंतु रासायनिक परिरक्षकाचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कोणतेही परिरक्षक वापरले, तरी ते वैरणीत सारख्या प्रमाणात मिसळले जाते किंवा कसे हे पाहणे आवश्यक आहे.
मुरघास तयार होण्याच्या काळात पोषक द्रव्यांचा ऱ्हास कमी जास्त प्रमाणात आढळून येतो. भरलेल्या वैरणीत आर्द्रतेचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असेल, तर तळाकडील थरातून पोषक द्रव्ये झिरपून वाया जातात. श्वसन व किण्वन यांमुळे वैरणीतील कार्बोहायड्रेटाचे प्रमाण सु. एक तृतीयांशाने कमी होते.
चांगल्या मुरघासाची लक्षणे : किण्वनातून उत्पन्न झालेल्या लॅक्टिक अम्लामुळे व अल्कोहॉलामुळे चांगल्या मुरघासाला सुमधुर असा आंबूस वास असतो, त्यावर बुरशीची वाढ झालेली नसते, हाताला तो ओलसर व मऊ लागतो पंरतु त्याला चिकचिकीतपणा नसतो. त्याचा रंग शेवाळी हिरवा असून त्याचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य ] ४ ते ४·५ असते. सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे जनावरे तो आवडीने खातात. चांगल्या प्रकारच्या वैरणीपासून तयार केलेल्या मुरघासात खनिजद्रव्ये आणि कॅरोटीन असतात. गडद तपकिरी रंगाचा मुरघास चांगल्या प्रतीचा नसतो आणि तो काळपट रंगाचा असल्यास जनावरांना खाऊ घालण्यालायक नसतो.
तयार मुरघासाचा वरचा थर टाकाऊ असतो. सिमेंट क्राँक्रीटच्या कोठीत अथवा खड्ड्यात ५ ते १०% मुरघास वाया जातो परंतु मातीच्या खड्ड्यात हे प्रमाण २५ ते ३५%पर्यंत असते. मोठ्या खड्ड्यापेक्षा लहान खड्ड्यात वाया जाणाऱ्या मुरघासाचे प्रमाण जास्त असते.
कोठीत अथवा खड्ड्यात वैरण भरल्यावर तो कमीत कमी २ महिनेपर्यंत उघडीत नाहीत. खड्डा उघडताना त्यातील विषारी वायूमुळे कोणास अपाय होणार नाही या बद्दल जरूर ती उपाययोजना करणे आवश्यक असते. जनावरांच्या संख्येवर अवलंबून दररोज आवश्यक तेवढाच मुरघासाचा थर सर्व बाजूंनी सारख्या जाडीचा काढतात. असे न केल्यास आतील मुरघासावर बुरशीची वाढ होऊन त्याची प्रत कमी होते. दररोज कमीतकमी ५ सेंमी. जाडीचा थर काढणे आवश्यक असते.
मुरघास हे जनावरांच्या खाद्याच्या दृष्टीने हिरवे गवत समजले जाते. मुरघासाचा विशेष वापर दुभत्या जनावरांसाठी व लहान वयाच्या जनावंरासाठी करतात. दुभत्या गाई-म्हशींना दररोज १४ ते १८ किग्रॅ. व भाकड जनावंराना आणि कालवडी व पारड्यांना दररोज ९ ते १२ किग्रॅ. पर्यंत मुरघास देण्यास हरकत नाही. दूध काढण्यापूर्वी अथवा दूध काढताना दूभत्या जनावरांना मुरघास देत नाहीत कारण त्याचा आंबूस वास दूध शोषण करून घेते. तसेच जनावरांच्या पैदाशीकरिता ठेवलेल्या वंळूना मुरघास दिल्यास त्यातील अम्ल पदार्थामुळे त्यांची जननक्रिया मंदावते. मुरघासाबरोबरच जनावंराना वाळलेले गवत देणे इष्ट असते. तसेच मुरघास जनांवराना प्रथमच खाऊ घालतेवेळी तो एकावेळी थोडा थोडा देणे आवश्यक असते कारण काही जनावरांना तो प्रथम आवडत नाही.
फायदे : मुरघास वर्षात केव्हाही करता येतो. कमी जमिनीत व कमी खर्चात जास्त जनावरे ठेवता येतात. पीक लवकर कापल्यामुळे दुसऱ्या पिकासाठी जमीन मोकळी होते. हलक्या प्रकारच्या गवतापासून व तणांपासून चांगला मुरघास तयार होतो आणि जनावरे तो आवडीने खात असल्याने गवत वाया जात नाही व ज्यावेळी दुभत्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसतो अशा वेळी मुरघास विशेष उपयुक्त ठरतो. मुरघासाला वाळलेल्या गवताप्रमाणे चोरांची अगर आग लागण्याची भीती नसते.
भारतातील परिस्थिती : हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याची पद्धत लोकप्रिय करण्याचे भारतात ठिकठिकाणी अनेक प्रयत्न झाले पंरतु या पद्धतीचा वापर विस्तृत प्रमाणावर न होण्यामागे प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी कारणीभूत आहेत. सर्वसाधारण शेतकऱ्याचे शेतीचे क्षेत्र मर्यादित असल्यामूळे त्याला वैरणीच्या उत्पादनासाठी वेगळे क्षेत्र ठेवता येणे जवळजवळ अशक्य असते. सिमेंट काँक्रेटमध्ये बांधलेल्या कोठ्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने फार चांगल्या असतात पंरतु त्यांचा भांडवली खर्च भारतातील सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडणारा नसतो. शिवाय एका कोठीत भरण्यासाठी लागणारी सु. ९०० ते १,१०० क्विटंल वैरण एकाच शेतात सहसा मिळत नाही. दररोज मुरघासाचा कमीतकमी ५ सेंमी. जाडीचा थर काढणे आवश्यक असते व एवढ्या थरातील मुरघास १० जनावरांना पुरेसा होतो. सर्वसाधारण शेतकऱ्यापाशी २ ते ३ जनावरांपेक्षा जास्त जनावरे नसतात. लहान खड्ड्यात मुरघास बनविल्यास त्यातील बराच भाग वाया जातो परंतु विशिष्ट परिस्थितीत ओली वैरण मुरघासाचे रूपाने टिकविणे आवश्यक असते. उदा., तमिळनाडू राज्यात सालेम व कोईमतूर जिल्ह्यांत नाचणीच्या पिकाची कापणी पावसाळ्यात होते. वाळलेली नाचणीचे वैरण जनावरे चवीने खात नाहीत पंरतु ओल्या वैरणीचा मुरघास केल्यास तो आवडीने खातात. त्या भागातील काही शेतकऱ्यांनी नाचणीच्या हिरव्या वैरणीचा मुरघास बनविण्यास यश मिळविले आहे.
संदर्भ : 1. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.
2. Narayanan, T. R. Dabadghao, P. M. Forage Crops of India, New Delhi, 1972.
चव्हाण, ई. गो. गोखले, वा. पु.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..