आ. १. कागदी लिंबू : फुलाफळांसह फांदीलिंबू : या फळाचे कागदी लिंबू व साखर लिंबू असे दोन प्रकार भारतात लागवडीत आहेत. यांपैकी कागदी लिंबाला जास्त मागणी असल्यामुळे त्याची विशेष प्रमाणावर लागवड होते. साखर लिंबाची लागवड उत्तर व मध्य भारतात आणि तमिळनाडूत थोड्या प्रमाणावर होते. साखर लिंबाविषयीची माहिती कागदी लिंबानंतर दिली आहे. 

कागदी लिंबू : (हिं कागझी निंबू. इं. लाइम ॲसिड लाइम, सॉअर लाइम लॅ. सिट्रस ऑरॅन्टिफोलिया कुल-रुटेसी). हे पुष्कळ फांद्या असलेले काटेरी झुडुप अथवा ठेंगणे झाड आहे. पाने लहान व अरुंद पंख असलेल्या देठाची फुले लहान पांढरी व गुच्छात येतात. फळे लहान, गोल अथवा अंडाकृती २.५ ते ४ सेंमी. असून काही फळांचा टोकाकडील भाग स्तनाग्रासारखा असतो. फळाची साल पातळ व चकचकीत, गराला घट्टपणे चिकटलेली, हिरवी अथवा पिकल्यानंतर पिवळसर रंगाची गर पिवळट हिरवा, आंबट व स्वादयुक्त असतो. 

हे फळ उष्ण कटिबंधातील बहुतेक प्रदेशांत वाढते. याचे मूलस्थान भारत असावे असे मानतात. मेक्सिको, वेस्ट इंडीज, ईजिप्त व भारत हे कागदी लिंबाच्या उत्पादनात अग्रेसर देश आहेत. भारतात या फळाची लागवड सु. २८,००० हेक्टर क्षेत्रात होते आणि ती मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत आहे. कर्नाटक व गुजरातमध्ये थोडेफार क्षेत्र आहे. 

हवामान : या फळाला उबदार, थोड्या प्रमाणात दमट व जोराच्या वाऱ्यापासून मुक्त असलेले हवामान फार पोषक असते. ⇨ सिट्रस प्रजातीतील सर्व फळझाडांत हिमतुषारामुळे या फळझाडाला सर्वांत जास्त अपाय होतो. यासाठी इटली, स्पेन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. सिट्रस प्रजातीतील झाडांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या देशांत कागदी लिंबाची लागवड यशस्वीरीत्या करता येत नाही. भारतातही या फळाची व्यापारी तत्त्वावर लागवड पश्चिम व दक्षिण भागांपुरती मर्यादीत आहे. महाराष्ट्राचे हवामान या फळाच्या लागवडीस पोषक आहे. अहमदनगर, जळगाव व सोलापूर या कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आणि त्या खालोखाल पुणे, सांगली, धुळे, अकोला व नासिक या जिल्ह्यांत या फळाची लागवड होते. फार पावसाच्या व कडाक्याची थंडी पडणाऱ्या प्रदेशात या फळाची लागवड व्यापारी दृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. १०° से. पासून ४०° से. तापमानाच्या प्रदेशात या झाडाची वाढ जोमदारपणे होते. 

जमीन : सु २ ते २.५ मी. खोलीच्या दुमट किंवा मध्यम काळ्या जमिनी या फळझाडासाठी उत्कृष्ट समजल्या जातात. पाण्याचा चांगला निचरा असलेल्या भारी काळ्या जमिनीतही हे झाड चांगले वाढते. जमिनीचे pH मूल्य ६.५ ते ८ असावे [⟶ पीएच मूल्य]. फार खोल व भारी जमिनी तसेच उथळ, पाणथळ, चोपण, रेताड व खडकाळ जमिनी आणि लोणा असलेल्या जमिनी या फळाच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.

प्रकार : या फळात गोल व अंडाकृती असे दोनच सुस्पष्ट प्रकार आहेत. आसाममधील ‘अभयपुरी लाइम’ हा अंडाकृती फळांचा प्रकार प्रसिद्ध आहे. बाकीच्या भागांत सर्वत्र लागवडीत असलेल्या प्रकाराची फळे गोलसर असतात.

अभिवृद्धी : कागदी लिंबाची अभिवृद्धी सर्वसाधारणपणे बियांपासून करण्यात येते. ⇨जंबुरीसारख्या खुंटावर डोळे भरूनही ती करता येते परंतु बियांपासून केलेली अभिवृद्धी जास्त फायदेशीर असते. एका बीपासून ३ किंवा ४ रोपे मिळतात. शिवाय बियांपासून तयार केलेली झाडे डोळे भरुन केलेल्या कलमांपेक्षा प्रतिकूल हवामानाला तोंड देण्यास जास्त समर्थ असतात. फळांचे उत्पादन जास्त येते व ती जवळजवळ एकसारख्या प्रतीची असतात परंतु बियांपासून वाढविलेल्या झाडांना कलमापेक्षा उशिरा फळे येतात. जंबुरीच्या रोपावर डोळे भरुन केलेली कलमे जोमाने वाढतात व फळे लवकरच येतात. यासाठी अभिवृद्धीचा प्रकार कोठेकोठे जास्त लोकप्रिय आहे. आंध्र प्रदेशात गजानिम्‍माच्या (साखर लिंबाच्या) खुंटांवर डोळे भरून केलेली कागदी लिंबाची कलमे ११ वर्षांपर्यंत जोमदार असतात व फळांचे उत्पादनही भरपूर येते, असे आढळून आले आहे. बिनबियांच्या लिंबांच्या अभिवृद्धीसाठी कलमे करणे हा एकच उपाय आहे.

कागदी लिंबांचे बी उगवून आल्यावर ३ किंवा ४ रोपे येतात. त्यांपैकी एक लैंगिक जननाचे व बाकीची अलैंगिक जननाची असतात. अलैंगिक जननाच्या रोपांना न्युसेलर रोपे असे प्रचारातील नाव आहे. लैंगिक जननापासून तयार झालेली रोपे खुरटी असतात व त्यांपासून वाढलेल्या झाडांची फळे एकसारखी असत नाहीत. यासाठी बिया उगवून आल्यावर रोपवाटिकेत अशी रोपे उपटून टाकतात. 

उत्तर भारतात फेब्रुवारी मार्च अथवा जुलै ते सप्टेंबरमध्ये आणि दक्षिणेत मे जून अथवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गादी वाफ्यात कागदी लिंबाचे बी पेरतात. पेरण्यापूर्वी बी जिबरेलिक आलाच्या द्रावणात २४ तास बुडवून ठेवल्यास बियांची उगवणशक्ती वाढते. (प्रमाण ४० ते ५० भाग जिबरेलिक अम्‍ल + दशलक्ष भाग पाणी). रोपे ७.५ ते १० सेंमी. उंच झाल्यावर त्यांतील फक्त जोमदार रोपांचे दुसऱ्या सपाट वाफ्यात ०.७५ ते १ मी × २२. सेंमी. अंतरावर स्थलांतर करतात. रोपे सु. १ वर्षाची झाल्यावर त्यांतील एकसारख्या वाढीची रोपे निवडून ती कायम जागी खड्‍ड्यांत लावतात. जमिनीच्या प्रकाराप्रमाणे दोन झाडांमधील अंतर ४ ते ५ मी. पासून दक्षिण भारतात ८ मी. पर्यंत असते. सर्वसाधारणपणे ते ५ ते ६.५ मी. असते. रोपे जून-जूलैमध्ये पहिल्या पावसाबरोबर जमिनीत लावतात. लागवड करताना रोपाची शेंड्याकडील ४-५ पाने काढून टाकतात. तसेच लागवड करण्यापूर्वी रोपे ॲग्रोमायसीन १ ग्रॅम व रोगोर १ मिलि. ही १ लिटर पाण्यात मिसळून त्यात २-३ मिनिटे बुडवितात. रोपे खड्‍ड्यांत लावल्यावर त्यांना आधार देतात. 

झाडे लहान असताना त्यांचे कडक उन्हापासून व कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करणे आवश्यक असते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडांना चुना लावतात व थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तरट अथवा गव्हाचे काड झाडाभोवती गुंडाळतात. 


खत : रोपे लावण्यापूर्वी प्रत्येक खड्‍ड्यात त १० किग्रॅ. शेणखत व २ किग्रॅ. सुपर फॉस्फेट घालतात. कागदी लिंबाला वर्षातून तीन वेळा पालवी फुटते. या वेळी खताचा पुरवठा करणे आवश्यक असते रोपे लावल्यावर दुसऱ्या वर्षी जूनमध्ये दर झाडाला २० किग्रॅ. शेणखत आणि १०० ग्रॅ. नायट्रोजन आणि पुढे ऑक्टोबर आणि फेब्रुवारीत प्रत्येक वेळी ५० ग्रॅ. नायट्रोजन देतात. तिसऱ्या वर्षी जूनमध्ये प्रत्येक झाडाला ३० किग्रॅ. शेणखत व १ किग्रॅ. मिश्रखत (१५:१५:१५) देतात. चवथ्या वर्षी जूनमध्ये ५० किग्रॅ. शेणखत व ३ किग्रॅ. नायट्रोजन देतात. चवथ्या वर्षी जूनमध्ये ५० किग्रॅ. शेणखत व ३ किग्रॅ. मिश्रखत आणि ऑक्टोबर व फेब्रुवारीत प्रत्येकी २५० ग्रॅ. नायट्रोजन देतात. पुढील प्रत्येक वर्षात हे प्रमाण कायम ठेवतात. वरील खतांशिवाय झाडांना जुलै व मार्च महिन्यात झिंक सल्फेट १०० ग्रॅ. व मॅग्‍नाशियम सल्फेट १५० ग्रॅ. २०० लि. पाण्यात मिसळून फवारल्यास झाडाची पाने पिवळी पडत नाहीत. 

पाणी देणे : कागदी लिंबाची मुख्ये मुळे साधारणतः ६० सेंमी. खोलीपर्यंत असतात. यासाठी उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने व हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने बांगडी पद्धतीने पाणी देतात. पाणी झाडाच्या बुंध्याला लागू न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक असते. 

झाडाला वळण देणे : झाडाला पुरेसा सुर्यप्रकाश व खेळती हवा मिळण्यासाठी आणि झाड मजबूत बनविण्यासाठी लहान वयातच झाडाची छाटणी करून त्यास वळण देणे आवश्यक असते. जमिनीलगतची खोडावरील फूट काढून टाकतात व मुख्य खोड जमिनीपासून ७५ ते ९० सेंमी उंचीपर्यंत त्यावर आलेली फूट वारंवार काढून सरळ वाढू देतात. ७५ सेंमी. उंचीवर चोहोबाजूला विखुरलेल्या स्थितीत ३ ते ४ जोमदार फांद्या ठेवतात. दाट वाढलेल्या फांद्यातून काही फांद्या छाटून झाडाला डौलदार आकार देतात. 

फलधारणा व फळांची काढणी : कागदी लिंबाच्या झाडाला लागवड केल्यानंतर ४ ते ५ वर्षांनंतर फुले व फळे धरण्यास सुरूवात होते. झाडाला जवळजवळ वर्षभर फुले फळे येतात परंतु फुले येण्याचे जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी हे तीन प्रमुख हंगाम (बहार) आहेत. त्यांची फळे अनुक्रमे नोव्हेंबर, एप्रिल व जून-जूलैत तयार होतात. वर्षाच्या उत्पादनापैकी निम्मे उत्पादन जून-जूलैच्या म्हणजेच मृग बहारापासून व त्या खालोखाल फेब्रुवारीत फुले येणाऱ्या आंबेबहारापासून मिळते. तिसऱ्या म्हणजे हस्त बहाराची फुले ऑक्टोबरमध्ये येतात व फळे ऐन उन्हाळ्यात (एप्रिल-मे मध्ये) मिळतात. या महिन्यात बाजारात फळांना भरपूर मागणी असल्यामुळे चांगला भाव येतो. बहार न धरल्यास कागदी लिंबाची झाडे वर्षभर फळे देऊ शकतात परंतु त्यामुळे झाडाची शक्ती वाया जाते. फळ बरोबर पोसले जात नाही. परिणामी झाडावर एकाच वेळी फुले आणि लहान व मोठी फळे दिसून येतात. यामुळे फळांची राखण, रोग व किडींचा बंदोबस्त, फळांची काढणी व विक्री यांवर अधिक पैसा खर्च होतो. यासाठी सोईस्कर असा एकच बहार धरणे फायद्याचे ठरते. जेथे पाऊसमान कमी आहे व जमीन हलकी आहे अशा भागात ऑक्टोबर बहार घेणे फायद्याचे ठरते. 

फळांची गळ थांबविण्यासाठी व उत्पादनात ५०% वाढ होण्यासाठी २, ४-डी या वृद्धीनियंत्रकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. १० भाग २, ४-डी +दशलक्ष भाग पाणी या प्रमाणात पहिली फवारणी झाडे फुलावर असताना दुसरी फलधारणे नंतर एक महिन्याने आणि तिसरी फळे काढण्याअगोदर एक महिना करतात. एन्‍एए या वृद्धीनियंत्रकाचाही वापर या कामासाठी करतात.

फळांचे उत्पादन वर्षाच्या काही महिन्यांत सर्वांत जास्त असते. हा काळ भारतात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा असतो. गुजरात व महाराष्ट्र भागांत ६० ते ७० % फळे जुलै ते सप्टेंबर या काळात व बाकीची फेब्रुवारी ते मे पर्यंत मिळतात. उत्तर भारतात फळांचा मुख्य हंगाम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये असतो. दक्षिण भारतात तो जानेवारीपासून सप्टेंबर या काळात निरनिराळ्या जिल्ह्यांत निरनिराळ्या महिन्यांत असतो.

उत्पादन : आठ व त्यापेक्षा जास्त वर्षे वयाच्या झाडांचे वार्षिक उत्पादन १,५०० ते २,००० फळे असते. लागवडीची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास दर झाडामागे प्रतिवर्षी ३,००० ते ५,००० फळे मिळणे शक्य असते व एवढे उत्पादन दक्षिण भारतात मिळाल्याची नोंद आहे. 

रोग : खैरा हा कागदी लिंबाच्या झाडावरील सर्वांत महत्वाचा रोग फायटोमोनस सिट्री नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे होतो. पानांची खालची बाजू, कोवळ्या फांद्या व फळे यांवर प्रथम लहान, वाटोळे, पिवळसर बदामी रंगाचे ठिपके दिसतात आणि त्यांचे आकारमान मोठे होऊन ते फोडासारखे वाढतात व फुटल्यावर बाजूच्या फोडांत मिसळून स्पष्टपणे दिसणारे कठीण व्रण तयार होतात. फोडांचा वरचा पृष्ठभाग खोलगट असतो. पावसाळी किंवा दमट हवामानात या रोगाचे प्रमाण इतर ऋतूंपेक्षा जास्त असते. पावसाच्या थेंबांमुळे फोडातील सूक्ष्मजंतूमार्फत रोग झाडाच्या सर्व भागांवर पसरतो. रोगाचे प्रमाण जास्त असल्यास पाने गळतात, फांद्या जळतात व फळांना बाजारात भाव मिळत नाही. या रोगावर उपाय म्हणून हिवाळ्यात सर्व रोगट फांद्या, फळे व पाने गोळा करून जाळतात व झाडावर ०.८% कसाचे बोर्डो मिश्रण फवारतात. त्यानंतर दर दोन महिन्यांनी अथवा कमी मुदतीने ०.६% कसाचे बोर्डो मिश्रम फवारतात. या सर्व उपायांनी हा रोग पुष्कळसा नियंत्रणाखाली राहातो. कलम केलेल्या झाडांवर डिंक्या, मूळकूज, शेंडे सुकणे व ट्रिस्टेझा व्हायरस हे रोग आढळून येतात (या रोगांची माहिती व त्यांवरील उपाय यांकरिता ‘मोसंबे’ ही नोंद पहावी). मात्र बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना डिंक्या रोग होत नाही.

किडी : खोड किड, साल कुरतडणारी कीड व सिट्रस सायला या किडिंचा कागदी लिंबाच्या झाडावर प्रादुर्भाव आढळतो [⟶ मोसंबे].

उपयोग : कागदी लिंबाच्या रसात क जीवनसत्व पुष्कळ प्रमाणात असते. हे फळ भूक वाढविणारे ⇨ स्कर्व्ही या रोगाला विरोधक व कृमिनाशक असून पित्तप्रकोप करणारे आहे. मिठात मुरविलेली साल अपचनावर गुणकारी आहे. जेली, मुरंबे व मद्य यांना स्वाद आणण्यासाठी आणि सरबतासारखी पेये तयार करण्यासाठी कागदी लिंबाचा उपयोग करतात. तसेच लाइम कॉर्डिअल नावाचे पौष्टिक पेय, फळाची वाळविलेली साल, चूर्ण व लोणचे हे नित्याच्या वापरातील कागदी लिंबाचे पदार्थ आहेस. लिंबाच्या फळात ४ ते ८% सायट्रिक अम्‍ल असते. एक टन फळांपासून ८ ते १० किग्रॅ. सायट्रिक अम्‍ल मिळते. बियांपासून उत्तम प्रतीचे तेल मिळते. एक टन बियांपासून सु. २७५ किग्रॅ. तेल मिळते. फळाच्या सालीमध्ये पेक्टिने भरपूर प्रमाणात असतात.


आ. २. ताहिती लाइम : फूल व फळांसह फांदी ताहिती लाइम : हा आंबट लिंबाचा प्रकार अमेरिकेच्या फ्‍लॉरिडा राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. कागदी लिंबाच्या जातीत (सिट्रस ऑरॅन्टिफोलिया) त्याचा समावेश होतो. मेक्सिकन लाइम (कागदी लिंबासारखे फळ) व लेमन यांच्या संकरापासून या फळाची उत्पत्ती झाली असावी. मेक्सिकन लाइमशी तुलना करता ताहिती लाइमची झाडे जास्त काटक व जोमदार असून पाने मोठी असतात व फांद्याना काटे असल्यास फार थोडे असतात. फळ मेक्सिकन लाइमपेक्षा मोठे (लेमनएवढे) व अंडाकृती असते. फळात बिया क्वचितच असतात. फळातील गराचा रंग व आंबटपणा मेक्सिकन लाइमप्रमाणेच असतात.  

साखर लिंबू : (हिं. मीठ निंबू तेलुगू-गजानिम्मा इं. स्वीट लाइम लॅ. सिट्रस लायमेटिऑडिस). हे वेड्यावाकड्या वाढणाऱ्या फांद्याचे झुडूप असून पाने मोसंब्याच्या पानांएवढी परंतु फिकट हिरवी असतात. पानावरील तैल-प्रपिंड (ग्रंथी) मोसंब्याच्या पानावरील प्रपिंडापेक्षा जास्त ठळक असतात. फुले मोठी व पांढरी फळ गोलाकार अथवा अंडाभ, गुळगुळीत, फिकट पिवळे अथवा हिरवट रंगाचे, साल पातळ, गर गोडसर परंतु बेचव असतो व त्याला आंबटपणा मुळीच नसतो. हे संकरित फळ असावे असे मानतात. ईजिप्त व इतर उष्ण कटिबंधातील देशांत या फळाची लागवड थोड्याफार प्रमाणात होते. भारतात मध्य भागात व तामिळनाडूत परस बागेत आणि काही ठिकाणी व्यापारी प्रमाणावर लागवड होते. झाड काटक असून त्याला पुष्कळ फळे धरतात. फळे पावसाळ्याच्या अखेरीस तयार होतात. व त्या वेळी बाजारात सिट्रस प्रजातीतील इतर फळे उपलब्ध नसल्यामुळे या फळांना मागणी असते. फळे ताजी अथवा शिजवून खातात अथवा टिकविण्यासाठी त्यांवर प्रक्रिया करतात. हिवताप व कावीळ यांवर हे फळ गुणकारी आहे.

संत्र्याची डोळे भरून कलमे करण्यासाठी साखर लिंबाच्या रोपांचा खुंट म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर होतो. 

रंगपूर लाइम : पुणे येथे खुंट म्हणून उपयोगात आणावयाच्या झाडांबाबत केलेल्या प्रयोगांमध्ये रंगपूर लाइम आशादायक असल्यामुळे दिसून आले आहे. हे फळ ‘लाइम’ (आंबट फळाचा प्रकार) या नावाने ओळखले जात असले, तरी ते लाइमपेक्षा पुष्कळ निराळे आहे. ते खऱ्या अर्थाने संकरित आंबट संत्रे आहे. फळ कागदी लिंबाप्रमाणे आंबट असते आणि सालीचा व गराचा रंग नारंगी तांबडा असतो. साल पातळ असून संत्र्याप्रमाणे आतील गरापासून सहजपणे सुटून येते. भारताच्या सर्व भागांत हे झाड वाढू शकते व थंडीचा प्रतिकार करते. ते ट्रिस्टेझा रोगाला प्रतिकारक आहे परंतु खैरा रोगाला बळी पडते.

संदर्भ : 1. Cheema, G. S. Bhat, S. S. Naik, K. C. Commercial Fruits of India, Bombay 1954.

           2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol ll, Delhi, 1950.

           3. Hayes W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.

           4. Sham Singh Krishnamurti, S. Katyal S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

           5. Singh R. Fruits, New Delhi. 1969.

गुप्ता, पु. कि. गोखले वा. पु.